Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ खमस अर्बैन मया व अल्लफ, सन ११५४ फसली,
अव्वल साल छ २२ रबिलाखर, २४ मे १७४४,
ज्येष्ठ वद्य ९ शके १६६६.

छ १ रमजान (२७ सप्टेंबर १७४४) चावड किल्ला फत्ते झाल्याचें वर्तान आलें. छ २५ सवाल (१९ नोव्हेंबर १७४४) हसडर किल्ला घेतल्याचें वर्तमान आलें. छ २६ सवाल (२० नोव्हेंबर १७४४) नानासाहेब व भाऊसाहेब व जनार्दनपंतसुध्दां स्वारीस निघाले. नानासाहेब हिंदुस्थानांत चालते झाले. भाऊसाहेब व जनार्दनपंत नाशिकाहून माहुलीस गेले. छ ५ मोहरम (२८ जानेवारी १७४५) बहिरवगड ऊर्फ खाप-या किल्ला घेतल्याची खबर आली. छ १८ मोहरम (१० फेब्रुवारी १७४५) भेलशास मोर्चे लाविले. छ २५ मोहरम (१७ फेब्रुवारी १७४५) गोपिकाबाई प्रसूत झाली. छ २५ मोहरम माघ वद्य ११/ १२ मंदवार ११ घटिका दिवसास माधवराव याचा जन्म मकरराशी होता. सफर महिन्यांत (मार्च १७४५) भेलशावर लढाई झाली. किल्ला घेतला. छ २९ सफर (२२ मार्च १७४५) वि॥ पिलाजी जाधवराव, भूपाळचा दोस्त महमद याचा नातू फैज महमद याशी तह होऊन निम्मे वांटणीचे पेशवे याजकडे महाल आले ते :- १ भेलसे, २ इच्छावर, ३ अष्टें, ४ सुजानपूर, ५ उदेपूर, ६ ताल, ७-११ जमोवार पंचमहाल, १२ शिकारखम, १३ ओडा, १४ वरशा, १५ उरया, ०॥० सिवणी निमे, असे साडेपंधरा महाल किल्ले वगैरेसुध्दां आले. दोस्त महमद यास फैज महमद व यसीत महमद व हियत महमद असे तिघे नातू होते. रबिलाखर महिन्यांत वैशाख शु॥ ४ बुधवारी (८ मे १७४५) बयाबाई भाऊसाहेब यांची कन्या इचें लग्न झालें. गंगाधर नाईक ओमकार यास दिली. छ २८ रबिलाखर (२० मे १७४५) भाऊसाहेब साता-यास गेले. छ १७ रबिलावल (९ एप्रिल १७४५) नानासाहेब यांनी भेलसे घेतल्याची खबर भाऊसाहेब यास आली. छ २८ रबिलावल रोजी (२० एप्रिल १७४५) नानासाहेब स्वारी करून परत आले. अंजनवेल उर्फ गोपाळगड शामळ जंजीरकर याजपासून माघ शु॥ २ भौमवारी (२३ जानेवारी १७४५) रात्रौ तुळाजी आंग्रे यांनीं घेतला. नंतर तुळाजी बिन कान्होजीराव यास सरखेलीची वस्त्रें दिली. रघोजी भोसले सालमजकूर अव्वल साली बरसातीकरितां व-हाडास जाऊन पर्जन्य समाप्त झाल्यावर आपला प्रधान भास्करपंतास व त्याचे बरोबरचे मानकरी वगैरे फौज वीस हजार देऊन बंगाल देशांत ओरिसा प्रांतांत पाठविलें. तेथें अल्लीवर्दीखान यानें कपटाशिवाय आपले कार्य साधावयाचें नाहीं हे जाणून तुचा आमचा तह आहे असें बोलून भास्करपंतास व त्याचे बरोबरचे मोठमोठे सरदार वीस असामी मेजवानीस बोलावून नेऊन एकाएकी मारेकरी घालून ते सर्व मारून टाकिले. बाकी राहिले लोक युध्द न करिता माघारे जाऊ लागले. त्यांतील कित्येक लोक निराळे सांपडले तेही गावकरी यांनी मारून टाकिले. यासमयीं कार्य सिध्दीस गेले नाहीं. सबब मराठे लोक आपला समय येण्याची वाट पाहात बसले. पुढें थोडे वेळानें अल्लीवर्दीखानाचे लष्करात अफगाण लोक होते ते कांही दगा करू लागले. त्यांचे बंदोबस्ताकरितां आपण फौज घेऊन जाऊन उरुष प्रांती हिंदू अधिकारी ठेविले. ही बातमी रघोजी भोसल्यास जासुदांनी कळवितांच त्यानें ओरिसा प्रांतीं स्वारी घालून, कित्येक परगणे घेऊन, बाकी मुलुखाची खंडणी तीस कोटी रुपये मांगू लागला. तेव्हां अल्लीवर्दीखानाने त्यास युक्तीनें भूलथाप देत देत कित्येक दिवस घालविले. नंतर अफगाण लोक स्वाधीन करून घेतल्यानंतर उलट्या गोष्टी सांगून अल्लीवर्दीखान युध्दास सिध्द झाला. पुढें युध्द होतां होतां मराठे लोकांचा मोड होऊन युध्द राहिले. कारण रघोजीस आपल्या मुलखांत जाण्याचे जरूर कारण लागलें, तें खाली लिहिलें आहे. देवगडचा गोंडवणांतील तक्ताधिपति मेल्यानंतर राजपुत्र भांडू लागले. ह्यांतील वलीशा ह्मणून होता त्यानें आपले दोघे भाऊ कैदेंत ठेविले होते. दुसरा चांदाचा राजा नीलकंठशाहा होता, त्यास आपण सामील होऊन मराठ्यांस चौथाई व सरदेशमुखी न द्यावी अशी हरकत घातली होती. त्याचा शेवट असा झाला की रघूजी भोसल्यानें त्या उभयतांचा मुलूख घेतला. तेव्हां वलीशानें दोघे भाऊ कैदेंत ठेविले होते, त्यापैकी एकास रतनपूर दिलें. याशिवाय खजिन्यांतून कांही पैसा देण्याचें कबूल केलें. तें आजपर्यंत कांही मिळत होतें. दुसरा भाऊ अकबरशा ह्मणून होता तो निजामच्या आश्रयानें कांही वर्षे होता. पुढें तो मयत झाला.