Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

३४. कौलिकपद्धतीनें इंतिहासाचे येणेंप्रमाणें विभाग पडतात:--

समग्र ७ मानवेतिहास (कौलिक)

भारतवर्षांतील पूर्वप्रलयीन ऋषींच्या वंशाला आर्य; अरब, ज्यू, बाबिलोनियन, असुरियन, मिसर वगैरे नष्ट व ह्यात लोकांना असुर; Danes, Deutsche, English, वगैरे लोकांना दानव व दस्यु; आणि चिनी, मोगल, जपानी वगैरे लोकांना मोगल; अशा संज्ञा मी देतों. कित्येक आर्यांनीं द्रविड भाषा, कित्येक असुरांनीं मोगलभाषा, कित्येक मोगलांनीं असुरभाषा व कित्येक दानवांनीं आर्य व यवन भाषा स्वीकारलेल्या आहेत, तसेंच कित्येक आर्यांनी ख्रिस्ती व असुर धर्म, कित्येक असुरांनीं बौद्धधर्म, कित्येक दानवांनीं असुरधर्म अंगीकारिला आहे. परंतु प्रत्येक मनुष्यांत एका कोणत्यातरी कुळीचें प्राधान्य दिसून येतें यांत संशय नाहीं. एक आर्यकुल मात्र निर्भेळ व शुद्ध राहिलें आहे. आर्येतर लोकांचें कुळ मूळ कुळाच्या चिन्हप्राधान्यावरून ठरवावयाचें असतें. ह्या प्रकरणाचा सूक्ष्म विचार मानवकुलशास्त्रांत करणें प्रशस्त होय, येथें केवळ त्रोटक दिग्दर्शन केलें आहे.

३५. अखिल मनुष्यजातीचे कुल, उपकुल, राष्ट्र, लोक, वर्ग, व्यक्ति वगैरे विभाग केले म्हणजे त्या जातीच्या इतिहासाला व्यवस्थितपणा ऊर्फ पद्धतशीरपणा येतो, आणि मनुष्यजाति आपआपसांत एका प्रकारचा अव्यवस्थित गोंधळ घालीत आहे, असें जें आजपर्यंत वाटे तें जाऊन, कांहींतरी व्यवस्थित हालचाल चालली आहे, असा ग्रह उत्पन्न होतो. अखिल मनुष्यजातीच्या इतिहासाचें विशद दर्शन व्हावें, एतदर्थ ज्याप्रमाणें कौलिक पद्धतीचें अवलंबन करणें इष्ट आहे, त्याप्रमाणेंच राष्ट्र, लोक, वर्ग, व्यक्ति वगैरेंचाहि इतिहास विशद होण्याकरितां इतर पद्धतींचा आश्रय करावा लागतो. व्यक्तिचा इतिहास किंवा चरित्र द्यावयाचें म्हणजे त्याच्या कुलगोत्राचा छडा लाविल्यावर, ज्याप्रमाणें त्याच्या शरीरयंत्राच्या दुर्बलत्वाची किंवा सबलत्वाची हकीकत द्यावी लागते, त्याप्रमाणेंच वर्ग, लोक, राष्ट्र इत्यादींच्याहि इतिहासांत त्यांच्या शरीरयंत्राची माहिती द्यावी लागते. वर्ग, लोक, राष्ट्र यांच्या हालचालींचा जसजसा कमजास्त मगदूर असेल, तसतशा त्यांच्यांत राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षेणिक, वगैरे निरनिराळ्या संस्था उत्पन्न होतात. ह्या संस्थांचा इतिहास व्यवस्थित देतां येण्यास, ह्यांच्या शरीरयंत्राचें साद्यन्त वर्णन करणें जरूर असतें. अशाकरितां कीं, शरीरयंत्रांत जर यत्किंचित् व्यंग असले किंवा फरक झाला, तर ह्या संस्थांच्या द्वारा होणा-या कार्यांत व्यंगें व फरक दिसूं लागतात. समाज व संस्था ह्यांच्या शरीरयंत्राची हकीकत देण्याच्या पद्धतीला शरीरक पद्धति म्हणतात. उदाहरणार्थ, राष्ट्रांतील राज्यसंस्था घ्या राष्ट्रांतील व्यक्तीशीं, वर्गाशीं व लोकांशीं व राष्ट्राबाहेरील व्यक्तीशीं, वर्गांशी, लोकांशीं व राष्ट्रांशीं, संबंध ठेवण्यास जी राज्यसंस्था राष्ट्रांत किंवा लोकांत किंवा वर्गांत निर्माण झाली, तिचें शरीरयंत्र कोणत्या प्रकारचें आहे, हें पहाणें अगत्याचें आहे. कारण, मानवसमाजाच्या अस्तित्चाची व हालचालीची अटच अशी आहे कीं, कोणत्याहि कर्माला त्यानें प्रवृत्त व्हावयाचें म्हणजे त्याला अगोदर आपलें शरीर निर्माण केले पाहिजे. वासना, शरीर व कर्म अशी मानवसंस्थांच्या चरित्राची त्रिविध परंपराच आहे. प्रथम, कर्म करण्याची वासना उत्पन्न होते, नंतर कर्म ज्याच्या द्वारा करावयाचें, तें शरीरयंत्र निर्माण होतें, आणि शेवटीं कल्पिलेलें कर्म सिद्ध होण्याच्या मार्गाला लागतें. वासना-शरीर-कर्म ही त्रयी जशी भवचक्राच्या भ्रमणाला कारण आहे, तशी ती भवचक्राची लहानगीं रूपें जीं व्यक्ति, वर्ग, राष्ट्र, त्यांच्याहि भ्रमणाला कारण होते. ज्या वर्गाच्या किंवा लोकांच्या राज्यवासना अस्पष्ट, त्या वर्गाचें किंवा लोकांचे राज्यशरीर अथवा राज्ययंत्रहि अस्पष्टच असावयाचें. ज्यांच्या राज्यवासना स्पष्ट, प्रबळ व व्यवस्थित, त्यांचे राज्यशरीर अथवा राज्ययंत्रहि स्पष्ट, प्रबळ किंवा व्यवस्थित असतें. धर्मयंत्र, शिक्षणयंत्र, समाजयंत्र, वगैरे इतर शरीरांचाहि हाच प्रकार असतो. तदंतर्गत राज्य, धर्म, वगैरें संस्थांच्या शरीरावरून, वर्ग. लोक, राष्ट्र इत्यादींच्या वासना व कर्म असूं शकतात व असतात, ह्याचा निश्चय करतां येतो. सबब, वर्गादींच्या इतिहासाला ही शरीरक पद्धति अत्यंत उपयुक्त आहे. खेडेगांवांतील ग्रामसंस्थापासून तों राष्ट्रांतील राष्ट्रसंस्थापर्यंत राज्यशरीर, धर्मशरीर, इत्यादींचा व्याप असतो. ह्या प्रचंड व्यापांत शरीराचीं निरनिराळीं इंद्रियें परस्परांना पोषक किंवा मारक कसकशीं आहेत, हें पहाण्याला शरीरक पद्धतीनें मदत होते. एकाच राष्ट्रांतील एकेक संस्थेच्या शरीराचा उदय, वृद्धि व क्षय कालान्तरांत कसा झाला, हें वर्णन करण्याचें काम ह्या पद्धतीचें आहे.