Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

त्याप्रमाणें तिकडे कर्नाटकांत शहाजीनेंहि नबाब मुस्तफाखाशीं भांडण सुरूं केलें होतें, अर्थात् शहाजीला कैद करणें विजापूरच्या मुत्सद्यांना भाग पडलें. शहाजीला शके १५७१ त कैद केलें, असे ग्रांट डफ म्हणतो त्याला त्यानें काहींच विशिष्ट आधार दिला नाहीं. तोरणा किल्ला घेतल्यावर सुप्याच्या संभाजी मोहित्यास शिवाजीनें फाल्गुनांत दस्त केलें, असें ज्याअर्थी सभासद म्हणतो त्याअर्थी शके १५६८ च्या फाल्गुनांत शिवाजीनें मोहित्याला दस्त केलें असावें व शके १५६८ च्या फाल्गुनाच्या आधीं तोरणा किल्ला शिवाजीनें घेतला असावा असें म्हणावें लागतें. निळकंठराव नाईकवाड्यांच्या पुत्राच्या सहाय्यानें दिवाळींत शिवाजीनें पुरंदर किल्ला घेतला असें ज्याअर्थी शिवदिग्विजयकार म्हणतो (पृष्ठ १२१) त्याअर्थी शके १५६८ च्या कार्तिकांत हें कृत्य झालें असावें असा अंदाज होतो. फिरंगोजी नरसाळ्याकडून चाकणहि शके १५६८ तच घेतलें असावें असें वाटतें. येथपर्यंत सालांचा धरमधोक्यानें कांहीं थोडाबहुत पत्ता लाविल्यासारखा भास होतो. ह्यापुढें शिवदिग्विजयांत, मल्हार खंडेराव चिटणीस यांच्या सप्तप्रकरणात्मक चरित्रांत व सभासदी बखरींत अफझलखानाच्या वधापर्यंत जो मजकूर दिला आहे त्याचा एकाचा मेळ दुस-याला बसत नाहीं. तसेंच ग्रांट डफनें कोणत्या आधारावर शके १५६९ पासून शके १५८१ पर्यंतच्या ऐतिहासिक मजकुराची व्यवस्थित मांडणी केली, तेंहि कळण्यास पूर्ण मार्ग नाहीं. सप्तप्रकरणात्मक चरित्रांत शके १५६८ पासून शके १५८१ पर्यंतच्या प्रसंगांचा सूक्ष्म अनुक्रम येणेंप्रमाणें आहे. बाजी मोहित्याकडून सुपें घेतल्यावर, (१) कांगोरी, तुंग, तिकोना, लोहगड, राजमाची, कुबारी, भोरप, धनगड, केळणा हे किल्ले घेतले; (२) बांदल देशमुखांचा रोहिडा किल्ला घेतला; (३) विजापुराहून आलेल्या पांचशें पठाणांस चाकरीस ठेविले; (४) सोडवळकर व कोडवेळकर यांच्या बोलावण्यावरून कोकणांतील तळाघोसाळा घेतला व बिरवाडीजवळ खाचीमेट किल्ला बांधिला; (५) गोवेळकर सावंतापासून भवानी तरवार मिळविली; (६) हरिहरेश्वरास जाण्यांत जंजि-याचें व राजापूरचें राजकारण पक्कें न दिसल्यामुळें माघारे फिरले; (७) बाळाजी आवजी कर्ज फिटल्यावांचून महाराजांचे पदरीं राहीना; (८) वर घाटी येतां दळवी मोडिले; (९) शके १५६८ त रायगड घेतला व लिंगाणा बांधिला; (१०) आबाजी सोनदेवानें कल्याण प्रांत घेतला; (११) मुलाणा हयातीची सून सोडून दिली; (१२) आबाजी सोनदेवाच्या हस्तें जंर्जिरे येथील राजकारण सांगितलेप्रमाणें न झालें म्हणून मोरो त्रिमळ पिंगळे यांस पेशवाई काढून दिली; (१३) बाळकृष्णपंतास मजमू, अनाजी दत्तोस सुरनिशी, गंगो मंगाजीस वाकनिशी, नेताजी पालकरास सरनोबती, राधो बल्लाळास सबनिशी, एसाजी कंकास पायेलोकांची सरनोबती वगैरे अधिकार दिले; (१४) चंदनवंदन, केळणा, पांडवगड, नांदगिरी, हे किल्ले घेऊन साता-यास आले; (१५) परळी, पन्हाळा, शिराळें, पावनगड, विशाळगड, बावडा, रांगणा घेतले; (१६) राजापूर लुटलें; (१७) जंजि-यांत ठाणें वसविलें; (१८) शके १५७० त बाळाजी आवजीस चिटणिसी सांगितली; (१९) शृंगारपूरच्या सुर्व्यास त्रस्त केलें; (२०) प्रभाकरभटाचे पुत्रांस उपाध्येपण सांगितलें; (२१) चेऊल लुटलें; (२२) बाजी शामराज शिवाजीस महाडास धरावयास आला; (२३) बाजी घोरपड्यानें शहाजीस धरिलें; (२४) दिल्लीस येण्याविषयीं पत्रें आलीं; (२५) औरंगझेब दिल्लीस जाऊन तक्तावर बसतो; (२६) माहूरच्या देशमुखिणीस रायबागीण किताब मिळाला; (२७) शहाजी महाराजास भिंतींत चिणून कोंडिले; (२८) रणदुल्लाखान, मुरारपंत व सर्ज्याखान यांच्या रदबदलीनें शहाजी सुटला; (२९) सुलतान शिकंदर वारला; (३०) मुरारपंताला मारिलें; (३१) शिवाजीनें क्लिल्ला कोसाणा तानाजी मालुसरे यांजकडून घेवविला; (३२) त्याचें प्रसिद्धगड नांव ठेविलें, (३३) नगर शहर मारिलें; (३४) निळी निळकंठापासून पुरंदर घेतला; (३५) जेजुरींत वाडा बांधिला; (३६) सुंदर स्त्रीस सास-याकडे पाठविलें; (३७) मोरो त्रिमळास नाशिक प्रांतीं पाठविलें; (३८) शके १५७७ त मो-यांस मारिलें; (३९) प्रतापगड बांधिला; (४०) बेदरावर स्वारी केली; (४१) जुन्नर मारिलें व चाकण घेतलें; (४२) शके १५७९ ज्येष्ठ शुद्ध १२ स संभाजी जन्मला; (४३) तुकारामाची भेट झाली; (४४) शके १५७१ त रामदास स्वामींची भेट झाली; (४५) अफजलखाप्रकरण. येणेंप्रमाणें सप्तप्रकरणात्मक चरित्रांतील मजकुराचा अनुक्रम आहे.