Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

४४. मानवसमाजाचा प्रारंभ केव्हां झाला व समाप्ति केव्हा होणार, हें इतिहासाला माहीत नाहीं. अलीकडील दहा पांच हजार वर्षांची थोडी फार हकीकत जाणतो. गीतेंत म्हटल्याप्रमाणें व्यक्तमध्य असा जो प्रपंच, त्याची मधली माहिती तेवढी प्रस्तुतकालीन मनुष्यांना मिळणें शक्य आहे. प्रपंचाचा आदि व अंत मनुष्यकल्पित शास्त्रांना उपलभ्य नाहीं. प्रपंच आला कोठून व जातो कोठं, ह्याचा निर्णय, आदि व अंत याची निश्चित कल्पना नसल्यामुळें, शास्राला करतां येत नाहीं. जो थोडासा मधला दुवा प्रत्यक्ष आज किंवा इतिहासानें कालपासून माहीत झालेला आहे, त्याची लांबी रूंदी मोजण्यांतच शास्त्र गुंतलें आहे. ही मोजणी करून, प्रगति झाली व अधोगति झाली, वगैरे विधानें शास्त्र करतें. जेथें प्रपंच निघाला कोठून व जातो कोणत्या स्थळाला, हें निश्चयानें ठाऊक नाहीं, तेथें, पुढे गेलों किंवा पाठीमागें आलों, हें ठरावयचें कसें, तेंच समजत नाहीं. अशी स्थिति असल्यामुळें, काल जेथें होतों तेथें आज नाहीं, काल जसा होतों तसा आज नाहीं, आणि वर्तमानक्षण गतक्षणाहून भिन्न आहे, ह्यापेक्षां जास्त वैशद्य विचारांत येणें दुरापास्त होतें. अफाट व अज्ञात समुद्रांत सांपडलेल्या दुर्बल होडग्यांतील माणसांची जशी दिशाभूल व्हावी, तशी स्थिति मानवसमजशास्त्राची आहे. होडग्यांतील चार माणसें वल्हीं मारीत आहेत, दोन माणसें ओरडून ववकृत्व करीत आहेत, व एक माणूस स्तब्ध बसलेला आहे, असा एकदां प्रकार इतिहासाला दिसत आहे. फिरून कांहीं वेळानें पहावे तर, सर्व माणसें एकमेकांशीं भांडत आहेत, व कांहीं माणसें मरून पडलीं आहेत, असा देखावा उघडकीस येतो. किंचित् थांबून पुन: पहावें तों, होडग्यांतील माणसांत तट पडून प्रत्येकजण दुस-याच्या विरुद्ध वल्हवीत आहे, आणि प्रत्येकाला आपलें वल्हवणें उत्तमोत्तम वाटत आहे, असा चमत्कार दृष्टीस पडतो. इतक्यांत समुद्रांत भयंकर वादळ होऊन, वक्त्तृत्व, वल्हवणें, तट, भांडण व माणसें पार नाहींशीं झालीं आणि समुद्र, होडी व वल्हीं मात्र शिलक राहिलीं, असा प्रळय होऊन गेलेला नजरेस येतो. पुन: मात्वयान् क्षणार्धांने पहावें, तर, समुद्र शांत आहे आणि होडींत माणसें पूर्वीप्रमाणें गजबज करीत आहेत व जोरानें वल्हवीत आहेत, असें पहिलेंच चित्र डोळ्यापुढें उभे राहतें. आणि हे सर्व चमत्कार पहाणारा व अनुभवणारा इसम कोण, तर होडींतल्या इसमांपैकींच एक ! होडींतल्या माणसांची प्रगति झाली किंवा अधोगति झाली, हें तों सांगणार व बाकीचे ते मानणार किंवा कदाचित् न मानणार !