Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

शंकास्थान तिसरें.
शके १५८१ पर्यंत तपशिलाने ज्याविषयीं माहिती बखरींतून दिली आहे असे प्रसंग म्हटले म्हणजे (१) शिवाजीची व तुकारामरामदासांची भेट, (२) चंद्रराव मो-याचें पारिपत्य व (३) अफजुलखानाचा मोड, हे तीन होत. ह्या तीन प्रसंगांत जो तपशील दिलेला आहे तो कितपत विश्वसनीय आहे, व त्या तपशिलांपासून विशेष ऐतिहासिक माहिती काय मिळण्यासारखी आहे हें ह्या शंकास्थानांत पहावयाचें आहे.

तुकारामबोवांच्या भेटीचा जो वृत्तांत समप्रकरणात्मक चरित्रांत दिला आहे त्यावरून असें दिसतें की, (१) बोवांच्या कथेला पुण्यास शिवाजी एकदां गेला होता व त्यावेळीं चाकणच्या दोन हजार पठाणांनीं शिवाजीला धरण्याचा प्रयत्न केला, व (२) रामदासस्वामींचे स्वप्नांत दर्शन झाल्यावर तुकोबाला शिवाजीनें पत्र पाठविलें व त्या पत्रांत तुकोबाने रामदासाला गुरू करा असा शिवाजीस उपदेश केला. रामदासानें शिवाजीस उपदेश शके १५७१ च्या वैशाख शु॥ १० स केला हें मागे सांगितलेंच आहे. तेव्हां तुकारामाला पत्र शके १५७१ च्या वैशाखाच्या आधीं कधीं तरी पाठविलें असलें पाहिजे. तुकाराम शके १५७१ च्या माघ व॥ ६ स वारले, त्या अर्थी तुकारामाला शिवाजीनें शके १५७१ च्या वैशाखाच्या आधीं कधीं तरी पत्र पाठविलें असेल हें संभवतें व बखरकार कांहीं संभवनीय च विश्वसनीय हकीकत सांगत आहे असा मनाचा ग्रह होतो. बखरकारानें तुकारामाचें उत्तरहि आपल्या बखरींत दिलें आहे. त्या उत्तरांतील मजकूर ऐतिहासिक संभवनीयतेच्या कसोटीला कितपत जुळतो तो पाहूं. बखरींत जें सबंध पत्र छापिलें आहे तें तुकारामाच्या गाथेंतून घेतलें आहे. त्या पत्रांत इतक्या गोष्टींचा उल्लेख केला आहेः-(१) शिवाजीला भूपति हें विशेषण दिलें आहे; (२) शिवाजीला छत्रपति म्हणून म्हटले आहे; (३) प्रतिनिधि, मुजुमदार, पेशवे, सुरनीस, चिटणीस, ढबीर, राजाज्ञा, सुमंत, सेनापती, पंडितराय, वैद्यराज, इतक्या अधिका-यांचीं सामान्यनामें उच्चारिलीं आहेत; व (४) भूषणकवीचा उल्लेख केला आहे. ह्या पत्रांत शिवाजीला भूपति हें विशेषण दिलें आहे तें रास्तच आहे. शके १५७१ च्या वैशाखाच्या आधीं शिवाजी छत्रपती ह्या नांवानें प्रसिद्ध होता किंवा कसें हे मात्र शोध करण्यासारखें आहे. शके १५७१ त रामदासानें शिवाजीस वांई मुक्कामी पाठविलेल्या पत्रांतहि छत्रपति हा शब्द आलेला आहे, (माडगावकरांनी छापिलेले स्वामीचे समग्र ग्रंथ, पृष्ठ ७७०); तेव्हां हीं जर पत्रें खरीं असतील, तर शके १५७१ च्या वैशाखाच्या आधीं शिवाजीला छत्रपति ही संज्ञा निदान साधुमंडळांत तरी लावू लागले होते एवढें म्हणणें भाग पडतें. छत्रपति ही संज्ञा त्या वेळीं शिवाजीला लावली जात होती ही गोष्ट एकदा मनांवर ठसवून घेतली म्हणजे प्रतिनिधि, राजाज्ञा वगैरे अधिकारी अथवा अष्टप्रधान शके १५७१ च्या वैशाखाच्या आधीं शिवाजीनें नेमिले होते, ह्या विधानाचा अंगीकार करावा लागतो. व शेवटीं शके १५७१ अगोदर भूषणकवि शिवाजीच्या पदरीं राहिला होता हीहि गोष्ट संभवनीय व विश्वसनीय मानावी लागते. ह्या तिन्ही गोष्टी विश्वसनीय मानल्या म्हणजे शके १५७१ त शिवाजीची शक्ति किती वाढली होती ह्याचा अंदाज होतो व विजापूरकरांसारख्या गचाळ व गैदी दरबारांतहि शिवाजीच्या परिपत्याची विवंचना त्या वेळीं सुरू झाली ती रास्त होती असें कबूल करावें लागतें. पुण्यास झालेल्या तुकारामाच्या कथेच्या वेळीं चाकणहून दोन हजार पठाणांच्या स्वारीचा काल अदमासानें बसवतां येण्यासारखा आहे. फिरंगोजी नरसाळ्यानें चाकणचें ठाणें शिवाजीच्या स्वाधीन करण्याच्या पूर्वी ही गोष्ट झाली असावी. रामदासाच्या व तुकारामाच्या पत्रांतून वर लिहिल्याप्रमाणें ऐतिहासिक माहिती सापडतें ही पत्रे देतांना बखरकारांनीं जी स्वतःची मखलाशी केली आहे ती मात्र वारंवार बहुत चुकीची असते. उदाहरणार्थ, चाफळास स्वामींचे दर्शन प्रथम झालें नाहीं तेव्हां शिवाजी प्रतापगडास निघून गेला म्हणून बखरकार निर्धास्तपणे सांगतात.