Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१९७] श्री. १ अक्टोबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे. मीरअलम हे येथून उठोन दरबारास गेले. चोबदार नबाबाकडील बोलावणें आला होता. नबाबानीं त्यांस पुसिलें जे, कायकाय बोलणें जालें? तेव्हां यानीं अर्ज केला जे, दोहीं दौलतींच्या दौलतखाहीनें मसलतेच्या मार्गे बहुत बोलले. आह्मीं सर्व बोलण्यांत आणिलें. परंतु रावपंतप्रधानाकडील ह्मणोन आमचें बोलणें रुचीस पडत नसेल. परवां श्रीमंतांकडील पत्रें व मदारुलमहाम यांचें पत्र आलें त्यांत एक रुका, दौलतखाहीनें श्रीमंतांच्या आंदेषा दूर होय ऐसें करावें ह्मणोन, लिहिला आहे. त्याचा बयान करून सांगितलें. श्रीमंतांनीं आह्मांस पत्र लिहिलें तेंही वाचून दाखविलें. परंतु हजरतीनीं जबाब चांगला दिला नाहीं. वरचेवर सांगितलें. त्यास तुह्मीं घराऊरीतीनें सर्व हजरतीस समजावून सांगावें ह्मणोन जे मरातीब मसीं बोलले तें अर्ज करतों ऐसें ह्मणोन मीर यानीं बोलण्यास आरंभ केला. सर्व मजकूर नबाबानीं ऐकून घेऊन शेवटीं आलाह ह्मणोन श्वास टाकून हांसून बोलले जे, त्यांनीं तुह्मांवर फार दाब टाकला. तेव्हां मीर अलम यांनीं जबाब दिल्हा जे, दाब टाकून बोलते तर आह्मींही दाबाचीं बालणीं बोलतों, परंतु दाब टाकून ते बोलले नाहीं, श्रीमंतांकडील जीं पत्रें आलीं तीं सर्व त्यांनीं परवां हजरतीस दाखविलीं. त्यांत ही दबावून बोलावें असें कोठें दिसलें नाहीं, हजरतीनीं कुमकेविशीं लिहिलें होतें, त्याजवरून त्यांनीं सरदारांची रुकसत केली, येवढ्यावर कार्य न जालियास आणखी फौज जमा करण्यविशीं ताकिदा जाल्या आहेत, शिंदे यांचा कंपूही तयार आहे, अलीज्याह यांचा खलष मिटेतोंपरियंत भोंसले यानीं नागपुरास जाऊं नये, वाशिंबावर रहावें, याचा अर्थ काय कीं अलीज्याहाचा मुकदमा लौकर फैसल न जालियास मातबर सरंजामही तयार आहे, दोस्तींत अंतर व्हावयाचें नाहीं, इत्यादिक तपशील हजरतीस कळावयाकरितां लिहिला, यांत हजरत सफाई व्हावी ह्मणोन लिहिलें, दबावाकरितां नाहीं, परंतु दोस्तीचे मार्गांनें एक रुकाही हजरतीस मदारुल्महाम यानीं लिहिला आहे जे दौलखाहीनें सुचविलें याचा अर्थ मनांत आणिला असतां यांतच सर्व इतल्ला यांनीं केला, माझे मनांत जें येतें त्याचा अर्ज करतों, मामलतीचा जाबसाल करारमदाराप्रमाणें सुरुवात केलियास त्यांनीं लिहिल्याप्रमाणें सर्व अनुकूलताच आहे, नाहींतर फौजा जमा होतात हेंच प्रतिकूल कां नव्हे, याचा इतल्ला दौलखाहीनें त्यांनीं केलाच आहे, हजरतीनीं मसलतीचे गार्गें सर्व दरयाफ्त करावें. याप्रों। बहुताप्रकारें मीरआलम बोलले. याचें उत्तर नवांबानीं केलें की पैक्याचें सोंग कठीण आहे, आलीज्याह याचा मझेला उभा राहिला. तालुक्याची आमदनी बिलकुल येत नाहीं. फौजेस पैका खर्च वरचेवर होतो. हें संभाळून पंतप्रधान यांस पैका देणें कसें घडतें ? खजाना भरून ठेवला नाहीं कीं त्यांतून देऊं. अलीज्याह यांचा खलष मिटल्यावर भेटीचा निश्चय व्हावा, अथवा किस्ती आह्मांकडून आदा व्हाव्या, असें ठरवून नंतर भेटीचें ठरावें. ह्मणजे सफाई मनांत आहे तशी मुलाकांतींत अमलांत येईल, जाहिरदारींत सर्वांस दोस्तीचे लवाजिमे जाहीर होतील. ह्मणजे, तामकनूर किस्तही आदा करण्यांत यईल. याविशीं गोविंदराव याजबरोबर सरकारचा मातबर कोणी देऊन पाठवूं. कराराप्रमाणें अमलांत आणावयाचें यांत संदेह नाहीं. याविशीं त्याची खातरजमा करावी. मगर आमच्यानें आदा होय असे प्रकार ठरवावे ह्मणजे ठीक पडेल. याप्रमाणें उत्तर दिलें. यावर मीरअलम बोलले जे, आलीज्याह यांचा मझेला मिटविला असतां मिटतो. त्यांचीही समजूत काढावी. पंतप्रधानही समजोन सांगतील. हें लांबणीवर घडत नाहीं. पुढें पंतप्रधान याशीं करारमदार झाले ते आदा करण्यास जागा. फौजेचा खर्च खिसारा पडणार नाहीं. हाच ऐवज त्यांचे भरतीस दिल्हा असतां सहजांत सर्व बंदोबस्त होतो. यास लांबणीवर कां घालवावें. ऐसें बोलले. याचें उत्तर नबाबानीं दिल्हें जे, आमचे खानदानाचा हा संप्रदायच नाहीं. आसफज्याह यांनीं नासरजंग यांचा जीव वांचविला. तसेंच अलीज्याह यानें उठोन मजपाशीं यावें ह्मणजे त्याचे जिवास खतरा नाहीं. याप्रों। जालियास ऐकेन. नाहींतर ऐकणार नाहीं. याजवर मीरअलम बोलले, आसफज्याह यांचेवेळचा समय आणखी तो जमानाच निराळा, आतांचा जमाना वेगळा, जसें पहावें तसें करावें. दौलतीचे कामास मागलाच नियम काय ? याप्रों । हजरत सर्व समजतात. आह्मी अर्ज करावा असें नाहीं. हजरतीस अनुभव त्या गोष्टी आह्मी ऐकतों. येथामती जें सुचलें त्याचा अर्ज करावा. दूरंदेशीं तेंच करतील. ऐसें बोलले, नबाब बोलले कीं, आमचे मनांत आलें असेंच करावयचें. तेव्हां यांनीं सर्व ऐकून घेऊन घरास आले. एक दिवस विचार केला. दुसरे दिवशीं बेदरास जावयाकरितां मीर यास नबाबानीं रुकसत केले. त्यानंतर आपले घरीं येऊन विचार ठरावून राजश्री रघोत्तमराव यांस बोलावून त्यांजबरोबर निरोप सांगून पाठविला तो अलाहिदा तपशील लिहिला आहे त्यावरून ध्यानांत येईल. रवाना छ १७ र।।वल. हे विज्ञापना.