Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
पाणी, माती वगैरे अचेतन भूतांप्रमाणें ब-यावाईटाचें ग्रहण सचेतन मनुष्यप्राण्यांनीं सुखदु:खाकडे लक्ष न देतां उदासीनबुद्धीनें करावें, असें तत्त्वज्ञान ज्या देशांत नांदू लागलें, आणि,
मीं हें भाष नेणें । माझें कांहींचि न म्हणे ।
सुख दु:ख जाणणें । नाहीं जेथें ॥३॥
अशी भगवद्भक्तांची ममत्वरहित अचेतन वृत्ति झाली, तेथें मुसलमानांसारख्या रानटी परंतु वुभुक्षु लोकांनीं राज्य करावें व सर्वस्वापहार करावा, ह्यांत कांहीं नवल नाहीं. ह्यालाच वारक-यांचा एकदेशीं भागवतधर्म ऊर्फ संताळे म्हणतात. गीतेंतील “मा स्मक्लैव्यं गम: पार्थ.” ह्या वचनांत सांगितलेल्या सचेतन भागवतधर्माहून हा अचेतन भागवतधर्म भिन्न आहे. “योग: कर्मंसु कौशले,” हें गीतातत्त्व जर संतमंडळी. नीट ध्यानांत ठेवती, तर भगवंतांचा उपदेश ते यथास्थित समजते. हा एकदेशी अतएव पंगू भागवतधर्म एकनाथांपर्यंत चालून, कांहीं कालानें (५) रामदासस्वामी अवतीर्ण झाले. त्यांनीं दासांच्या म्हणजे महाराष्ट्रांतील गुलाम बनलेल्या लोकांच्या बोधार्थ दासबोधात्मक इतिहास तत्त्वनिरूपक ग्रंथाची रचना केली. त्यांतील तत्त्वज्ञान गीतेंतील तत्त्वज्ञानासारखें सर्वदेशीं व व्यापक आहे.
मराठा तेवढा मेळवावा । आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा ।
मारतां मारतां मरावें । मारूनि आपण उरावें ।
वगैरे स्पष्टोक्तया समर्थांच्या प्रसिद्ध आहेत. व्हानसंगानें वर्णिलेला चालुक्यांच्या वेळचा महाराष्ट्रधर्म रामदासांनीं पुन: उज्जीवित केला. त्याचा प्रभाव महाराष्ट्रसमाजांत कोणत्या प्रकारें झाला तें सर्वश्रुत आहे. (६) पुनरुज्जीवित महाराष्ट्रधर्म सुमारें शतक दीड शतक चालून, अचेतन भागवतधर्माची लाट कांहीं काल दबली होती ती महाराष्ट्रावर पुनः उसळली. ब्रहोंद्रस्वामी, रामजोशी सोलापूरकर, भाऊ महाराज, वगैरे एकदेशी लोक ह्या लाटेचे द्योतक होत. अचेतन भागवतधर्माच्या ह्या शैथिल्योत्पादक लाटेनें समाजांत औदासिन्य उत्पन्न होऊन, भोगलोलुप व बुभुक्षु पाश्चात्यांचें राज्य ह्या देशांत झालें. (७) तें चालूं असतां महाराष्ट्रांत विष्णू कृष्ण चिपळोणकर व महादेव गोविंद रानडे ह्यांनी अलीकडील चाळीस वर्षांत महाराष्ट्रधर्माच्या प्रस्तावनेची प्रस्तावना किंचित् करण्याचा आरंभ केला आहे. ह्या दोघाचें तत्त्वज्ञान गीता व दासबोध ह्या दोन ग्रंथांतील तत्त्वज्ञानांशीं बरेंच जुळतें आहे. त्यांतल्या त्यांत, रानड्यांना अचेतन व शिथिल अशा भागवतधर्माचे जे कैवारी संत त्यांची परीक्षा यथात्थित करतां आली नाही, असें म्हणणें अपरिहार्य आहे.