Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

ह्या वर्षदीडवर्षाच्या अवधींत शिवाजीनें बारा मावळें काबीज करण्याचा उपक्रम केला, ती कशी काबीज केलीं ह्याचा खुलासा सभासदानें व मल्हार रामरावानें केला आहे. “मावळे देशमुख बांधून, दस्त करून, पुंड होते त्यांस मारिलें,” असा सभासदाचा खुलासा आहे. “मावळें सरदारांस मसलतींत घेऊन, त्यांस अनुकूल करून घ्यावें, त्यांस पत्रे लिहावीं व भेटावें, असें करूं लागलें,” म्हणून मल्हार रामराव लिहितो (पृष्ठ ३०) मावळांतील जे देशमूख शिवाजीला अनुकूल झाले त्यांस त्यानें बांधिलें म्हणजे आपल्याला बांधून घेतलें, जे प्रतिकूल होते त्यांस नरम केले, व जे केवळ पुंडाई करून होते त्यांस जिवें मारिलें. बारा मावळें काबीज करण्याचा हा असा प्रकार होता. देशमुखांना अनुकूल करून घेण्यांत ज्या राजकार्यकुशल मुत्सद्याचा उपयोग झाला, त्याला डबीरीचा हुद्दा देणें अवश्य झालें. ज्या हुद्देदारानें त्यांस दस्त केलें त्यास मुख्य प्रधानकी मिळाली; आणि ज्या लहानशा सैन्याच्या जोरवर पुंडांना जमीनदोस्त केलें त्या सैन्याची व्यवस्था ठेवण्याकरितां एक सबनीस नेमावा लागला. येणेंप्रमाणें बारा मावळें काबीज करतांना, हे हुद्देदार साहजिकपणेंच अस्तित्वांत आले. हीं बारा मावळें काबीज करण्याचें काम शके १५६० च्या अखेरीस सुरूं झालें. तें चाललें असतांना, शिवाजी शके १५६३ त विजापुरास गेला व तेथें असतांना पातशहाशीं उद्दामपणाची बालिश वर्तणूक त्याच्या हातून झाली. शके १५६० त जें उद्दाम कृत्य मावळांत सुरूं झालें होतें, त्याचीच दर्शक ही विजापुरांतील शिवाजीची वर्तणूक होती, हें मनुष्यस्वभावाच्या व विशेषतः बालस्वभावाच्या अनुरूपच होतें. मुख्य प्रधान, अमात्य, युक्त्याभिज्ञ व सेनालेखक ह्या चार हुद्देदारांचा दर्जा केवळ लष्करी होता हें ध्यानांत ठेवण्यासारखें आहे. मुलकी व न्यायखात्यांतील हुद्दे उत्पन्न करण्याची आवश्यकता शिवाजीला शके १५६० पासून शके १५६८ पर्यंत भासली नाहीं. तसेंच किल्ल्यांवरील नामजाद लोक ठेवण्याचीहि जरूरी अद्यापपर्यंत पडली नव्हती. कारण, शिवाजीच्या ताब्यांत हा काळपर्यंत एकहि किल्ला आला नव्हता. किल्ल्यांखेरीज करून बाकीचा बारा मावळांतील बहुतेक प्रांत शिवाजीनें काबीज केलाः- काबीज केला म्हणजे बारा मावळांतील देशमुखांना कांही अटीनें बांधून घेतलें. आतां ही बारी मावळें कोणतीं हें नीट समजून घेतल्यानें ह्या विवेचनावर जास्त प्रकाश पडणार आहे. “बारा मावळ पुण्याखालीं, बारा मावळ जुन्नरखालीं” असें तानाजी मालुस-याच्या पवाड्यांत म्हटलें आहे. हिरडस मावळांतील बांदल देशमुखांच्या शके १५३६ तील एका सनदपत्रांत बारा मावळें हे दोन शब्द मी भोर येथें रा. रा. भाऊराव भिडे यांच्या येथें वाचले आहेत. ह्यावरून जुनरापासून चाकणापर्यंत बारा मावळें व पुण्यापासून शिरवळपर्यंत बारा मावळें अशीं एकंदर चोवीस मावळें शिवाजीच्या वेळीं प्रसिद्ध होतीं असें दिसतें. जुनरापासून चाकणापर्यंत असलेलीं १ शिवनेरी, २ जुनेर, ३ मिननेर, ४ घोडनेर, ५ भीमनेर, ६ भामनेर, ७ जामनेर, ८ पिंपळनेर, ९ पारनेर, १० सिन्नर, ११ संगमनेर, १२ अकोळनेर, अशीं बारा नेरे, नहरे किंवा मावळें प्रसिद्ध आहेत. येथे जुन्नर ह्या नावांसंबंधानें संक्षिप्त उल्लेख करणें जरूर आहे. दक्षिणच्या इतिहासांत डॉ. भांडारकर म्हणतात की जुन्नर हा शब्द जुन्नर, जुननरे, जूर्णनगर व जीर्णनगर, अशा परंपरेनें जीर्णनगर म्हणजे जुनें नगर ह्या शब्दाचा अपभ्रंश असावा. माइया मतें जुन्नर, हा शब्द शिवनेर, भीमनेर वगैरे शब्दाप्रमाणें जुन्नर, जुन्नेर, व जीवनीर अशा परंपरेनें जीवनीर ह्या शब्दाचा अपभ्रंश असावा. जीव हें जुन्नराजवळील एका ओढ्याचें नांव असावें. जुन्नराच्या पश्चिमेस व नाणे घाटाच्या दक्षिणेस जीवधन नांवाचा एक किल्ला आहेच. जीवधन हा किल्ला व जीवनीर हें गांव ह्यांना जीव नदीपासून नामाभिधान प्राप्त झालें असावें. वर दिलेलीं नावें जुन्नराखालीं मोडणा-या बारा मावळांचीं होत. पुण्याखालील बारा मावळें म्हटली म्हणजे १ अंदरमावळ, २ नाणेमावळ, ३ पवनमावळ, ४ घोटणमावळ, ५ पौड खोरें, ६ मोसेंमावळ, ७ मुठेंमावळ, ८ गुंजणमावळ, ९ वेळवंडमावळ, १० भोरखोरें, ११ शिवतरखोरें, १२ हिरडसमावळ. हीं बारा होत.