Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
(१) मजकुरांत नमूद केलेल्या गोष्टी कधींना कधीं तरी घडल्या हें खरें आहे. (२) परंतु ज्या अनुक्रमानें त्या नमूद केलेल्या आहेत त्याच अनुक्रमानें घडल्या किंवा कसें ह्यासंबंधी संशय आहे. (३) तसेंच मजकुरांत नमूद केलेल्या गोष्टींतील बारीक तपशील जसा दिला आहे तसाच असेल असेंहि खात्रीनें सांगवत नाहीं. पहिल्या कलमाचें समर्थन करण्यास विशेष पुरावा पाहिजे असें नाहीं. मजकुरांत नमूद केलेल्या गोष्टी शिवाजीच्या चरित्रांत घडल्या, हें मराठ्यांच्या सतराव्या शतकांतील इतिहास जाणणा-यांस माहीत आहे. दुस-या कलमाचें समर्थन करण्यास खालीला पुरावा देतां येतो. बाजी मोहित्याच्या हातचा सुपें महाल घेतल्यावर कांगोरी वगैरे किल्ले घेतले, मावळें सारीं घेतलीं व देशमुख ममतेंत घेतलें. नंतर थोड्याच दिवसांनी शके १५६८ त कोंकणांत उतरून रायगड किल्ला घेतला व कल्याणावर आबाजी सोनदेवाकडून स्वारी करविली. पुढें लवकरच पांडवगड, चंदनवंदन, नांदगिरी, सातारा, परळी, पन्हाळा वगैरे बावड्यापर्यंतचे सर्व किल्ले घेऊन शके १५७० त राजापूर लुटलें व बाळाजी आवजीस चिटणीशी सांगितली. बाळाजी आवजीस चिटणीशी शके १५७० त मिळाली हें बरेंच विश्वसनीय आहे. शके १५६८ त रायगड घेतला हेंहि तितकेंच विश्वसनीय आहे. रायगड घेतल्यावर कल्याणावर स्वारी करून मुलाणा अहमद ह्याचा खजिना लुटून त्याला विजापुरास पाठविलें. मुलाणा अहमद विजापुरास गेल्यावर नंतर शके १५६९ च्या वैशाखांत शहाजी धरला गेला असेल, हे खरें मानलें-खोटें तरी कां मानावें तें समजत नाहीं- तर मुलाणा अहमदाला लुटणें, रायगड घेणें, भवानी तरवार मिळविणें, कांगोरी वगैरे किल्ले घेणें हे पराक्रम शके १५६८।६९ त घडले असले पाहिजेत. हे जर पराक्रम शके १५६८।६९ त घडले असले असे गृहित धरलें, तर त्यांच्या पाठीमागें, सुपें पुरंदर, तोरणा, राजगड वगैरे स्थलें शिवाजीनें शके १५६८ च्या अगोदर घेतलीं असली पाहिजेत. ह्याच कारणाकरितां तोरणा शके १५६८ त घेतला असें जें ग्रांट डफ म्हणतो, त्यावर माझा विश्वास नाहीं. मुलाणा अहमदाला शके १५७० त शिवाजीनें लुटलें असें जें ग्रांट डफ म्हणतो तेंहि मला साधार वाटत नाहीं. कां कीं, शके १५६९ च्या वैशाखांत शहाजी धरला जाण्यास शके १५६९ च्या आधीं मुलाणा अहमद विजापुराला पोहोंचला पाहिजे. तसेंच रामदास स्वामीच्या चरित्रांत लिहिलेलें आहे कीं, स्वामींनीं चाफळास श्रीरघुपतीचें देऊळ शके १५७० त बांधलें व शिवाजीराजे शके १५७१ च्या वैशाख शुद्ध ४ स मंदवारी चाफळास स्वामीस भेटण्यास आले. राजांची व स्वामींची भेट वैशाख शुद्ध ९ स गुरुवारी झाली. शके १५७१ च्या वैशाख शुद्ध ४ स मंदवार व ९ स गुरुवार होता, त्याअर्थी वरील मित्या ख-या आहेत हें स्पष्ट आहे. सध्यां रामदासस्वामींची जी बखर महाराष्ट्रांत छापील अशी प्रसिद्ध आहे, ती हनुमंतस्वामींनीं शके १७१५ त समर्थाचे पुतणे रामचंद्र बाबा यांचे चिरंजीव गंगाधरस्वामी यांनी शके १६४० त सांगितलेल्या चरित्राच्या आधारें, लिहिलेली आहे. गंगाधरस्वामींनीं शके १६४० त सांगितलेल्या चरित्राची मूळ प्रत पहावयास सांपडेल तर इतिहासाचें फारच हित होईल. तिच्या आधारें १७१५ त लिहिलेली बखर जर खरी असेल तर तिच्यांतील मित्यांवर विश्वास ठेवण्यास हरकत नाहीं. वर नमूद केलेल्या दोन्ही मित्या तीथ व वार यांसहित दिल्या असल्यामुळें व त्या जंत्रीवरून मोजून पाहतां ख-या असल्यामुळें स्वामींची व शिवाजीची भेट शुक्ल ९ स गुरुवारीं झाली हें विश्वसनीय दिसतें.ह्या भेटीस समर्थांनीं जो शिवाजीस इतिहासप्रसिद्ध उपदेश केला त्यांत ‘तुमचें देशीं वास्तव्य केलें।। परंतु वर्तमान नाहीं घेतलें’ ही वाक्यें आहेत. ह्यावरून सातारा, परळी व चाफळ हीं स्थळें शके १५७१ च्या व शके १५७० च्या आधीं शिवाजीच्या हातांत पडली असावीं असा अंदाज होतो. हा अंदाज जर खरा असेल तर शके १५७० त राजापुरावर कोंकणांत उतरून बाळाजी आवजीला चाकरीस ठेवणें, शके १५६९ त पांडवगड, सातारा, वगैरे किल्ले घेणें, शके १५६८ त कल्याणावर स्वारी करणें, हरिहरेश्वरास जाणें वगैरे कृत्यें त्या त्या शकांत झालीं असावी, व ग्रांट डफचा शके १५६८ पासून शके १५७२ पर्यंतचा मजकूर बराच चुकला असावा व त्याच्याप्रमाणें मल्हार रामरावाचाहि अनुक्रम चुकला असावा असें वाटतें.