Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
४८ मानवसमाजाच्या चरित्रावर तत्त्वज्ञानाचा परिणाम काय होतो आणि तत्त्वज्ञानाचा व मानवसमाजचरित्राचा बिंबप्रतिबिंबरूप संबंध कसा आहे, तें येथपर्यंत संक्षेपानें सांगितलें, समाजशास्र, ज्याला कित्येक यूरोपीयन लोक Science of History अशी भ्रामक संज्ञा देतात, तें जोंपर्यंत निर्माण झालें नव्हतें, तोपर्यंत तत्त्वज्ञानाचा पगडा समजाच्या चरित्रावर अप्रतिबद्ध चालत होता. परंतु ही स्थिति ह्यापुढें अशीच टिकणें अशक्य आहे. नियमांनीं बद्ध अशा शास्राचा जसजसा उदय होत जाईल, तसतसा स्वैर संचार करणा-या अनियमित तत्त्वज्ञानाचा अस्त कालान्तरानें झालाच पाहिजे, हा सिद्धान्त जसा स्पष्ट मनांत उतरावा तसा कित्येक यूरोपीयन ग्रंथकारांच्या मतांत न उतरल्यामुळें, ते Philosophy of History व Science of History ह्या दोन वस्तू एकच समजतात. Philosophy of History व Science of History ह्या दोन शब्दसमूहांत समाज शब्दाच्या ऐवजीं इतिहास ह्या शब्दाचा चुकीनें उपयोग हे लोक करतात, एवढेंच नव्हे; तर Science व Philosophy ह्याही शब्दाचा घोटाळा ह्यांच्या ग्रंथांत पदोपदी होतो. इसवी सन १८७४ त राबर्ट फ्लिंट नामक गृहस्थानें Philosophy of History in Europe हा ग्रंथ लिहिला. ह्याचें प्रारंभीचें वाक्य असें:---One result of this inquiry should be to afford a clear view of what the Philosophy or Science of History is. हा गृहस्थ उत्कटत्चानें ख्रिस्ताभिमानी असून, प्रत्येक तत्त्वज्ञाचे दोष काढण्यांत ह्याचा हातखंडा आहे. परंतु, Philosophy व Science ह्या दोन वस्तू हा टीकाकार एक मानतो, हा ह्याचा मुख्य दोष आहे. अन्वयव्यतिरेकादि नियमांना धरून चालणारें जें तें शास्त्र व अन्वयव्यतिरेकाच्या साहाय्यानें शास्त्राची जेथें गति चालत नाहीं त्या प्रांतांत स्वैर वावरणारें जें तें तत्त्वज्ञान, हा भेद हा दोषैकदृष्टि टीकाकार अजिबात विसरतो. व्यक्तमध्य समाजाच्या चरित्रांतील ज्या गोष्टींची संगति लागाची अशी उत्कट इच्छा असते, ती संगति तत्त्वज्ञानानें लागली, असा भास होतो खरा, व ह्या भासाचा परिणाम समाजाच्या चरित्रावर अनिवार होतो, हेंहि खरें; परंतु, एवढ्यानें तत्त्वज्ञान शास्राप्रमाणें नियमबद्ध आहे, असें मात्र बिलकुल म्हणतां येत नाहीं. लहान पोर अंधारांत भुताला भितें, हेंहि खरें, व पोराच्या चरित्रावर भुताच्या भासाचा परिणाम होतो, हेंहि खरें, परंतु एवढ्यानें भुताचें अस्तित्व सिद्ध होतें, असें म्हणणें मात्र बिलकुल टिकणारें नाहीं. भूत ही गोष्ट मानसिक कल्पना किंवा Psychologicalfiction आहे; तिला व्यावहारिक सत्यत्व नाहीं.