Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
३६. प्राधान्यानें संस्थांच्या शरीराच्या उत्पत्तीचें कारण तदघटक व्यक्तींच्या वासना होत. पोषण, संरक्षण, प्रजोत्पादन व प्रजाशिक्षण ह्या व्यक्तींच्या मुख्य वासना असतात व तत्सिध्यर्थ ते संघ करतात. शेतकी, व्यापार, गिरण्या, भौतिकशास्त्रें, ह्या सर्वांचा मुख्य हेतु शरीरपोषण आहे. कुटुंब, गोत्र, कुल ह्यांची स्थापना प्रजोत्पादनाच्या वासनेमुळें होते, हें प्रसिध्द आहे. तसेंच शरीरपोषणाचे धंदे अव्याहत चालावे म्हणून शिक्षणसंस्था उभाराव्या लागतात. यूरोपांतील अत्यंत सुधारलेल्या देशांतहि नव्याण्णव हिस्से शिक्षण हें शरीरपोषणाचें धंदे नीट येण्याकरितां दिलें जातें, असें सूक्ष्म अवलोकनानीं दिसून येतें. पोषण, उत्पादन व शिक्षण हीं अप्रतिबंध चालावीं एतदर्थ संरक्षणार्थ राज्यसंस्था व धर्मसंस्था निर्माण कराव्या लागतात. आंतील व बाहेरील दृश्य शत्रूंपासून राज्यसंस्थेनें रक्षण होतें; व गंधर्व, पिशाच्च वगैरे अदृश्य शक्तीपासून धर्मसंस्था रक्षण करते. दानव, असुर, मोंगल व हिंदु ह्यांच्यांत जे लौकिकधर्म आहेत, त्यांचा हेतु, गंधर्व, पिशाच्च, सैतानें, भूतें वगैरेंचा क्षोभ शमवून, अज्ञ व्यक्तिंच्या मनाचें कसेंतरी समाधान करण्याचा आहे. दानवादि अनार्यांतलें व हिंद्वादि आर्यांतले जे कोणी थोडे कट्टे वेदान्तमार्गी किंवा संशयवादी किंवा अज्ञेयवादी आहेत, त्यांना मात्र ह्या अदृश्य शक्तीचें भय वाटत नाहीं. परंतु, त्यांच्या ह्या कल्पनांचा उगम वासनांपेक्षां विचारांत फार असल्यामुळें व त्यांच्यांपैकीं बहुतेकांनीं तत्प्रसारार्थ मोठमोठ्या संस्थाहि यंत्रिल्या नसल्यामुळें त्यांचा विचार येथें करण्याची जरूर नाहीं. सारांश, आजपर्यंत मनुष्यजातीनें ज्या ज्या म्हणून संस्था निर्माण केल्या आहेत, त्यांपैकीं बहुतेकांचे मूळ मनुष्यमात्राच्या वासना आहेत. ह्या वासना संस्थायंत्रांच्याद्वारा फलद्रुप व्हावयाच्या असतात. तेव्हां ह्या यंत्रांकडेच बहुतेक वासनोपहत राष्ट्रांची एकाग्र दृष्टि असते. ती इतकी कीं, वासनांची फलद्रूपता प्रसंगीं एकीकडे राहून यंत्राच्या रचनेकडे व स्वामित्वाकडेच सर्व लक्ष दिलें जातें. युरोपांतील अलीकडील तीनशें वर्षांतल्या राष्ट्रांचा बहुतेक सर्व खटाटोप राज्ययंत्र व धर्मयंत्र यांची सुधारणा, सुरचना व स्वामित्व कोणत्या प्रकारें कोणीं करावें ह्यासंबंधीं झालेली आहे. इंग्लंडचें “राजा व पार्लमेंट” नावाचें जें मुख्य राज्ययंत्र आहे, त्याच्या रचनेच्या, सुधारणेच्या व स्वामित्वाबद्दलच्या झटापटीची जी हकीकत, तिलाच मुख्यत्वेंकरून इंग्लंडचा अं:तस्थ राजकीय इतिहास म्हणतात. यूरोपांतील इतर कित्येक राष्ट्रांनींहि आपापलीं राज्ययंत्रे इंग्लंडच्या धर्तीवर सुधारली आहेत आणि फ्रान्स तर ह्या कामी इंग्लंडच्याहि पुढें गेलेलें आहे. इंग्लंडच्या व यूरोपियन राष्ट्रांच्या मोठेपणाचें हें बीज जपानी लोकांनीं ओळखून, त्यांनीं आपलेहि राज्ययंत्र कांहीं वर्षांपूर्वी सुधारून घेतलें आणि यूरोपीयन राष्ट्रांच्या बरोबरीनें वागण्यास आरंभ केला. आशियांतील ज्या कोणा लोकांना स्वातंत्र्याची वासना उत्पन्न होईल, त्यांनीं तत्साधनार्थ, सोय असेल त्याप्रमाणें, गुप्त किंवा प्रगट रीतीनें, स्वातंत्र्यवासनेचा बळकट धागा अव्याहत चालविणारें एखादें राज्ययंत्रच उभारलें पाहिजे. सद्वासना किंवा असद्वासना फलद्रूप करण्यास यंत्र व यंत्रणा ह्यांच्या निर्माणाखेरीज दुसरा उपाय नाहीं.