Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[१९६] श्री. १ अक्टोबर १७९५.
विज्ञापना ऐसीजे. मीरअलम यास ह्मटलें जे, आमचे सरकारचीं कामें करारबमोजीब होणें हीं नवाबाकडून कशीं करवितां, नवाबानीं दूरंदेशी करून फैसला केलियास उत्तम, नाहीं तर आह्मीं याची तजवीज कशी करावी, येथून फैसल्ला होण्याची सुरत दिसत नाहीं, त्याअर्थी मर्जीस येईल तशी तजवीज करावी ऐसें श्रीमंतास लिहावें कीं काय, याची सलाह काय सांगतां ? दुसरी गोष्ट आलीज्याह याचे समजुतीचा प्रकार करावा, असें नबाबास सरकारांतून दोस्तीचे मार्गे लिहिलें आहे. या समेटींत बहुत प्रकार दुरुस्तीचे आहेत. एक तर, श्रीमंतांस संतोष वाटेल कीं आह्मीं दोस्तीचे मार्गे रदबदल घरोब्यानें केली, ती नबाबानीं ऐकिली. यांत अलीज्याह यांची समजूत होऊन उभय दौलतीचे स्नेहाची अधिक वृद्धि. नबाबाचे दौलतींत फंद जाला हा तुटतो. तालुका खराब होतो याचा बंदोबस्त होऊन अमदानी होईल. जमीदार व कमावीसदार वगैरे या निमित्यानें ऐवजास तपशील लावतात हें घडावयाचें नाहीं. ठाईं ठाईं बदअमली जाली त्यांचा बंदोबस्त. श्रीमंताकडील किस्तीचे भरण्याची तोड निघेल. तालुक्याचा तर पैका येत नाहीं. तेव्हां खजान्यातून पैका काढून फौजेस देणें प्राप्त इकडील खर्च वांचतो तोच ऐवज श्रीमंतांकडे दिला ह्मणजे सचोटी राहून दोस्तीची अभिवृद्धि, इतकें होऊन खलष तुटतो. अलीज्याह यांचे समजुतीस कांहीं तालुका देणें लागेल. तेंही दुसरे दौलतींत जात नाहीं. घरचे घरांतच आहे. चार सरदार सरंजामी असतात तसाच हा एक पांचवा. पुढें फंदफितूर करूं पावणार नाहींत, याची मजबुती पाहिजे तशी करावी. हा बापलेकांचा कजिया. बाप श्राप देतो. मातुश्री आशीर्वाद देऊन कल्याणाची इच्छा करीत आहे. श्राप कोणाचा लागावा? आशीर्वाद कोणाचा फळास यावा? दोन्हीं सारखींच. समेट करावा हें सर्वांचे सलाहांत ह्मणोन तुह्मीच सांगतां, शेवटीं त्याचे नशीबीं असेल तें घडेल. कदाचित् लढाईंत मारला गेला तर वेधच तुटला. जर दस्तगीर जाला तर नबाब त्यास मारीत नाहींत, कैद करतील. पुढें कोणाचे नशीबीं दौलत आहे याचा निर्णय करवत नाहीं. तुह्मांस व तुमचे पुत्रास नबाबाचे येथेंच जन्म घालविला पाहिजे. कदाचित् याचेच नशीबीं दौलत असली तर तुह्मीं आपला परिणाम पहावा. कितेक आंदेषा नबाबानीं करावा असा आहे. किदेक आंदेषा असा आहे जे, त्याचें कारण नबाबाचे जातीकडे नाहीं. बायका आदीकरून सर्वांचें लक्ष तिकडे. एक नबाबाची मात्र जीद. तुह्मांस तर सर्व माहीतगारी आहे. अनुमानेकरून आमचे मनांत येतें तें बोलतों. याची काय षकल काढतां? नबाबाचे जिदीवर जाऊं नये. ज्यानें प्रजा आदीकरून सर्वांचें संरक्षण, आणि नबाबाचे जातीस स्वस्थता, दौलतीचा बंदोबस्त, इकडे दृष्टि दूरंदेशीं देऊन जे दौलतखाहीस लाजम तें करावें. विपरीत असल्यास करूं नये. परंतु दोन गोष्टी अवश्य कराव्या. यांत गुण बहुत आहेत. एक प्रकार श्रीमंतांशीं करारमदार केले त्याप्रमाणें अमलांत आणून अधिक दोस्तीची वृद्धि करावी. याजमुळें इतर दौलतदार वगैरेपासून स्वस्थता. कोणाचा दगदगा बाळगावयाचें कारण नाहीं. दुसरा प्रकार घरचा फंद मोडावा ह्मणजे खाजगी उपद्रव मिटला. दोन गोष्टी जितक्या लवकर समेटण्यांत येतील तितका उपयोग. स्वस्थ होऊन नबाबांनी वृद्धापकाळीं सुखानें दिवस घालवावे, तुह्मी आपले कारस्तानीनें नबाबास सुख दाखवावें, हेंच योग्य. जें मनांत आलें तें निःसंशय होऊन बोललों. पुढें याची योजना केली असल्यास उत्तम, अथवा मनन करून ठरवावें. याजवर मीरअलम बोलले जे, इतका बयान माझे मनांत ठसला. ख-या गोष्टी आहेत. यांत किमपि संशय नाहीं. परंतु यांतील खुलासा सांगतों. नबाबाचे प्रकृतींत कषिष फार आहे. सरकारचा फडच्या सुप्रवृत्तीनें करतील असा रंग मला दिसत नाहीं. मसलहतीचे मार्गें बोलत असतो. परंतु मनांत भरत नाहीं. तसाच अलीज्याह याचा मजकूर त्यास आतां मी नबाबाकडे जातों. काय बोलणें जालें असें पुसतील. ते वेळेस जसें साधन लाऊन बोलावयाचें तें बोलतों. त्यांत कांहीं मार्गाची गोष्ट असलियास उत्तम. नाहीं तर याची तदबीर माझे मनांत जी येईल ती सांगून पाठवीन त्याप्रमाणें करावें. तर बनाव बसेल. याचा इतल्ला श्रीमंत व मदारुलमहाम यांस जसें बोलणें जालें त्याप्रमाणें करावा कीं काय ऐसें पुसिलें. तेव्हां बोललें जे, आज मी जाऊन बोलतों, नंतर उदईक रघोत्तमराव यांजबरोबर सांगून पाठवीन, तें समजून घेऊन सर्व लिहून पाठवावें. श्रीमंतांचे दौलतखाहींत मजकडून हरगीज कसूर होणार नाहीं. याप्रमाणें बहुत खातरजमेनें बोलले. अनुभव येणें पुढेंच आहे. जसा अनुभव तसी खातरजमाही होईल. र।। छ १७ र।।वल. हे विज्ञापना.