Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
शिवाजी व शिवाजीचें मंत्रीमंडळ राजसत्तेचें स्वरूप धारण करून बसलें होतें. येणेंप्रमाणें शके १५६० पासून शके १५६८ पर्यंत शिवाजीचें राज्य विशिष्ट देशावांचून व बाह्यतः विशिष्ट प्रजेवांचून अस्तित्वांत येत होतें. शिवाजीच्या मनांत सामान्यतः देशमुखांविषयीं जी अढी कायमची बसली तिचें कारण मावळच्या देशमुखांचे व देशपांड्यांचे व शिवाजीचें ह्या वेळचें दळणवळण होय. देशमुखांच्या सत्तेचा मुख्य उगम विजापूरच्या पातशहाच्या सत्तेंत असल्यामुळें, शिवाजीसारख्या नव्या राजपुरुषाला त्यांनीं अडथळा करावा हें योग्यच होतें. पुण्यापासून दहा वीस कोसांच्या आंत जेवढे म्हणून देशमुख होते, तेवढे प्रथम पादाक्रांत करणें शिवाजीला अवश्य झालें. कां की पातशाही सत्तेचे अगदी शेवटले असे सामर्थ्यवान् प्रतिनिधी म्हटले म्हणजे हे देशमुखच होते. तेव्हां प्रथम नवीन राज्य स्थापित करण्याच्या अवाढव्य कामीं मावळच्या देशमुखांचीं व्यवस्था लावणें शिवाजीला भाग पडलें तें रास्तच होतें. कोणत्या देशमुखाला शिवाजीनें केव्हां दस्त केलें किंवा बांधून घेतलें हें सांगतां येण्यास अद्याप काहींच आधार सांपडलेला नाहीं. इतकें मात्र खास आहे कीं, शके १५६० पासून पुढें पाच सहा वर्षे हा उपक्रम चालला होता. मावळांतील देशमुखांना दस्त करण्याचें कृत्य शके १५६८ त संपूर्ण झालें असावें. निश्चयानें ह्याच वर्षाच्या सुमारास झालें असें मात्र विधान करण्यास कांहीच विश्वसनीय आधार नाहीं. ग्रांट डफ कोणत्या तरी बखरीच्या आधारावर शके १५६८ त शिवाजीनें तोरणा किल्ला घेतला असें लिहितो, त्या अर्थी देशमुखांना दस्त करण्याचें काम शिवाजीनें शके १५६८ च्या सुमारास कदाचित् संपविलें असावें असें मीं संदिग्ध विधान केले आहे. शके १५६८ त शिवाजीनें तोरणा किल्ला घेतला हें विधान कोणत्या विशिष्ट बखरीच्या आधारावर आपण करतों ह्याचा खुलासा ग्रांट डफनें केला नाहीं. मला उपलब्ध असलेल्या कोणत्याहि बखरींत तोरणा किल्ला घेतल्याचा शक किंवा फारशी सन दिलेला नाहीं. यद्यपि ग्रांट डफच्या जवळ असलेल्या बखरींत हा शक किंवा सन दिलेला असला तरी तो इतर अस्सल प्रमाणांच्या अभावीं खरा कां धरावा हा माझा ग्रांट डफच्या लिहिण्यावर आक्षेप आहे. येथें बहिः प्रमाणांच्या अभावीं बखरींतील शक किंवा सन कोणत्या रूपानें दिला असल्यास विश्वसनीय मानावा, ह्यासंबंधीं विचार करणे योग्य दिसतें. बखरींतून एखाद्या प्रसंगाचा नुसता सन किंवा शक दिलेला असेल तर तो शक किंवा सन खरा धरून चालणें प्रायः उपयोगाचे नाहीं. सन आणि शक दिला असेल तर तो काल त्या प्रसंगाचा बव्हंशीं खरा मानावा. सन किंवा शक, अथवा सन आणि शक देऊन शिवाय तिथी किंवा चंद्र अथवा तिथी आणि चंद्र, दिला असला तर ती मित्ती बिनहरकत खरी मानावी. वरच्या सर्व बाबी देऊन, शिवाय वारहि दिला असेल तर ती मित्ती हटकून खरी आहे असें धरून खुशाल चालावें. हा विचार बखरींतील सन व शक ह्यासंबंधीं झाला. महजरांतील साक्षींत नुसता सन किंवा नुसता शक दिला असल्यास तो विश्वसनीय धरावा लागतो. महजरांचा उल्लेख ह्या स्थलीं करण्याचें कारण असें की, सतराव्या व सोळाव्या शतकांतील अनेक प्रसंगांच्या कालाचा निर्णय त्या वेळच्या महजरांतून दिलेल्या साक्षींतील मजकुरावरूनच प्रायः व्हावयाचा आहे, असा कित्येक महजर पाहून माझा ठाम ग्रह झालेला आहे. सतराव्या शतकांतील इतिहासासंबंधी बखरींतील मजकुराच्या हकीकतीची व कालाची विश्वसनीयता ताडून पहाण्यास जीं बहिःप्रमाणें आणावीं लागतात, त्यांत ह्या महजरांची मातब्बरी विशेष आहे. अठराव्या शतकांतील इतिहासाची निश्चितता ठरविण्यास जे सहाय्य अस्सल पत्रांचें होत असतांना आपण पहात आहों तेंच सहाय्य सतराव्या व सोळाव्या शतकांतील इतिहासाला अस्सल पत्रांच्या अभावीं ह्या महजरांतील मजकुरापासून अंशतः होणार आहे. आतां तोरणा किल्ला घेतल्याचें साल ग्रांट डफनें वरीलप्रमाणें लावून ठरविलेलें आहे असें दिसत नाहीं; व ह्याच कारणाकरितां तें मी खरें मानीत नाहीं. बाकी दादोजी कोंडदेवाच्या मृत्यूच्या अगोदर तोरणा किल्ला घेतला गेला असावा, हें निश्चित आहे. परंतु तोरणां अगोदर घेतला किंवा रायगड अगोदर बांधला हें पहाण्यासारखें आहे.