Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
शंकास्थान दुसरें.
ज्या वेळीं शिवाजीनें तोरणा किल्ला घेतला, त्या वेळीं शहाजी कोठे होता व काय काय करीत होता किंवा करण्याच्या बेतांत होता हे शोध करण्यासारखें आहे. ह्या वेळी शहाजी विजापूरास होता असें मल्हार रामराव चिटणीस (पृष्ठ ३०) व शिवदिग्विजयाचा कर्ता (पृ ११६) म्हणतात. ह्याला प्रत्यंतर पुरावा “विजापूरच्या पातशहांची बखर” ह्या ग्रंथांत आहे. ह्या ग्रंथाचे कांहीं भाग भारतवर्ष मासिक पुस्तकांत छापले आहेत. त्यांत ह्या ग्रंथाचें भाषांतरकर्तृत्व भारतवर्षकार सातारा येथील प्रभू पारसनवीस यांस देतात. काव्येतिहाससंग्रहकारांच्या दप्तरांतील ह्याच ग्रंथाची एक प्रत मजजवळ आहे. तिच्या शेवटीं हा ग्रंथ शके १७४४ च्या श्रावण व॥ ४ स पांडुरंग वासुदेव मामलतदार, पेठ विजापूर, ह्यांनीं मूळ फारशीवरून भाषांतरित केला असे स्पष्ट लिहिलेलें आहे; त्याअर्थी भारतवर्षकारांचें लिहिणें साधार नसावें अशी शंका येते. ह्या फारशी बखरींत “हिजरी सन १०५७ साली मुस्तफाखा याणें सारे अमीर बराबर घेऊन फौजसुद्धां कर्नाटकाची स्वारी केली; तीन तुकड्या करून सा-याचें पुढें शहाजी राजे व असदखा होते,” असे म्हटलें आहे. काव्येतिहाससंग्रहांतील ४३८ व्या यादींत म्हणजे शहाजीच्या बखरींत “हिजरी सन १०५७ त मुस्तफाखान यास फौज देऊन कर्नाटकास रवाना केलें. पेशजी शहाजी महाराज व असदखान यांस रवाना केलें,” असें लिहिलें आहे. हिजरी सन १०५७ शके १५६८ च्या माघांत सुरू होतो, त्याअर्थी शहाजीस शके १५६८ च्या पावसाळ्यानंतर कर्नाटकांत पाठविलें असावें असें “पेशजी” ह्या शब्दावरून ठरतें. अर्थात् शके १५६८ च्या सप्टेंबरच्या अगोदर शहाजी विजापुरास असावा असें कबूल करणें भाग पडतें. शहाजी विजापुरास असतांना तोरणा किल्ला घेतल्याची कागाळी त्याजकडे आली, त्याअर्थी तोरणा किल्ला शके १५६७ च्या शेवटीं किंवा शके १५६८ च्या आरंभी शिवाजीनें घेतला असावा, हें जें ग्रांट डफ म्हणतो त्याला किंचित् बळकटी येते. पहिल्या शंकास्थानांत उल्लेखिलेल्या दादोजी कोंडदेवाचा महजर शके १५६८ च्या वैशाखांत लिहिला गेला त्याअर्थी तोरणा किल्ला घेण्याच्या वेळीं व शिवाजीची कागाळी शहाजीच्या कानी जाण्याच्या वेळीं दादोजी कोंडदेव जिवंत होता व तो शके १५६८ तच मेला असल्यास त्या वर्षाच्या शेवटीं मेला असावा असा तर्क करावा लागतो. शिवदिग्विजयांत (पृष्ठ ११९) दादोजी शके १५६२ विक्रमनामसंवत्सरीं वारला म्हणून म्हटलें आहे. परंतु शके १५६२ त विक्रम संवत्सर नव्हता व शके १५६८ त दादोजीनें एक महजर लिहिला त्याअर्थी ही मित्ती खोटी आहे. खरी मित्ती शके १५७२ विकृति नाम संवत्सर म्हणजे इ. स. १६५० असल्यास नकळे. शहाजी कर्नाटकाच्या स्वारीस गेल्यावर त्याचें व नबाब मुस्ताफाखा याचें वांकडें पडून युद्ध झालें. त्यांत शहाजीचा मोड होऊन बाजी घोरपडे यानें हिजरी १०५७ च्या १५ रजबी (विजापूरच्या पातशहांची बखर, प्रकरण सहावें) म्हणजे शके १५६९ च्या श्रावण व॥ २ स शहाजी महाराजाला धरून मुस्तफाखाच्या स्वाधीन केलें. शहाजीचा मित्र शिद्दी रेहान याचें व मुस्ताफाखा याचें वाकडें असल्यामुळें शहाजीचें व मुस्तफाखाचेंहि वांकडेंच होतें. शिवाजीनें तोरणा किल्ला घेतल्यावर लवकरच शहाजी कर्नाटकच्या स्वारीस निघून गेला. परंतु शिवाजीच्या बंडाला शहाजीची फूस, कदाचित् मदत, असावी, अशी जी शंका शहाजी विजापुरास असतांना आली ती शके १५६९ त तरी अगदीं सत्यप्राय भासूं लागली. कारण इकडे शिवाजीनें ज्याप्रमाणें राजरोस बंडाचा झेंडा उभारला होता.