Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

सातारा गझेटीयरांत शके १५७२ हें जें साल दिलें आहे तें बिलकुल चुकलें आहे. कां कीं हिजरी सन १०५९ शके १५७० च्या माघ शु॥ ३ पासून शके १५७१ च्या पौष शु॥ १ पर्यंतच होता. रणदुल्लाखानाच्या मृत्यूच्या मित्तीसंबंधानें डफनें हा असा घोटाळा करून ठेविला आहे. ग्रांट डफची इतर माहितीहि मोठ्याशा चवकशींने लिहिलेली असते असें नाहीं. उदाहरणार्थ, पुण्यास तुकोब्बाच्या कथेला शिवाजी शके १५८५ त हजर होता म्हणून डफ आपल्या इतिहासाच्या सहाव्या भागांत लिहितो, परंतु तुकाराम शके १५७१ त वारला हें प्रसिद्ध आहे. (शंकर पांडुरंगांनीं छापिलेली गाथा, प्रस्तावना, पृष्ठ ७५). मालवण उर्फ सिंधुदुर्ग शके १५८४ त बांधला म्हणून डफ म्हणतो. परंतु काव्येतिहाससंग्रहांतील ४२१ व्या महजरांत सिंधुदुर्ग सन खमस सितैनांत १४ जमादिलावलीं म्हणजे मार्गशीर्ष बहुल द्वितीयेस बांधावयास प्रारंभ केला म्हणून म्हटलें आहे. रामदासस्वामींना शिवाजीनें शके १५८३ त गुरू केलें म्हणून डफचें म्हणणे आहे (डफचा इतिहास भाग पांचवा). परंतु शके १५७१ तच शिवाजीची व समर्थांची गांठ पडली होती हें प्रसिद्ध आहे; शहाजी महाराज शके १५८६ च्या पौषांत वारले म्हणून डफनें लिहून ठेविले आहे, परंतु काव्येतिहाससंग्रहांतील ४१० व्या यादींत व मल्हाररामरावकृत सप्तप्रकरणात्मक चरित्रांत (पृ ८०) शहाजी शके १५८३ प्लवनाम संवत्सरे माघ शुद्ध ५ स म्हणजे १६६२ च्या १५ जानेवारीस वारला असें लिहिलें आहे. सारांश, डफनें जो शके १५६८ पासून शके १५८१ पर्यंतचा शिवाजीचा इतिहास लिहिला आहे, तो मोठ्या चवकसपणानें किंवा सूक्ष्म दृष्टीनें लिहिला आहे असें नाहीं. इतर बखरींहून कोठें कोठें विश्वसनीय माहिती त्यानें दिली आहे. परंतु इतर बखरींप्रमाणे कित्येक ठिकाणी तो चुकला आहे व कित्येक ठिकाणीं त्यानें माहिती इतर बखरींत असूनहि आपल्या बखरींत उतरून घेतली नाहीं. येणेंप्रमाणें सुमारें शके १५८१ पर्यंतची बखरींची व ग्रांट डफची व्यवस्था आहे. त्या दोहोंत बहुत दोष आहेत हें कोणीहि कबूल करील. दोष काढून टाकून नवीन साधार व सविस्तर रचना कशी करतां येईल हाच पुढील दहावीस वर्षांतील प्रश्न आहे.

येथपर्यंत बखरींतील मजकुराच्या अनुक्रमासंबंधीं शंका काय काय येतात त्यांचें स्वरूप शके १५८१ पर्यंतच्या मजकुराच्या अनुक्रमाचें परीक्षण करून, दाखवून दिलें आहे. शंकांचें स्वरूप दाखवितांना कोठें कोठें अज्ञात इतिहासाची प्रसंगानें रचना करावी लागली, परंतु इतिहासाची रचना करण्याचा प्रस्तुत स्थळीं मुख्य हेतु नसून बखरींचा अनुक्रम विश्वसनीय नाहीं हें सिद्ध करण्याकडे विशेष लक्ष दिलें आहे. शंकांचीं सिद्धि व इतिहासाची रचना करतांना, बखरींतील शक व मित्या कोणत्या प्रमाणांनी पारखून घ्याव्यां हेंहि प्रसंगोपात्त सांगितलें आहे. तसेंच बखरींतींल अनुक्रम तपासतांना (१) ग्रांट डफच्या इतिहासांतील कित्येक सन बरोबर नाहींत, (२) त्याच्या इतिहासांतील मजकूर त्रोटक व तुटक आहे, (३) बखरींत दिलेल्या पुष्कळ मजकुराचा समावेश आपल्या इतिहासांत त्याला करून घेतां आला नाहीं, व (४) अस्सल पत्रांचा जितका बारीक तारतम्यानें उपयोग करून घ्यावा तितका करून घेण्याचें प्रयोजन त्याला दिसलें नाहीं, वगैरे गोष्टीचाहि उल्लेख झाला आहे. शिवाय अस्सल पत्रें, महजर व इतर पहिल्या प्रतीचे लेख मिळाल्यावांचून शिवाजी महाराजांच्या अद्भुत इतिहासाची रचना करतां यावयाची नाहीं, ह्या महावाक्याचाहि वारंवार उच्चार झाला आहे. हे सर्व विचार कालानुक्रमाच्या अनुषंगानें करावे लागले. खुद्द मजकुराच्या तपशिलासंबंधीं वरील दोन्ही शंकास्थानांत विशेष कांहीच लिहिलें नाहीं. तेव्हां ह्या तपशिलाचा विचार पुढील शंकास्थानांत करणें योग्य आहे.