Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
ह्या पूर्वेतिहासाची रचना करण्यास (१) पुण्याखालील व जुन्नराखालील मावळांची कच्ची माहिती, (२) तेथें त्या वेळीं असणा-या देशमुखांचीं नांवें, (३) निरनिराळ्या देशमुखांचे परस्पर संबंध व शिवाजीशी व पातशहाशीं दळवणवळण, (४) शिवाजीनें नेमलेल्या अधिका-यांना मिळालेल्या सनदांचीं सालें, वगैरे बहिःप्रमाणें जर मला मिळालीं नसतीं तर 'येतांच बारा मावळें काबीज केलीं' ह्या सभासदी वाक्याची विस्तारानें फोड करतां खचित आली नसती. शेवटली तीन बहिःप्रमाणें त्या वेळच्या महजरांखेरीज इतरत्र मिळणें दुरापास्त आहे. अधिका-यांना मिळालेल्या सनदांच्या सालांखेरीज, एक दोन मित्या वगळल्या असतां, बखरींतील बाकीच्या बहुतेक मित्या फारशी विश्वसनीय नाहींत. ह्या वगळलेल्या मित्यांत शिवाजीच्या पहिल्या लग्राची मित्ती समाहृत करण्यासारखी आहे असें मला वाटतें. कां की त्या मित्तीस शक दिला असून शिवाय महिना व तीथ ही दिली आहे. बखरकार, महिना, दिवस, तीथ वगैरे बारीक माहिती जेव्हां देतात तेव्हां तीं ते प्रायः जुन्या टिपणांतून देतात, व हीं जुनीं टिपणें बरींच विश्वसनीय असतात. बारीक तीथ, वार वग़ैरे माहिती देतांना बखरकार कधीं चुकत नाहींत, असें मात्र समजण्यांत अर्थ नाहीं. शिवाजीच्या जन्मतिथीसंबंधीं बखरकारांनीं काय काय गफलती करून ठेविल्या आहेत त्यांची फोड मागें मीं केली आहे त्यावरून वरील विधानाची सत्यता दिसून येईल. सारांश शके १५६० पासून तोरणा किल्ला घेईतोंपर्यंतचा इतिहास रचतांना केवळ बखरकारांच्या लिहिण्यावर भिस्त ठेवून काम भागण्यासारखें नाहीं. बहिःप्रमाणांचा पाठिंबा ह्या वेळच्या इतिहासरचनेस अतिशय हवा. ह्या शंकास्थानांत शके १५६० पासून तोरणा घेईतोंपर्यंतच्या इतिहासाचें ठोकळ स्वरूप कसें असेल ह्याचा ओबडधोबड नकाशा मी काढिला आहे. ह्या इतिहासांतील प्रत्येक प्रसंगाची मित्ती देतां आली नाहीं हें तर स्पष्टच आहे. परंतु प्रसंगांची जी विस्तृत म्हणून माहिती दिली आहे, ती निःसंशय अत्यंत कोती आहे. तोरणा किल्ला घेईतोंपर्यंत विजापूरच्या दरबाराकडून, मावळांतील देशमुखांकडून, व शिवाजीच्या जवळच्या माणसांकडून शिवाजीला काय काय त्रास पोहोंचला असेल ह्याची कल्पना वाचकांस करतां येण्यासारखी आहे. ह्या त्रासाचा यत्किंचितहि उल्लेख करतां येण्यास बखरींतून आधार मिळाला नाहीं. व बाकी ह्या त्रासाचें खरें स्वरूप कळल्यावांचून त्या त्या वेळच्या इतिहासाची व शिवाजीवर आलेल्या प्रसंगांचीं व्यवस्थित कल्पना होणार नाहीं. येणेंप्रमाणें शिवाजीच्या चरित्रांचा बखरकारांनी वर्णिलेला पूर्वेतिहास शंकांनीं पदोपदीं घेरला आहे, हें उघड आहे. तोरणा किल्ला घेण्याच्या नंतरचा इतिहासहि असाच शंकाग्रस्त आहे हें पुढील शंकास्थानावरूनच स्पष्ट होईल.