Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

४२. कल्पनांचा किंवा तत्त्वांचा इतिहास व त्यांचें शास्त्र ह्या दोन बाबीं भिन्न आहेत. उदाहरणार्थ गणित घ्या. गणितशास्त्र निराळें व गणिताचा इतिहास निराळा. संस्थेच्या कल्पनेची उत्पत्ति, बाल्यावस्था, वृद्धि, अपकर्ष, उत्कर्ष ह्या प्रकरणांची हकीकत गणिताच्या इतिहासांत येते; आणि संस्थेचे यच्चयावत् नियम गणितशास्त्रांत प्रतिपादिलें जातात. कोणत्याहि कल्पनेच्या चरित्राचा वृत्तान्त इतिहासांत येतो आंणि विवक्षित कालीं त्या कल्पनेची जी गति व स्थिति तिचा सोपपित्तक परिष्कार शास्त्र करतें. शास्र व इतिहास ह्यांचीं हीं लक्षणें मनुष्यसमाजाला लावलीं म्हणजे मानवसमाजाचा इतिहास मानव समाजाच्या शास्त्रापासून भिन्न आहे, हें स्पष्ट होतें. मानवसमाजाच्या चरित्राचा जो वृत्तान्त तों इतिहास होय, व त्या मानवसमाजाच्या गतिस्थितीच्या कार्यकारणांची जी नियमपरंपरा तिला मानवसमाजशास्त्र म्हणतात. ह्या मानवसमाजशास्त्रालाच कित्येक यूरोपीयन लोक Science of History अशी संज्ञा देतात आणि ह्या चुकलेल्या संज्ञेच्या जोरावर नानाप्रकारचे अनर्थ करतात. Science of History म्हणजे इतिहासाचें शास्त्र असा वास्तविक शब्दार्थ आहे. परंतु तो ह्या लोकांना विवक्षित नाहीं. Science of History, ह्या शब्दसमूहांत History ह्या पदाचा अर्थ ते “मनुष्यसमाजाची चळवळ” 'मनुष्यसमाजाचें चरित्र' असा करतात. वस्तुत: History म्हणजे चरित्राची भाषेंत दिलेली हकीकत होय. येणेंप्रमाणें 'चरित्र' व चरित्राची हकीकत ह्या दोन अर्थांचा घोटाळा करून Science of History हे शब्द यूरोपीयन लोक योजतात. Science of History ह्या शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे. Method of history म्हणून ज्याला म्हणतात, त्यालाहि हे लोक Science of History च म्हणतात. Historical Method नें एखाद्या विषयाचा, वस्तूचा, किंवा कल्पनेचा विचार करावयाचा म्हणजे आदिपासून आतांपर्यंत त्या विषयाच्या, वस्तूच्या, किंवा कल्पनेच्या विचार कल्पनेचा चरित्राचा विचार करावयाचा. म्हणजे कालानुक्रमिक पद्धतीने जो विचार करावयाचा, त्यालाच ऐतिहासिक पद्धति म्हणावयाचें असें होतें. ऐतिहासिक पद्धति म्हणजे इतिहास लिहिण्यांत ज्या पद्धतीचा प्राधान्यान उपयोग करतात ती. कालाशिवाय इतिहास नाहीं. तेव्हां ऐतिहासिक पद्धती म्हणजे दुसरें तिसरें कांहीं नाहीं, कालानुक्रमिक पद्धतीच आहे. यूरोपीयन लोकांनीं लिहिलेल्या इतिहासांत Science of History हें एक मोठें बंड आहे. परंतु, ह्या शब्दांना कांहीएक अर्थ नाहीं. हे शब्द यूरोपीयन इतिहासकारांच्या लिहिण्यांतून जितके लवकर जातील तितके उत्तम.