Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
४६. प्रपंचांतील प्रसंगांना तत्त्वज्ञानाच्या सांच्यांत बसविलें म्हणजे मानवसमाजाची धडपड व्यवस्थित रीतीनें चालली आहे, अशी मनाची समजूत होते. व ही समजूत करण्याकरितां प्रपंचाचें तत्त्वज्ञान अथवा Philosophy of History उदयास येतें. शास्त्रांत व व्यवहारांत स्थलोस्थलीं व वेळोवेळीं कांहीं कल्पित गोष्टी गृहित करून चालल्याशिवाय नीट संगति बसत नाहीं. Jhon Doe व Riehard Roe ची कल्पना इंग्लिश कायद्यांत खरी धरून कांहीं व्यवहार सत्य मानतात; किंवा गतिशास्त्रांत घर्षणाचा अभाव कल्पितात, त्याप्रमाणेंच, व्यक्तमध्य अशा समाजाच्या तत्त्वज्ञानांत कांहीं कल्पित गोष्टी गृहीत कराव्या लागतात व ह्या ग्रहणापासून त्या त्या वेळेपुरती चित्तशांति होत असते आणि प्रपंचाचें रहाटगाडगें आनंदानें, उत्साहानें व हुरूपानें फिरूं लागतें. समाजशास्राला समाजाचा आदि व अंत माहीत नसतो, तो तत्त्चज्ञानाला माहीत असतो. समाज आला कोठून व जातो कोठें, ह्या बिकट प्रश्नाचें उत्तर तत्त्वज्ञान देतें. तें उत्तर शास्त्रीय प्रमाणांनीं समर्थित, अर्थात्, नसतें. कारण तत्त्वज्ञानाच्या प्रांतांत शास्त्रीय प्रमाणें म्हणून ज्यांना प्राय: ह्यणतात त्यांहून निराळ्या प्रमाणांची मातबरी असते. अन्वयव्यतिरेकाच्या खटपटींत शास्त्र सदां घुटमळत असतें. तत्त्वज्ञान जें आहे तें असल्या भिकार बाजारांत हिंडत नाही. आप्तांची वाक्यें, धर्मग्रंथांची प्रमाणें, मनोरचित कल्पना, ह्यांच्या जोरावर अदृश्य वातावरणांत अनिरुद्ध संचार करून, पृथ्वीतलांवरील भिकार बाजार कोठें आहे, तें तत्त्वज्ञान गंभीर स्वरानें व शहाणपणाच्या मुद्रेनें सांगत असतें आणि भिकार बाजारांतील भाबडीं, दु:खीकष्टी व भोंदू माणसें भक्तिभावानें ऐकत असतात. काल्पनिक सृष्टींत स्वैर संचार करणारें तत्त्वज्ञान अन्वयव्यतिरेकाच्या बंधनांनीं नियमित नसल्यामुळें त्याची स्वरूपें नानाप्रकारचीं आहेत. वडारांच्या गुरवापासून तों ब्राह्मणांच्या ज्ञानेश्वरापर्यंत व रानटी लोकांच्या भटांपासून तों युरोपांतील अत्यंत सुधारलेल्या राष्ट्रांतील क्यांटप्रभृति तत्त्वज्ञान्यांपर्यंत प्रपंचाचा अर्थ म्हणजे तत्त्वज्ञान सांगणारे पुरुष कमींतकमी शंभर दीडशें झालेले आहेत आणि त्यांतील प्रत्येकाचें तत्त्वज्ञान दुस-याच्या तत्त्वज्ञानाहून भिन्न आहे अर्थात् मानवसमाजाच्या धडपडीचा अर्थं जो तो आपापल्या तत्त्वज्ञानाच्या धोरणानें करीत आहे. जेथें प्रमाणांचें बंधन नाही व निव्वळ कल्पनेचाच स्वैर संचार आहे, तेथें ज्याचा त्याचा अर्थ ज्याच्या त्याच्यापुरताच व खराच आहे. ज्यांची श्रद्धा ज्या तत्त्वज्ञानावर असेल, त्यांनीं त्याचा अर्थ स्वीकारावा आणि प्रपंच नेटानें व उत्साहानें चालवावा किंवा आलस्यानें किंवा औदासिन्यानें टाकून द्यावा. जसें ज्याचें तत्त्वज्ञान तसा त्याचा प्रपंच, हा सिद्धान्त आहे. विवक्षित काळीं कोणताहि समाज घ्या, त्यांत कोणतें तत्त्वज्ञान नांदत आहे, एवढें कळलें, म्हणजे त्याचें चरित्र कोणत्या प्रकारचें आहे व कोणत्या स्वरूपाचें होईल, ह्याचें स्थूल अनुमान बांधता येतें. 'यो यच्छ्रद्धस्स एव स:-' ।