Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

शके १५७० त बाळाजी आवजीस चिटणीशी मिळाल्यानंतर शृंगारपूरच्या दळव्याचें पारिपत्य शिवाजींनें केलें व नंतर म्हणजे शके १५७१ त शहाजीला घोरपड्यानें धरलें असा मल्हार रामरावाचा अनुक्रम आहे. शके १५७१ त शहाजीला धरिलें म्हणून डफहि म्हणतो. आतां विजापुरच्या पातशहाच्या बखरींतींल हिजरी सन १०५७ जर खरा असेल तर मल्हार रामराव व ग्रांट डफ हे दोघेहि चुकीचे ठरतात. शृंगारपूरच्या दळव्यांचें पारिपत्य शिवाजीनें शके १५८३ त केलें म्हणून ग्रांट डफ लिहितो. शहाजीला धरल्यानंतर व औरंगजेब तक्तावर बसल्यानंतर निलकंठ हैबतरावाच्या मुलांच्या साहाय्याने शिवाजीनें पुरंधर किल्ला घेतला असा मल्हाररावाचा अनुक्रम आहें. तसेंच शके १५७८ त औरंगझेब तक्तावर बसल्याचा वृत्तांत दिल्यानंतर शके १५७७ त चंद्रराव मो-याला शिवाजीनें दस्त केलें व १५७१ त तुकारामाची व रामदासाची आणि शिवाजीची गांठ पडली, असा मल्हाररामरावाचा अनुक्रम आहे. तात्पर्य, मल्हाररामरावानें कालानुक्रमानें आपला मजकूर लिहिला नाहीं, असें पूर्णपणे सिद्ध होतें. अफजलखानीं प्रकरणाला प्रारंभ होईतोपर्यंत सभासदानें तर कालानुक्रमाचा केवळ चुथडा केला आहे. सुपें घेतल्यावर जुन्नर व अहमदनगर शिवाजीने मारिलें म्हणून तो बिनदिक्कत म्हणतो. नगर मारिल्यानंतर पुरंधर घेतला व नंतर कल्याण, भिवंडी मारिली असा सभासदी अनुक्रम आहे. सारांश, अफजलखानाच्या प्रकरणापर्यंत सभासद अगदीं टाकाऊ आहे. शिवदिग्विजय तर अफजलखानीं प्रकरणापर्यंत लक्ष देण्यासारखाहि नाहीं. सारांश, ह्या तिन्ही बखरी बहुतेक, कदाचित् येथून तेथून, कालानुक्रमाच्या संबंधानें अफजलखानी प्रकरणापर्यंत फारशा विश्वासपात्र नाहींत. मल्हार रामरावानें दोन चार ठिकाणीं जेथें जेथें शक दिले आहेत तेथें तेथें तेवढा मजकूर कदाचित् खरा धरल्यास चालेल. बखरींतील शकयुक्त मजकूर खरा धरून ह्या शंकास्थानांतील प्रारंभीची रचना मी केली आहे, व ती रचना खरी मानली म्हणजे ग्रांट डफ बहुतेक स्थलीं चुकला आहे असें दिसतें. तोरणा किल्ला घेतल्याचा जो ग्रांट डफनें सन दिला आहे, त्यासंबंधीं तर मला शंका आहेच; परंतु शके १५६८ पासून शके १५८१ पर्यंतचाहि इतिहास त्याने मुद्देसूद व कालानुक्रमानें दिला आहे असें म्हणवत नाहीं. शके १५६९ सालचा, शके १५७२ पासून शके १५७५ सालचा व शके १५७६ सालचा मजकूर ग्रांट डफनें बहुतेक कांहीच दिला नाहीं. शके १५७१ त शहाजीला धरलें. ह्याला आधार शहाजहानाचें शिवाजीला पाठविलेलें पत्र टिपेंत उल्लेखिलें आहे. ह्या पत्राची तारीख व महिना डफनें दिला नाहीं. त्यावरून शहाजीला शके १५७१ च्या प्रारंभी धरिले किंवा शेवटीं धरिलें तें स्पष्ट होत नाहीं. शके १५७१ त शिवाजीचें पत्र दिल्लीस जावयाचें व त्याचें उत्तर यावयाचें व एकंदर दोन चार पत्रें जाऊन राजकारण संपवायचें म्हटले म्हणजे शहाजीला शके १५७१ च्या अगोदर धरलें असलें पाहिजे. म्हणजे बहुशः विजापूरच्या पातशहांच्या बखरींत लिहिल्याप्रमाणें शहाजीला शके १५६९ च्या वैशाखांतच धरिलें असलें पाहिजे. जेथें अस्सल पत्राचा आधार डफ देतो तेथें तेथें साल व मजकूर कायम झालें हें खरें आहे. आतां शके १५६८ पासून शके १५७५ पर्यंत अस्सल पत्राचा आधार डफनें तीनदां दिला आहे. हे तिन्ही आधार शहाजीच्या सुटेकेसंबंधीचे आहेत. शके १५७१ त शहाजी अटकेंत होता हें ह्या पत्रावरून ठरतें. परंतु शहाजी शके १५७५ तच सुटला असें मात्र बाजी घोरपड्याच्या शहाजीच्या करारावरून खास म्हणतां येत नाहीं. करार जर शके १५७५ त झाला असेल तर शहाजी शके १५७४ त सुटला असावा अशी शंका आणितां येईल. शके १५६८ पासून शके १५७५ पर्यंतच्या मजकुराला डफनें टीपा दिल्या आहेत त्या सदां बरोबरच असतात असेंहि नाहीं. एका टिपेंत रणदुल्लाखान शके १५६५ त वारला म्हणून डफ लिहितो परंतु खानमजकूर बहुशः हिजरी सन १०५९ त मेला असावा (सातारा गझेटीयर पृ. ५४९). हिजरी सन दहाशें एकुणसाठ शके १५७० च्या माघ शु॥ ३ स सुरू झाला. तेव्हां शके १५७० च्या माघ शु।। ३ नंतर रणदुल्लाखान वारला हें उघड आहे. रणदुल्लाखानाच्या पाठीमागून अफजलखान वांई प्रांताचा सुभा झाला. अफजुलखानाचा एक हुकूमनामा सु॥ खमसैन १८ जमादिलाखरचा म्हणजे शके १५७१ च्या अधिक आषाढ व॥ ५ चा मजजवळ आहे. त्यावरून रणदुल्लाखान शके १५७० चा माघ व शके १५७१ चा अधिक आषाढ यांच्या दरम्यान कधीं तरी वारला हें स्पष्ट आहे.