Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ अर्बा सलासीन मया व अलफ, सन ११४३
फसली, अवल साल छ २१ जिल्हेज,
२५ मे १७३३, ज्येष्ठ वद्य ८ शके १६५५.

सलास सलासीनांत अखेरसालीं बाजीरावसाहेब जंजि-यास गेल्यावर त्यांनी लागलीच महालोमहालीं ठाणी सर करण्यास आरंभ करून छ २१ जिल्हेज (२५ मे १७३३) अवलसालीच मंडणगड किल्ला घेतला, व याच महिन्यांत बिरवाडी, मांडल, अष्टमी, अश्राधार, आंतोण, नागोठणें, तळें, घोंसाळे, निजामपूर वगैरे महालांचा अंमल घेतला. इतक्यांत प्रतिनिधि यांनीं माघारें उलटून रायगड किल्ला छ ६ मोहरमी रोजीं (८ जून १७३३) सर केला, व या खालील महाल याच वेळेस आले. महाड घेतल्याबद्दल महाराजास छ २६ रमजानांत नजराही आल्या आहेत. सदरहू तालुका पुढें यशवंत महादेव यांचेच स्वाधीन महाराजांनी करविला होता. तो सलास सबैन सन १७७२ पर्यंत त्याजकडे होता. पेशवे यांजकडे नवता. छ ११ रविलावल (११ आगस्ट १७३३) चिमाजी अप्पा महाराजांकडे आले. बराबर पिलाजी जाधवराव यास नेलें होतें. यास मुलूखगिरीस पाठविलें होतें. छ २१ जमादिलावल (१९ आक्टोबर १७३३) चिमाजी अप्पा साता-यास जाण्यास निघाले. बाजीराव पेशवे यांनी जंजिरे प्रांतांतील अशी महालोमहाली ठाणी बसविल्यानंतर, ज्या चौघांनी वडील अबदुला यास मारिलें, त्यापैकी सिध्दी रहयान बाजीरावसाहेब यांशी लढला; परंतु त्यातच तो ठार जाला. नंतर जंजिरा घ्यावयाचें मनांत आल्यावर बाजीराव यांणीं खुषकीवरून मोर्चे लाऊन तोफांचा मार चालविला. त्यावेळेस मानाजी आंग्रेही साहाय्यास येऊन त्यांणीं समुद्रांतून तोफांचा मार चालविला. तत्राप किल्ला हस्तगत होईना. जर या कामाकरितां आपण राहिलों, तर दुसरी मोठाली कामें तशीच राहतील, इतक्यांत सिध्दीचे लोकही तह करण्यास कबूल जाल्यावरून तह करण्याचा विचार ठरून बाजीरावसाहेब छ १४ रजब रोजीं [ ११ डिसेंबर १७३३ ] परत साता-यास गेले. तहनामा पुढें सबा सलासीन सन ११४६ फसलींत जाला. सिध्दी अबदूल रहिमान गादीवर बसले. छ २६ रजब रोजीं [२३ डिसेंबर १७३३] नानासाहेब नसरापुरास गेले. पुढें सुप्यावरून छ २१ साबान [१६ जानेवारी १७३४] रोजीं पुण्यास आले. तेच दिवशीं चिमाजी अप्पा साता-याहून आले. छ ३ रमजान रोजीं [२८ जानेवारी १७३४] मुलगा होऊन बारसें झालें. छ १९ सवाल [१४ मार्च १७३४] बाणकोट फत्य झाल्याचें वर्तमान समजलें. छ ६ जिल्काद (३१ मार्च १७३४) कर्नाळ्याची बाब होऊन परत आले. सेखोजी आंग्रे र॥खर (सप्टंबर १७३३) महिन्यात मयत झाले. तुळाजी सुवर्णदुर्गास होते, त्यास सुभा सांगितला. माळव्यांतून बाजीरावसाहेब हप्शी याजवर आले. त्यामागें माळव्यांत मल्हारजी होळकर लष्करासहीत तेथें होता. आंग्रे पलीकडेही जाऊन स्वारी करून मुलूख लुटीत होता. त्यावेळेस बादशहाचा वजीर खानडौरान होता. त्यानें आपला भाऊ मुजफरखान याजबरोबर फौज देऊन मल्हारराव याजवर पाठविला. त्यानें सिरोंजपर्यंत जाऊन मागें फिरून दिल्लींत येऊन मराठ्यांचा मोड केला, अशा गप्पा मारिल्या. मल्हारराव होळकर त्या सरदाराबरोबर हलके हलके युध्द करण्यास थोडे लोक पाठऊन आपण फौजसुध्दां मुलखांत वसूल जमा करून बाजीराव याजकडे पाठवीत असे. मराठे लोकांशिवाय रोहिले लोकही त्या मुलखास उपद्रव देत असत. याशिवाय गुजराथेंतही मल्हारजीनें एकाएकी अमदाबादपर्यंत स्वा-या घालून कित्येक गांव लुटून परत हिंदुस्थानांत आला. २२