Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
इतिफाकानें उमदीं कामें व्हावीं. खलकुलास आराम व्हावा. तुह्मांस आह्मांस संतोष वाटावा. इतक्याकरितां जें केलें तें सिद्धीस गेलें. असें असतां तुह्मीं आह्मीं उगेंच बसलों. कांहींच कोणास सुचत नाहीं हें काय ? याजउपरी दुनयाइचे लोक आह्मां तुह्मांस हासूं लागतील. तेव्हां त्यांनीं येथील मर्जीचा आणि समजेचा प्रकार व कितेक लावालावी करतात याचा विस्तार बहुत सांगितला कीं, असा प्रकार आहे, याकरितां मीही बहुत जपून चालतों, आपल्यावर आफत न आली इतकेंच मिळविलें, असें समजून आहें, उपाय नाहीं. तेव्हां त्यांस ह्मटलें जे, ही चालढकल आहे, त्यांत परिणाम नाहीं. यास आवल तुह्मीं आह्मीं साफ दिल व्हावें, जाहिरदारीनें सफाई ठीक नाहीं, दिलापासून साफ व्हावें, उभय दौलतीचे बेहबुदीविशीं आणि पंतप्रधान यांचे सरकारची कामें उलगडावीं याचे साधनाविशीं जें मनांत येईल तें खुलाश्यानें बोलावें, ह्मणजे तदबीर ठरवावयासी येईल. याजवर बोलिले कीं, नवाबाची प्रकृत हट्टी, जिदीजिदेवर आले ह्मणजे मसहलत समजूं नये, चुगली कोणी सांगितल्यास तेंच मनावर घेतात. याजवर आलील्याहाचा म।।र केला कीं, त्याजकडील जाबसाल सल्याचा आला आहे. याविशीं मीं सलाह सांगितली कीं समेट करून घ्यावा. बक्षीबेगम साहेब यानीं अर्ज केला, परंतु ऐकत नाहींत. न ऐकिल्यांत फार कबाहती आहेत. याचा बयान करून बोलावें तर अधिक राग येऊन संशय येतो. उपाय नाहीं. तेव्हां कसें करावें? असा प्रकार पडतो. यास पुस्तपन्हा कोणाची आणि तदबीर काय. तेव्हां त्यास सांगितलें कीं साफदिल होऊन निःसंशय चाल धरलियावर पुस्तपन्हा आणि तदबीर श्रीमंत आणि मदारुलमहाम यांजकडुन घडेल. तेथील आज्ञेप्रमाणें आह्मीं हजर आहों. नबाब दुरंदेश मनांत न आणितां कांहीं करूं लागल्यास त्याची तदबीर तुह्मी आह्मी मिळोन करूं. नंतर कसें होतें तें पहावें. असें करणेंही नवाबाचे दौलतीचे बहेबुदीकरितां. तेव्हां यांत नमकहरामीचा शब्दही तुह्मांकडे नाहीं. मग कां यास आलस्य करावा ? आपल्याकडून ज्या तदबिरी असतील त्या कराव्या. याजवरही नच ऐकत तर नशिबीं असेल तसें होईल. तुह्मां आह्मांकडे तर शब्द नाहीं. परंतु तुमची चाल आंत येक बाहेर येक ऐशी नसावी. याची खातरजमा जाली पाहिजे. तेव्हां बोलिले, कीं खातरजमा करून देतों आणि येक गोष्ट सांगतों जे, मी हि मसलहत आणि बरें वाईट समजतों, तुह्मांशीं वचन प्रमाण केलियावर कसा चालतों याची परीक्षा तरी पहावी, जमान्याचे गर्दिषीमुळें नाहक संशय परस्परें आले, पाहतां अर्थी कांहींच नाहीं, पूर्वींचे वचनप्रमाणावरच आहों, पुन्हां गुबार न येई असेंच करून चाल षुरू करावी, श्रीमंतांशीं वांकडी चाल धरलियावर या दौलतीचा परिणाम चांगला नाहीं हें पुरतें मला समजलें आहे, याजवरही गफलत कशी होईल ? मुषीरुल्मूलुकासारखा जबरदस्त, त्याची आवस्था काय जाली हे वाकफ, मी तसा चाललों तर माझीही दशा तशीच हें मी जाणतों, आपण माझी खातरजमा खुलाशानें बयान करून केली हें मला पूर्णपणें समजलें, तशीच मीही खातरजमा आपली करतों, जें मनांत येईल तें बोलण्याविशीं मी आंदेशा इतःपर करणार नाहीं ह्मणोन शफत केली. श्रीमंतांकडून खातरजमा तुह्मीं करावी ह्मणोन तेव्हां खातरजमा त्यांची केली. नंतर त्यांचें माझें बोलणें जालें तें अलाहिदा लिहिलें आहे त्याजवरून ध्यानांत येईल. र।। छ १७ र।।वल. हे विज्ञापना.