Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
४३. Science of History हे भ्रामकशब्द टाकून देऊन, मानवसमाजशास्त्र हे शब्द योजले म्हणजे दृष्टि विमल होते. 'एक: शब्द: सम्यग्युक्त: कामधुग् भवति'। गति व स्थिति ह्या दोन अर्थांच्या अनुरोधानें मानवसमाजशास्राचें दोन भाग होतात:-- (१) मानवसमाजगतिशास्त्र व (२) मानवसमाजस्थितिशास्त्र. अन्चयव्यतिरेकादि ज्या तर्कपद्धति आहेत त्यांच्या अनुसंधानानें मानवसमाजाच्या गतिस्थितीची नियमपरंपरा ठरवावयाची असते. वन्यावस्थेंतून संस्कृतावस्थेंत येत असतां, मनुष्यसमाज मुळीं साधा व बिनभानगडीचा जो होता, तो सध्यां पराकाष्ठेचा गुंतागुंतीचा व भानगडीचा झाला आहे, हें ज्ञान यूरोपीयन शास्त्र्यांना ह्या नियमपरंपरेपासून झालें आहे. परंतु, पुरातनकाळीं मानवसमाज वन्य व रानटी होता, हें विधान सिद्धान्तवत् नाहीं. कारण, अगदीं अलीकडे जे नवीन शोध झालेले आहेत, ते जमेस धरतां, असें म्हणणें प्राप्त होतें कीं, हिमप्रल्याच्याहिपूर्वी जिला वन्य म्हणतां येणें मुकील आहे अशी ज्या अर्थी, एक मानवसमाजाची शाखा होती, त्याअर्थी वन्यावस्था अशी अखिल मानवसमाजाची कल्पना निराधार आहे. केवळ पश्चात्प्रलयीन यूरोपीयनसमाज जर घेतला-- व तोच यूरोपीयन समाजशास्त्री घेतात-- तर ही कल्पना खरी आहे. आर्यांच्या समाजाचा इतिहास पहातां, ही कल्पना टाकून द्यावी लागते व इतिहासाला माहीत असलेल्या कोणत्याहि काळीं कोठें ना कोठें तरी आर्यसमाज सुसंस्कृतावस्थेंत होता, आणि इतर समाज संस्कृतावस्थेप्रत येत आहेत, असें व्यापक विधान करावें लागतें. अलीकडील नवे शोध लागण्याच्यापूर्वी यूरोपीयन शास्त्र्यांनी जी नियमपरंपरा सिद्धान्तवत् मानिली, ती सध्यां निराधार वाटावी, हें रास्तच आहे. मानवसमाजगतिशास्राचा असा हा दुहेरी सिद्धान्त प्रस्थापित केल्यावर, त्या समाजाच्या स्थितिशास्त्राकडे वळणें ओघासच येतें. कोणत्याहि काळीं मानवसमाजाची स्थिति म्हणजे मानवसमाजाच्या निरनिराळ्या घटकांचा नैकविध परस्परसंबधं कोणत्या नियमांनीं नियंत्रित झाला आहे तें स्थितिशास्त्रापासून कळतें. ह्या द्विमुख समाजशास्त्राची येथेंच गति थांबते. ह्या पुढील विचार दुस-या एका शास्त्रानें सांगण्याचा पत्कर घेतला आहे, त्याचा निर्देश करतों.