Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
तोफा मोंगलाईत येतील त्याची चौथाई घ्यावी. चौथाई वगैरे स्वराज्य अंमलाबद्दल फरमान कान्होजी भोसलें यांणी गोंडवण व वऱ्हाड व कटक अंमल बसविला त्याप्रमाणें चालावा. बल्लोलखान यासी ताकीद कर्नाटक सुभा फत्तेसिंग भोसलें यांसी देणें. येणेंप्रमाणें कागदपत्र घेऊन प्रधान व सेनापति व साहेबसुभा निघून येतांना जयपूर, जोधपूर, उदेपूर यांची कामे करून महाराजाशी तहाप्रमाणें चालावयाचें कबूल करविले. दरमाहाचे ऐवजात महाराजाची चौथाई याप्रमाणे पुष्कळ खजिना घेऊन साता-यास आले. महाराजाच्या भेटी झाल्या. मुलें माणसे भेटविली. बाळाजी विश्वनाथ यास कर्डेरांजणगांव वगैरे सरदेशमुखी वतन व इनाम गांव दिले. बाळाजीपंत भानू शस्त्रघातें करून दिल्लीस मरण पावले. त्यांचे पुत्र जनार्दन बल्लाळ व बंधू रामाजी महादेव भानू यांस पुण्यानजीक मावळप्रांती बसलाई त॥ नाणेमावळ हा गांव राजशक ४६, छ २० सवाल, श्रावण वद्य ३ रविवारी (२३ जुलै १७१९) इनाम दिल्हा. तो आजपर्यंत त्यांचे वंशजाकडे चालत आहे. बाळाजी महादेव भानू हे नाना फडणीस यांचे आजे होत. दिल्लीस बाळाजीपंत भानू गेले होते. त्यांचे मागें फडणिशीचें काम नारो बचाजी परचुरे यांणी चालविले. औरंगाबादेस पेशवे आल्यावर फडणविशीचें काम रामाजी महादेव लोहगडावर सबनीस होते, त्यांस बोलावून आणून काम करण्यास सांगितले. बहिरा आहे, याजवरून त्याजला दफ्तरचें काम सांगितलें, व फडणिशीचें काम जनार्दन बल्लाळ व बाबूराव राम मोठे होईपर्यंत अंताजी नारायण यांनी करावें, व त्याची मजमूची असामी हरी महादेव यांचे कन्येचे पुत्र कृष्णाजीपंत यांस सांगितली. मुलखास कौल दिल्हा. मोगलाईकडील अम्मल पुण्यांतील उठला. पुणें येथे हरी महादेव सुभेदारीवर होते. मोगलाकडील अम्मलदार बाजी कदम गेला. भीमेअलीकडील सर्व स्वराज्यांत असावें, असा तह निजामानें केला. परशरामपंत प्रतिनिधि यांचा काल ज्येष्ठ शुध्द ८ शके १६४० सोमवारी विलंबी नाम संवत्सरी झाला. (२७ मे १७१८). श्रीपतराव यांनाच श्रीनिवासराव प्रतिनिधी ह्मणतात. त्यांस पदाची वस्त्रे ज्येष्ठ वद्य ५ स (८ जून १७१८) झाली. कान्होजी आंगरे शिमग्यांत येऊन भेटले. रंग वगैरे होऊन सुभ्याच्या सनदा दिल्या. शके १६४० (८ फेब्रुवारी १७१९). जाधवराव आपल्या महालात अंमल उगविण्याबद्दल खटका करू लागले. त्यावर सरलष्कर यांसी पाठवून लढाई झाली. महकूबसिंग व जाधवराव यांचा मोड झाला. धारराव परभू कळंबेकर कामास आले. त्याची सरदारी कनिष्ठ अप्पाराव यांस दिल्ही, व जहागिरी दिल्ही. बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्लीहून सनदा आणिल्यावर वसुलाविषयी वहिवाट कशी चालावी याजकरितां कायदा केला तो असा की, प्रथम सरदेशमुखी ह्मणजे कोठें शेकडा दहा रुपये व कोठे साडेबारा रुपयेप्रमाणें वहिवाट आहे, ती राजाचें वतन असे ठरविलें बाकी राहिले बेरजेपैकी चौथाई, बाबती राजाचा हक्क ठरविला. बाकी तीन हिसे राहिले त्यास मोकासा असें नांव ठेविले.