Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

हीं बारा मावळें म्हणजे उत्तरेस राजमाची व चाकण ह्या स्थानांपासून दक्षणेस रायरेश्वराचा डोंगर, अंबेडखिंड खांबटकीचा घाट, ह्या स्थानांपर्यंतचा मुलूख होय. ह्या मुलखापैकीं राजमाचीचा किल्ला कल्याणभिवंडीं येथील मुलाणा अहमदाकडे होता; लोहगडावरून बिलाल हपशी अंदर, नाणें व पवन ह्या मावळांचा बंदोबस्त ठेवी; चाकण किल्ला फिरंगोजी नरसाळ्याकडे होता; घोटणमावळ, पौडखोरें मोसेमावळ व मुठेंमावळ त्या त्या देमुखांच्या ताब्यांत होतीं, गुंजणमावळ तोरण्यावरील किल्लेदाराच्या देखरेखीखालीं होतें; वेळवंड व भोर हीं तेथील देशमुखांच्या अधिकारांत होती; हिरडसमावळांत बांदल देशमुख नांदत होते; व शिवतरखोरें बाबाजी कोंडदेवाच्या ताब्यांत होतें. (चित्रगुप्त ५). मावळांच्या पूर्वेकडील मुलुखांत पुणें व सिंहगड दादोजी कोंडदेवाकडे होतें; पुरंदर किल्ला निळो निळकंठ नाइकवाडी यांच्या ताब्यांत होता व सुपें प्रांतावर शहाजीचा मेहुणा संभाजी मोहिता होता. येणेंप्रमाणें शके १५६० च्या सुमारास राजमाची, लोहगड, चाकण, पुरंदर, तोरणा व रोहिडा ह्या किल्ल्यांच्या मध्यें पुणें प्रांतांत शिवाजीची स्थापना झाली होती. पुणें प्रांताची हद्द उत्तरेस इंद्रायणी, दक्षिणेस बनेश्वर, कापूरहोळ, व पाद्माघाट, पूर्वेस सुपें प्रांत व पश्चिमेस लोहगड व तुंग तिकोना अशी होती. ह्या लहानशा मध्य प्रांतांत राहून शिवाजीला, अथवा खरें म्हटलें असतां, त्याच्या मुत्सद्यांना बाहेरच्या लगत्याच्या प्रांतांत आपला अंमल बसवावयाचा व पसरावयाचा होता. ह्या खटपटीचा उपक्रम शके १५६० पासून शके १५६८ पर्यंतच्या अवधीत बारा मावळांतील देशमुखांना दस्त करून व बांधून ह्या मुत्सद्यांनीं केला. हा उपक्रम चालू असतांना शिवाजीच्या मुत्सद्यांनीं शहाजीच्या जहागिरींत दोन प्रकारची राज्यव्यवस्था ठेविली होती असें म्हणण्यास आधार आहे. विजापूरच्या पातशाहीखाली शहाजीची जहागीर असल्यामुळें सदर जहागिरींत अंमलदार लोक शिवाजीच्या मुत्सद्यांनी निराळे ठेविले व शिवाजीच्या नांवाने नवीन उपस्थित केलेल्या सत्तेच्या दिमतीनें अधिकार मिळालेले अंमलदार निराळे ठेविलें. म्हणजे पुणें प्रांतांतील सुभेदार, काजी, मुजुमदार, हवालदार, मोकदम वगैरे पातशाही अंमलदार अगदीं भिन्न असून, नवीन राज्य संपादण्याच्या कामीं मेहनत करणारे मुजुमदार, सबनीस. डबीर, पेशवे वगैरे अधिकारीहि भिन्न होते. काव्येतिहाससंग्रहकारांच्या दप्तरांतील दादोजी कोंडदेवाचा एक महजर माझ्याजवळ आहे. हा महजर शके १५६८ व्ययनाम संवत्सरे सु।। सबा आबैन व अलफ छ २५ रबिलाखर म्हणजे ज्येष्ठ व॥ १२ स लिहिलेला आहे. सदर मितीस भरलेल्या पुणें येथील हुजूर हजीर मजालसींत खालील पातशाही अम्मलदार होतेः- १ काजी अबदुला बिन काजी इस्मायल नख काजी, प्रांत पुणें; २ राजश्री दादाजी कोंडदेव सुभेदार नामजाद, किल्ले कोंढाणा, महालनिहाय, प्रांत पुणें; ३ गोमाजी हवालदार, प्रांत पुणें; ४ नारो सुंदर मुजुमदार, प्रांत पुणें; ५ म्हालोजी झांबरा, मोकदम कसबे पुणें; ६ मालोजी नरसिंगराव व विठाजी नाईक शितोळे देशमुख, प्रांत पुणें. शहाजीचा मुख्य प्रधान अथवा सुभेदार दादोजी कोंडदेव होता; शिवाजीचा मुख्य प्रधान शामराव नीळकंठ होता. शहाजीचा मुजुमदार नारो सुंदर होता; शिवाजीचें बाळकृष्णपंत व निळो सोनदेव हे होते. शहाजीचा म्हणजे पातशहाच्या तर्फेचा हवालदार म्हणजे प्रांतांतील सैन्याचा अधिकारी गोमाजी होता; शिवाजीचा सेनापती खुद्द शिवाजीच होता, स्वतंत्र असा कोणीच अद्याप नव्हता. येणेंप्रमाणें पातशहाचें व शिवाजीचें अधिकारी अगदीं निरनिराळे होते. पातशाही सुभेदार दादोजी कोंडदेव ह्याचा संबंध शिवाजीच्या नवीन राज्यव्यवस्थेशीं वरकरणी बिलकुल नव्हता. बाकी अंतस्थ रीतीनें शिवाजीच्या नवीन राज्याची उभारणी पुणें प्रांतांत दादोजीच करीत असला पाहिजे हें उघड आहे. शके १५६० पासून शके १५६८ पर्यंत होऊं घातलेल्या ह्या नवीन राज्याचें स्वरूप विचार करण्यासारखें आहे. राज्याचें लक्षण म्हटलें म्हणजे त्याला विशिष्ट देश, विशिष्ट प्रजा व विशिष्ट राजा अशीं तीन अंगे अवश्य हवीं. परंतु शके १५६० पासून शके १५६८ पर्यंत होऊं घातलेल्या शिवाजीच्या राज्याला पहिलीं दोन अंगे मुळींच नव्हती. चाकणापासून रोहिड्यापर्यंतच्या देशमुखांना शिवाजींनें बांधून घेतलें होतें. खरें; परंतु त्या प्रदेशांतील एक हातभरहि जागा पातशहाची नसून केवळ शिवाजीची अशी म्हणण्यासारखी नव्हती. शिवाजीची सत्ता देशमुखांच्या हृदयांत दहशतीच्या रूपानें व देशमुखांच्या प्रजेच्या मनांत प्रीतीच्या रूपानें वसत होती.