Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
(४) पुणें व सुपें प्रांतांतील व इतरत्र शके १५२२ पासून १५५८ पर्यंत होनाप्पा देशपांडे, मोरो तानदेव, (रायरी येथील बखर) श्रीनिवासराव वगैरे पुंडांनीं बंडाळी करण्याचा अभ्यास सुरू केला होता. (५) जुन्नरापासून पन्हाळ्यापर्यंतचे शितोळे, ढमढेरे, बांदल, शिरके, निंबाळकर, जाधव, घाटगे, घोरपडे, वगैरे देशमुख व त्यांच्या बरोबरीचे देशपांडे एकमेकांशी सदा कांही तरी कुरापत काढून झुंजत असत. त्यामुळें महाराष्ट्राच्या पश्चिम भागीं सर्वत्र गोंधळ माजून राहिला होता. (६) विजापूरच्या दरबारांतील मुत्सद्दी मंडळांत व सरदार मंडळांतहि बेबनांव बहुत झाला होता (शहाजीची बखर, का.).
(७) दिल्लीच्या मोंगलांनी विजापूरकरांच्या राज्यांत बखेडा व फितूर करण्यास तत्रस्थ प्रजेला उत्तेजन दिलें होते
(८) दादोजी कोंडदेव, शहाजी व इतर कारकून मंडळी विजापूरच्या सत्तेचे मोठेसे भक्त होते असें नव्हतें.
(९) संतमंडळींचाहि एकंदर मनोदय यवनांच्या सत्तेच्या विरुद्ध होता. (१०) विजापूरचे पातशहाहि नरम होऊन त्यांच्यांतील कडवें यवनत्व नाहींसें झालें होतें. विजापूरच्या खुद्द आरकांत दत्तात्रयाचें देऊळ बांधिलें होतें, म्हणजे राम व रहिम एक आहेत अशी विचारी मुसलमानांची खात्री झाली होती. (११) शहाजीच्या पदरीं चालतें बोलतें सैन्य होतें. (१२) फलटणचे निंबाळकर, शिरकाणांतील शिरके, कोंकणांतील सोडवळकर व कोडवळकर, वगैरे मंडळींना आपापलीं वैरें साधून घेण्याला शिवाजीला मदत करणेंच अवश्यक झालें होतें. हीं अशी अनेक सामान्य कारणें शिवाजीला प्रोत्साहित करण्यास साहाय्यभूत झालीं होतीं. शहाजीनें शिवाजीला बेंगरुळाहून पुण्यास पाठविलें त्यावेळीं पेशवे, मुजुमदार, डबीर व सबनीस अशी मुत्सद्दी मंडळीं भावीं संस्थानाच्या उपयोगी पडण्याजोगी शिवाजीबरोबर होती. ह्यावरून असें अनुमान होतें कीं, मावळांत स्वतंत्र राज्य स्थापावें अशी शहाजीची दादोजी कोंडदेवाच्या सल्यानें मसलत झाली होती. ही मसलत करण्यास शहाजीला कारण असें झालें कीं, कर्नाटकांत अफजलखान, मालोजी घोरपडे वगैरे विजापूरचे सरदार द्वेषानें शहाजीचें पाऊल स्थिर करूं देत ना. तेव्हां स्वदेशांत म्हणजे सह्याद्रीच्या बंधा-याच्या लगत्यास साधल्यास कोठें तरी स्वतंत्र सत्ता स्थापित करावी म्हणजे दाहीं दिशांनीं जन्मभर वणवण करींत हिंडण्याचा प्रसंग पुनःपुन येणार नाहीं, असा शहाजीचा विचार झाला होता असें दिसतें. स्वतंत्र संस्थान स्थापण्याचें शहाजीनें स्वतःच्या शिरावर न घेतां शिवाजीच्या व दादोजी कोंडदेवाच्या शिराबर टाकण्याचें कारण असें कीं, दादोजी कोंडदेवाला यश आलें नाहीं तर त्यांची बाजू सावरण्यास आपण विजापूरच्या दरबारीं चिकटून असावें. शके १५६३ च्या हिवाळ्यांत पुण्यास आल्यावर शिवाजीनें लवकरच स्वतंत्र राज्याधिकार चालविण्यास सुरुवात केलीं असें म्हणण्यास आधार आहे. शिवदिग्विजयाच्या १८६ व्या पृष्ठावर शामराज निळकंठ राझेकर यांस पेशवाई पुणें मुक्कामीं सुभानुनाम संवत्सरीं म्हणजे शके १५६५ त शिवाजीनें दिली असें म्हटलें आहे. शामराज निळकंठ शिवाजीबरोबर बेंगरुळाहून शके १५६० तच आला होता. परंतु पेशवाईची सनद म्हणजे राजपत्र त्याला शके १५६५ त मिळालें. ह्यावरून असें निष्पक्ष होतें कीं, पुणें व सुपें ह्या दोन प्रांतांवर अम्मल करीत असतांना, अथवा खरें म्हटलें असतां केवळ पुणें प्रांतांवर अम्मल करीत असतांना (कारण सुपें प्रांत संभाजी मोहित्याकडे होता), शिवाजीला पेशवाईच्या अधिकारावर अंम्मलदार नेमण्याची आवश्यकता भासली. शके १५६५ त शिवाजीचें वय १६ वर्षांचे होते. त्यावेळीं महाराष्ट्रांत जी कांहीं विद्या मिळण्यासारखी होती ती शिवाजीला मिळाली होती. शिवाजी लिहिणें वाचणें वगैरे सर्व कांही व्यावहारिक विद्या शिकला असून त्याला संस्कृताचीहि व्युत्पत्ति सामान्यशी येत होती. ह्या गोष्टीचा विस्तृत उल्लेख शिवदिग्विजयांत व मल्हाररामरावकृत चरित्रांत यथास्थित केला आहे. रामदासानें शिवाजीला जें पत्र पाठविलें आहे, त्यांत त्याला त्यानें 'जाणता', 'सर्वज्ञ' वगैरे विशेषणें दिलीं आहेत. तुकारामानेंहि शिवाजीस जें पत्र पाठविलें आहे त्यांतहि शिवाजीला असाच बहुमानपुरस्सर गौरव केला आहे. वामनपंडितांनीं तर 'शिवनिर्विशेषं' ह्या पदाचा उपयोग करून शिवाजीचें व रामदासाचें ज्या अर्थी तादात्म्य वर्णिलें आहे त्या अर्थी शिवाजी सुशिक्षित होता हे कबूलच करावें लागतें.