Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

[ १ ] शिवदिग्विजयांतील मजकुराचा अनुक्रम.

येणेप्रमाणें ह्या सहा बखरींतील मजकुराचा अनुक्रम आहे. एका बखरींतील अनुक्रमाचा मेळ दुस-या बखरींतील अनुक्रमाशी बसत नाही हें वरवर पाहणा-यालाहि दिसून येईल. पैकीं शिवाजीप्रतापांतील मजकूर अगदीच तुटपुंजा व अपुर्ता असून गप्पांनी भरला आहे. चित्रगुप्तानें सभासदी बखरींतील मजकूर बहुतेक जशाचा तसा उतरला आहे. रायरी येथील बखरींत कोणत्याच प्रसंगाचा सविस्तर वृतांत नाहीं व शेवटी तर बखरनविसानें मजकुराचा फारच संक्षेप व लोप केला आहे. बाकी राहिलेल्या तीन बखरीचा म्हणजे सप्तप्रकरणात्मक चरित्र, सभासदी बखर व शिवदिग्विजय ह्यांचाच तेवढा येथें विचार कर्तव्य आहे. ह्या तीन बखरींत मोठी उणीव म्हटली म्हणजे बहुतेक प्रसंगाचा शक ह्या बखरींत दिलेला नाहीं. 'नंतर','पुढें', वगैरे शब्दांनींच प्रसंगांचे पौर्वापर्य निश्चित करावयाचें आहे. वस्तुतः प्रसंग जसजसे घडले तसतसे वर्णन ह्या बखरनविसांनीं केलें असतें म्हणजे ‘नंतर’; ‘पुढें’, वगैरे शब्दांपासूनहि कलाचा बोध, दोन चार महिन्यांच्या चुकीनें, करून घेतां आला असता. परंतु पूर्वापार संगतीनेंच प्रसंग ह्या बखरींत वर्णिले आहेत असें निश्चयानें म्हणवत नसल्यामुळें प्रसंगाच्या कालाचें पौर्वापर्य केवळ अतःप्रमाणावरून निश्चित करतां येत नाहीं. तेव्हां पत्रें, यादी वगैरे बहिःप्रमाणांचा आधार घेऊन जो कालनिर्णय होईल तेवढाच खरा मानून स्वस्थ बसले पाहिजे, व ह्या कालनिर्णयाच्या आधारावर मागील व पुढील प्रसंगांचा धरमधोक्यानें कालनिर्णय केला पाहिजे. पुढें इतर विशिष्ट बहिःप्रमाण सांपडल्यास ह्या धरमधोक्यानें ठरविलेल्या कालनिर्णयांत थोडाफार फेरबदल होण्याचा संभव असतो. परंतु, बखरींतील मजकुराच्या कालनिर्णयासंबंधी निश्चयात्मक, चोख व विश्वसनीय विधानें कराण्याची ही अशी अडचण असल्यामुळें, प्रसंगांच्या कार्यकारणभावाचा अर्थात् कांहींच निर्णय करतां येत नाहीं. प्रसंगांचा कार्यकारणभाव व पौर्वापर्य अनिश्चित राहिल्यामुळें त्या प्रसंगांची उपयुक्तता व महत्त्व हीहि नीट ध्यानांत येत नाहींत. बखरींतील मजकुरापासून ऐतिहासिक बोधहि वाचकांना करून देतां येत नाहीं व तो करून देण्याचा आव घातला तर असंभाव्य गप्पांचें समर्थन केल्याचें श्रेय मात्र पदरीं पडतें. ह्या दोषाला शिवाजीचा प्रत्येक मराठी इतिहास व चरित्र पात्र झालेलें आहे हें तर स्पष्टच आहे; परंतु खुद्द ग्रांट डफचा इतिहास ह्या दोषाला अपवादक होईल असेंहि खात्रीनें सांगतां येत नाहीं. कां कीं (१) बखरींची नीट परिक्षा करून ग्रांट डफनें आपला इतिहास लिहिला नाहीं. (२) पत्रें यादी वगैरे खेरीज करून प्रसंगांचा कालनिर्णय त्यानें फारशी तवारिखांच्या प्रत्यंतर पुराव्यावरून केला आहे व प्रत्यंतर पुरावा बखरीच्या इतकाच अविश्वसनीय आहे; (३) व मिळालेल्या पत्रें यादी वगैरेंचाहि जसा उपयोग करून घ्यावा, तसा त्यानें करून घेतला नाहीं. ह्या तीन दोषांमुळे बखरींप्रमाणेंच डफचा इतिहासहि थोडाफार अविश्वसनीय आहे. शिवाजीचा इतिहास ग्रांट डफनें खालील लेखांच्या आधारानें लिहिलाः- (१) सभासदी बखर, (२) मल्हार रामरावकृत सप्तप्रकरणात्मक चरित्र (३) मो-यांच्या जवळील शिवाजीची बखर, (४) टॉमस कोट यानें भाषांतर केलेली बखर, (५) सर बारी क्लोजनें भाषांतर केलेली बखर, (६) कोल्हारच्या कुळकर्ण्याजवळील बखर, (७) खटावच्या देशपांड्याजवळील बखर, (८) काफीखान, (९) विजापूरच्या बखरीं, (१०) व इंग्रजी, पोर्तुगीज, मराठी व फारशी पत्रें यादी वगैरे दहाव्या वर्गांतील साधनांखेरीजकरून बाकींच्या साधनांच्या आधारानें लिहिलेला कोणताहि इतिहास फारसा विश्वसनीय नसतो हें मी वारंवार सांगत आलोंच आहे. तशीच ह्या बखरींची सूक्ष्म परीक्षा करून, डफनें आपला इतिहास लिहिला नसल्यामुळें त्याच्या ग्रंथाला बहुत अपूर्णता आली आहे. ती कशी आली आहें ह्याचें दिग्दर्शन मागें शिवाजीच्या बायकांसंबंधींचा विचार चालला असतांना थोडेंबहुत झालेंच आहे. ह्यापुढें हें दर्शन जास्त विस्तृत करून, ग्रांट डफच्या ग्रंथाची व बखरींची न्यूनता कित्येक शंकास्थानांत दाखवून देतों म्हणजे शिवाजीचा इतिहास विश्वसनीय असा लिहितां येण्यास अद्याप किती तरी सामुग्री जुळावयाची आहे, हें वाचकांच्या स्पष्ट ध्यानांत येईल व बखरींचें प्रामाण्याप्रामाण्य योग्य रीतीनें व्यत होईल.