Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

शिवदिग्विजयांत राजगड अगोदर बांधला म्हणून म्हटलें आहे. मल्हार रामराव तोरणा प्रथम घेतला असें लिहितो. शके १५६० त मावळांतील देशमुखांस दस्त करण्याची कल्पना जेव्हां प्रथम निघाली तेव्हां व पुढें एखादा तरी किल्ला हातांत असावा असें त्या वेळच्या मुत्सद्यांना साहजिक वाटलें असावें. देशमुखांना दस्त करीत असतांना मुरवाडच्या डोंगरांतील दुरजादेवीच्या पर्वतावर किल्ला बांधण्याचा उपक्रम चार पांच वर्षे चालला असावा असें दिसतें. कां कीं कोणताहि किल्ला वर्ष सहा महिन्यांत नवीन असा बांधून निघणें दुरापास्त आहे. नवीन किल्ला तयार करण्यास चार पांच वर्षे निदान लागावीं असा अदमास दिसतो. तेव्हां तोरणा किल्ला घेण्याच्या सुमारास राजगडचा किल्ला संपूर्ण होत आला असावा व राजगड संपूर्ण होतांना तोरणा स्वाधीन करून घेण्याची आवश्यकता भासली असावी असें वाटतें. मावळांतील दस्त केलेल्या व दस्त करूं घातलेल्या देशमुखांना दहशत पडण्याकरितां एखादा किल्ला हातांत असणें जरूर होतें. जर प्रथम तोरणा किल्ला शिवाजीच्या हस्तगत झाला असता, तर राजगड नवीन बांधित बसण्याच्या खटपटींत पडून शिवाजीनें मेहनतीचा व पैशाचा व्यर्थ व्यय केला नसतां. प्रांताचें संरक्षण करण्याकरितां एखादा किल्ला असावा अशी जेव्हां प्रथम कल्पना निघाली तेव्हां आसपासच्या किल्लेदारांना वश करण्याचा प्रयत्न झाला असावा. तो प्रयत्न सफल होत नाहीं असें पाहून नवीन किल्ला बांधण्याची खटपट करावी लागली. राजगड बांधलेला पाहून तोरण्याची दुरधिगम्यता नष्ट झाली व तो किल्ला शिवाजीच्या हातांत पडला. येणेंप्रमाणे राजगड बांधण्याचें व तोरणा घेण्याचें काम परस्परावलंबी होतें. व बखरनविसांच्या साध्या भोळ्या लिहिण्याप्रमाणें सोपें नव्हतें हें उघड आहे. राजगड बांधण्यास व तोरणा घेण्यास शिवाजीला एक विशिष्ट कारण होतें ते हे कीं राजगडच्या व तोरण्याच्या दक्षणेस रोहिड खो-यांत बांदल देशमुख रहात असत. त्यांना अद्याप शिवाजीनें दस्त केलें नव्हतें किंवा बांधूनहि घेतलें नव्हतें. बांदलांसारख्यांना दस्त करण्यास एखादा किल्लाच हातांत असणें जरूर होतें व ही जरूरी भागवण्याकरितां राजगड बांधला व तोरणा काबीज केला. येणेंप्रमाणें पुण्याखालील बारा मावळें काबीज करतांना हे दोन किल्ले शिवाजीनें आपल्या ताब्यांत आणिले. किल्ले व महाल असा संगीन प्रदेश शिवाजीला प्राप्त झाला; महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ भक्कम रोविली गेली; व राज्याचीं सर्व अंगें म्हणजे विशिष्ट देश, विशिष्ट प्रजा व विशिष्ट राजा-सिद्ध झालीं. हा प्रकार केव्हां व कोणत्या वर्षी झाला, हें समजण्यास विश्वसनीय आधार नाहीं, हें सांगितलेंच आहे. व तोरणा घेईपर्यंत शिवाजीच्या चरित्राचा सामान्य इतिहास हा असा असावा असें दिसतें. शके १५६८ पर्यंतचें व तदनंतर कांही वर्षांचें शिवाजीचें चरित्र नीट समजत नाहीं असे उद्गार ग्रांट डफनें आपल्या इतिहासाच्या तिस-या भागाच्या शेवटीं काढिले आहेत. त्याचे प्रारण “बारा मावळें पुण्याखालीं व बारा मावळें जुनराखालीं” ह्या पोवाड्यांतील वाक्याची यथास्थित फोड त्याला करतां आलीं नाहीं हें आहे. शके १५६८ पर्यंतचा इतिहास लिहितांना ग्रांट डफने बखरींखेरीज इतर कोणताहि विश्वसनीय आधार घेतला नाहीं. शके १५६० पासून शके १५६८ पर्यंतचा बखरींतील मजकूर बहुत तुटपुंजा, धरसोडीचा व अपुर्ता असा आहे. त्याच्यापासून अविश्वसनीय अशी मित्तीवार माहिती फारशी मिळण्याचा संभव नाहीं. बहिःप्रमाणांचे जर सहाय्य मिळालें तरच बखरींतील मजकुराचें कालानुक्रमाने वर्गीकरण करण्याची सोय होणार आहे, व बखरींतील लहानमोठ्या वाक्यांचा अर्थ विस्तारानें ध्यानांत येणार आहे. ही गोष्ट, शके १५६० पासून तोरणा घेईतोपर्यंतचा शिवाजीचा जो थोडासा पूर्वेतिहास मीं रचिला आहे, त्यावरून ध्यानांत येणार आहे.