Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

४५. व्यक्तमध्य प्रपंचाच्या चरित्राची अशी असमाधानकारक स्थिति आहे. ती आजचीच आहे अशांतला प्रकार नाहीं. फार पुरातन काळापासून ती अव्याहत चालू आहे. आलों कोठून व जाणार कोठें, हा प्रश्न सोडवल्यावांचून, चाललें आहे काय, ह्या प्रश्नाचा उगलडा करता येत नाहीं. आणि हा उलगडा केल्याविना विचारी मनुष्याची चित्तशांति होत नाहीं. प्रपंच म्हणजे काय, हा शोध आज हजारों वर्षांपासून चालला आहे; व शेकडों शोधकानीं शेकडों उपपत्या काढिल्या आहेत. परंतु, सांगण्यास दु:ख वाटतें की, त्यांपैकीं एकहि उपपत्ति वर्तमानक्षणीं मनाला समाधान देणारी नाहीं.”आप एव ससर्जादौ” पासून “तत्त्वमति” पर्यंत शेकडों साध्या व भानगडीच्या उपपत्त्या युरोपांत व भरतखंडांत मागें निघाल्या होत्या व सध्यां निघत आहेत. परंतु, त्यांत गृहीत गोष्टींचा भाग बहुत व प्रमाणबद्ध पद्धतीचा अंश अत्यल्प आहे, असा संशय येतो. अशी संशयित स्थिति वर्तमानक्षणीं यद्यपि आहें, तत्रापि त्या त्या कालीं त्या त्या उपपत्तीनें मनुष्यमात्राचें समाधान झालेलें आहे. ह्यांत संशय नाहीं. मागील सर्व उपपत्या संशयग्रस्त आहेत, असें वर्तमानक्षणीं असणारे जे आपण त्यांना भासतें इतकेंच. परंतु, भूतकालीन लोकांचा प्रपंच, हा उपपत्या प्रमाणसिद्ध आहेत, असें निश्चयात्मक मत गृहीत धरून, चालला होता, हें इतिहासानें सिध्द आहे. सृष्टी निर्माण झाली कशी, तींत मनुष्याची स्थापना कोणत्या स्थलीं आहे, मानवसमाज कोणीकडे जात आहे, व व्यक्तिमात्राचें पर्यवसान कोठें होणार आहे, वगैरे बाबींचा निश्चयात्मक ऊहापोह ह्या उपपत्त्यांत केलेला असतो. तो सदा सशास्त्र व प्रमाणसिद्ध असतोच, अशांतला प्रकार नाहीं परंतु, त्याच्यावर तत्कालीन लोकांचा कांहीं काळ पूर्ण विश्वास बसलेला असतो, ही गोष्ट मात्र निर्विवाद आहे. ह्या विश्वासाचा अर्थ असा कीं, ह्या उपपत्यांवर मानवसमाजाच्या गतीचें व स्थितीचें धोरण अंशत: अवलंबून असतें. कां कीं, व्यक्तिमात्राचें व मनुष्यसमाजाचें आचरण त्याला जीं मतें विश्वास्य व अतएव उत्तमोत्तम वाटतात त्यांच्या अनुरोधानें चालत असतें. सारांश, ह्या तात्त्विक उपपत्त्या यद्यपि कमजास्त संशयित आहेत असें आपल्याला सध्यां वाटतें, तत्रापि त्यांच्या अनुरोधानें मानवसमाज चालतो, हें सिद्ध आहे. तत्त्वज्ञानाचा प्रपंचाशीं संबंध कसा जडलेला आहे, तें वरील विवेचनावरून स्पष्ट होतें.