Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

शंकास्थान पहिलें.
ह्या शंकास्थानांत शिवाजी पुण्यास दादोजी कोंडदेवाकडे रहाण्यास आल्यापासून तोरणा किल्ला घेईतोपर्यंत शिवाजीच्या चरित्रांतील प्रसंगाचा सालवार इतिहास बखरीतून कसा दिला आहे व डफच्या ग्रंथांत त्याचें सालवार वर्गीकरण कोणत्या भक्कम आधारावर रचिलें आहे तें पहावयाचें आहे. आपल्या वयाच्या १२ व्या वर्षी शिवाजी शहाजीस बेंगरुळास भेटण्यास गेला होता असें सभासद [पृष्ठ ६] लिहितो, म्हणून शके १५६० हें साल शिवाजीच्या हालचालीच्या प्रारंभाचें असावे असें मी गृहीत धरतों. १५५८ त शहाजहान व महमद आदिलशहा ह्यांचा तह झाल्यावर शहाजी विजापूरकरांचा मनसबदार बनला त्यावेळीं शिवाजी शहाजीबरोबर कदाचित विजापुरास गेला असेल असा अंदाज करतां येईल. १५५९ त शहाजी कर्नाटकच्या स्वारीस गेला असतां, शिवाजी दादोजी कोंडदेवाकडे पुण्यास आला असें वाटतें. व पुण्यास वर्ष सहा महिने राहून १५६० त शिवाजी शहाजीस भेटण्यास बेंगरुळास गेला असें सभासद म्हणतो, तें कदाचित् खरे असेल असें म्हटले तर चालण्यासारखें आहे. दादोजी कोंडदेवाकडे पुण्याकडील कारभाराचें जोखीम असल्यामुळें, दादोजी शिवाजीला घेऊन पांच सहा महिन्यांनी पुण्यास परतला असावा. व पुण्यास आल्यावर शहाजीच्या सांगण्याप्रमाणें दादोजीनें शिवाजीचें पहिले लग्न शके १५६२ च्या वैशाखांत पुण्यांतच केलें. [शिवदिग्विजय पृष्ठ ९९]. बेंगरुळाहून पुण्यास येतांना शहाजीनें शिवाजीबरोबर, शामराव निळकंठ पेशवे, बाळकृष्णपंत मुजुमदार, सोनोपंत डबीर, व रघुनाथ बल्लाळ सबनीस, हे कारकून लोक दिले होते. [सभासद ६, चिटणीस ३०, चित्रगुप्त ३]. बाळकृष्णपंत नारोपंताचा चुलता होता व बाबुराव मुजुमदारहि शिवाजीबरोबर आला म्हणून चित्रगुप्त म्हणतो, परंतु बाबुरावाचें नांव चित्रगुप्तानें पुढील पारिग्राफांत गाळले आहे, व त्यावरून हें पाचवें नांव आगंतुक असावें असें वाटतें. शिवाजीचें पहिलें लग्र झाल्यानंतर म्हणजे अर्थात् दुसरा पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी [शिवदिग्विजय पृष्ठ १११]. म्हणजे १५६३ च्या वैशाख-जेष्ठांत शहाजी विजापुरास आला व पातशहाच्या आग्रहास्तव त्यानें शिवाजीचें दुसरें लग्र केलें आणि चार महिने पावसाळा विजापुरास काढून, व शिवाजीला पुण्यास पाठवून देऊन आपण कर्नाटकात चालता झाला. येणेंप्रमाणें शिवाजी शके १५५८ त पहिल्यांदा व शके १५६३ दुस-यांदा असा दोन वेळा विजापुरांत जाऊन राहिला असावा. पहिल्या खेपेस शिवाजी आठ वर्षांचा असल्यामुळें त्याच्या हातून कसायाचें पारिपत्य व पातशहाची बेअदवी झाली असेल हें संभवत नाहीं. तेव्हां दुस-या खेपेस म्हणजे शके १६६३ त चौदा वर्षांचा असतांना शिवाजीच्या हातून हा वरकरणी दिसणारा उद्दामपणा झाला असावा असा तर्क आहे. हा उद्दामपणा न्याय्य होता हें दाखवून देण्याकरितां बखरनवीस मुसलमानी न्यायाचे दोन मासले देतात. पैठण येथील एका स्त्रीस एका मुसलमान छाकट्याने बाटविण्याचा प्रयत्न केल्यासंबंधींचा पहिला मासला आहे [शिवदिग्विजय १००-१०१]. व दुसरा चतुर साबाजीनें केलेल्या सांको पांझी न्यायासंबंधींचा आहे [शिवप्रताप पृष्ठ ३९ ते ४२]. मुसलमानी राज्यांत न्याय अपवादात्मक असे, असा झोंक ह्या बखरनविसांच्या लिहिण्याचा आहे. स्त्रियांवर बलात्कार करणें, हिंदूचा खून करणें व देव फोडणें, गाई मारणें, धर्म बाटविणे, वगैरे अनन्वित प्रकार मुसलमानी राज्यांत हरहमेश होत व बहुशः जिरत असत. कोंकणांत व देशावर केळकर, पळूसकर, पिसाळ, जाधव, दसपुत्रे वगैरे शेकडों ब्राह्मण व मराठे, यवनी धर्माची दीक्षा जुलमानें किंवा लालुचीनें घेऊन चुकले होते. देशप्रिय व धर्मप्रिय लोकांना हा प्रकार अर्थातच निंद्य वाटे. शिवाजीला व त्याच्या बरोबरच्या इतर अनुयायांनाहि तो प्रकार निंद्यच वाटला असावा हें उघड आहे. त्याचेंच प्रदर्शन हा उद्दामपणा होय. शके १५६३ च्या हिवाळ्यांत शिवाजी पुण्यास आला तो पुन्हां विजापूरच्या दरबारी सेवक या नात्यानें गेला नाहीं. विजापूरचा तिटकारा येण्याला शिवाजीला यवनाच्या धर्माचा द्वेष तर कारण झालाच. परंतु इतरहि आणीक कारणें पुष्कळच झालीं. (१) महाराष्ट्र हें आपलें स्वराज्य असें त्याच्या उपदेशकांना वाटत होतें. [चिटणीस २८]. [२] पुणें व सुपें हे प्रांत निजामशाहींतील विजापूरकरांकडे नव्यानेच गेल्यामुळें त्यावर आदिलशहांची जितकी गच्च मिठी बसावी तितकी बसली नव्हती. (३) शहाजीच्या तर्फे पुण्याचे जवळील ओसाड मावळांची लावणीसंचणी दादोजीनें स्वतः करविल्यामुळें तेथें आदिलशाही अम्मल साक्षात् दृष्टोत्पत्तीस येत नव्हता.