Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
शिवाजीच्या दरबारी शास्त्री, पंडित, वैदिक वगैरे विद्वान् लोक असत, असेंहि रामदास म्हणतो. भूषणकवि शिवाजींच्या पदरी होता, म्हणून तुकारामानें आपल्या पत्रांत म्हटलें आहे. स्वतः शिवाजीनें कांही अभंग व पदेंहि रचिलीं होतीं (रामदासाचें चरित्र पृष्ठ २९५). न्यायमनसुबीचीं कामें शिवाजी स्वतः पाही, असें वाई येथील तात्यासाहेब पंताच्या दफ्तरांतील कांहीं कागदांवरून म्हणतां येतें. सारांश, शिवाजी अक्षरशून्य होता म्हणून ग्रांट डफ म्हणतो तें अगदीं निराधार आहे, असें मला वाटतें. शिवाजीनें केलेल्या पदांत उर्दू शब्द बरेच आहेत ह्यावरून शिवाजीस कदाचित् फारशी व निखालस उर्दू येत होतें असेंहि विधान करण्यास अवकाश होतो. पुराणांतील कथा व वेदान्त, तसेंच गायन व अश्वशिक्षा, ह्या विद्याहि शिवाजीला अवगत होत्या. तात्पर्य, पृथ्वीवरील इतर कित्येक महापुरुषांप्रमाणेच शिवाजीहि विद्यासंपन्न होता ह्यांत संशय नाहीं. शिवाजींनें रायगडावर हिराजीच्या हातून शंकराचें भव्य देवालय बांधविलें आहे; त्याच्या देवडीवर दोन श्लोक लिहिले आहेत ते संस्कृतांत आहेत, ह्यावरून शिवाजीला संस्कृताचा अभिमान होता व ती भाषा तो जाणत असे असे दिसतें. शिवाजी संस्कृतज्ञ होता हें त्याच्या आज्ञेवरून राजव्यवहारकोश निर्मिला गेला ह्या एका गोष्टीवरूनच सिद्ध आहे. मराठे लोकांना लिहिणेंवाचणें आपल्या इभ्रतीला शोभण्यासारखें नाहीं असें वाटे, म्हणून ग्रांट डफ लिहितो तें तो काय म्हणून लिहितो तें कळत नाहीं. मराठे लोक शास्त्रीपंडितांसारखे गाढे विद्वान् नाहींत ही गोष्ट कबूल आहे. परंतु सामान्य लिहिणेंवाचणें व हिशेब ठेवणें त्यांच्यापैकीं पुष्कळ लोकांना सध्यां येतें व पूर्वीहे येत होतें ही सर्वमान्य गोष्ट आहे. मराठे म्हणजे कुणबी नव्हेत हें येथें ध्यानांत ठेविलें पाहिजे. कुणबी प्रायः अक्षरशून्य असतात हें सर्वत्र महशूर आहे. परंतु अस्सल मराठे क्षत्रिय जे आहेत त्यांना स्नानसंध्या व लिहिणेंसवरणें अवश्य मानिलेलें आहे. तानाजी मालुस-याच्या पवाड्यांत गुंजाळ नदीवर तानाजी माध्यान्ह संध्या करावयास गेला म्हणून तुळसीदासानें म्हटलें आहे. शिवाजीच्या विद्यासंपन्नतेसंबंधीं हा इतका वाद बस आहे. शामराज नीळकंठ यास शके १५६५ त पेशवाई सांगितली त्यावेळी सोनोपंत डबीरीवर व बाळकृष्णपंत मजमूवर होते. शके १५६७ त सोनोपंत वारल्यावर किंवा घरी बसल्यावर, सोनोपंताचा मुलगा निळी सोनदेव यास पार्थिवनाम संवत्सरीं म्हणजे शके १५६७ त मजमू सांगितली (शिवदिग्विजय १८६). बाळकृष्णपंत वारल्यावर किंवा घरीं बसल्यावर त्याच वेळीं हशमांची सबनिशी रघुनाथ बल्लाळ कोरडे याजकडे होती. शिवाजीजवळ ह्या वेळीं घोडदळ बहुतेक नसल्यासारखेंच असल्यामुळें घोडदळाची सबनिशी अद्याप अस्तित्वांत आलीच नव्हतीं. पायदळावरच समाधान मानून शिवाजीला शके १५६८ पर्यंत रहावें लागलें असे वाटतें. येणेंप्रमाणें शके १५६८ पर्यंत शिवाजीनें आपल्या हाताखालील हुद्देदारांची व्यवस्था कशी लाविली त्याचें थोडेबहुत स्पष्टीकरण झालें. आतां शके १५६८ पर्यंत शिवाजीनें जे हे इतके हुद्दे निरनिराळ्या कर्त्यासवर्त्या पुरुषांना दिले तें निव्वळ डामडौलाकरितां व मुसलमानीं दरबारच्या अनुकरेणच्छेनेंच दिले नसून वेळोवेळी त्या त्या हुद्देदारांची अवश्यकता भासली असावी म्हणूनच दिले असले पाहिजेत, हें उघड आहे. कोणीहि विचारी पुरुष मुख्य प्रधान, अमात्य, युक्त्याभिज्ञ व सेनालेखक, असे राजपुरुष आपल्या पदरीं बाळगूं लागला म्हणजे तो कांहीं तरी राजकारणांत गुंतला असावा असा निश्चयानें तर्क करावा लागतो. सैन्य असल्याशिवाय सबनीस येत नाहीं. बाहेर कांहीं राजकारण उत्पन्न झाल्याशिवाय युक्त्याभिज्ञ म्हणजे डबिराची गरज नाही; जमाखर्च असल्यावांचून अमात्याची जरूर नाही; व स्वारीशिकारीशिवाय मुख्य प्रधानाचेंहि कांहीं काम नाहीं. तेव्हां शके १५६८ पूर्वी शिवाजीनें किंवा शिवाजीच्या मसलतगारांनीं कांहीं तरी राजकारण उपस्थित केलें असलें पाहिजे. ग्रांट डफ शिवाजीच्या पराक्रमाचा प्रारंभ शके १५६८ पासून करतो, व त्याच्या आधीं शिवाजी कोंकणांत दरवडे घालीत असावा, असा निसटता उल्लेख करून पुढें जातो. तेव्हां त्याच्या ग्रंथांत शके १५६८ पूर्वीची शिवाजीसंबंधीं माहिती बिलकुल मिळावयाची नाहीं, हें स्पष्टच आहे बाकी. शके १५६८ पूर्वी शिवाजीनें राजकारण करण्यास सुरुवात केली होती ह्यांत काडीमात्र संशय नाहीं. सभासदी बखरींत ह्या शके १५६८ पूर्वीच्या राजकारणासंबंधी उडता उल्लेख आहे. “येताच बारा मावळे काबीज केली,” म्हणून सभासद लिहितो (सभासद ६). “शके १५६२ यांत या मसलतीचा आरंभ करिते झाले”, असे मल्हार रामराव म्हणतो (मल्हार रामराव ३०). ‘येताच’ म्हणजे बेंगरुळाहून येतांच, बारा मावळें काबीज केलीं असा सभासदाचा आशय आहे. बेंगरुळाहून शिवाजी शके १५६० च्या शेवटीं आला व शके १५६२ सालच्या अखेरीपर्यंत तो पुण्यास होता, हें मागें दाखवून दिलेंच आहे.