Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
सु ॥ समान अशर मया व अलफ सन ११२७ फसली,
अव्वल साल छ २६ जमादिलाखर, १६ मे १७१७,
ज्येष्ठ वद्य ११ शके १६३९.
दाऊदखान मेल्यावर सय्यदांचे अनिष्टाविषयीं मराठयांस गुप्तपणें फरोकसेर लिहीत असे. व दाभाड्याचा जय झाल्यामुळें मराठे प्रबळ होऊ लागले. या कारणानें दाऊदखान यानें चौथाई दिली असतां सरदेशमुखी बळेंच घेऊ लागले. बादशहाचा कृत्रिमपणा व मराठे लोकांचा उपद्रव यामुळे शेख हुसेन याचे मनांत शाहू महाराज यांशी स्नेह करून असावें असें आलें. त्या वेळेस शंक्राजी मल्हार, पूर्वी राजाराम महाराजानी सचिवपद करून दिल्हें तो काशीस गेला होता, तो कारभारावर सय्यदापाशी होता व त्याचा स्नेह साता-यास बहुत लोकांशी होता. सबब त्याला शाहूशी बोलणे करण्यास पाठविला. तेव्हा शाहू महाराजाचें बोलणे पडले की, सहा सुभे दक्षणची चौथ व सरदेशमुखी व हैदराबाद आणि विजापूर व कर्नाटक, ह्मैसूर व त्रिचनापल्ली व तंजोर यासंबंधी मुलूख व खानदेश खेरीज करून दक्षणेत जो शिवाजीनें मुलूख१०१०+ घेतला त्याच्या सनदा पातशाहाकडून मिळाव्या. व शिवाय गोंडवण व व-हाड यांतील मुलूख कान्होजी भोसले यांनी घेतला आहे. तो व आपली मुलेंमाणसें दिल्लीस आहेत, ती आह्माकडे पावती करावी. ही कामें झाली असतां मोंगल पातशहास आपण वर्षास एक कोट खंडणी देऊं, व सरदेशमुखीबद्दल मुलखांत चोरी वगैरे होऊ देणार नाहीं. असा बंदोबस्त करून व कांही नजरहि देऊन चौथाईबद्दल १५००० पंधरा हजार फौजेनिशीं पातशाहाची चाकरी करूं व कोल्हापूरकर राजाराम महाराज यांचा पुत्र संभाजी याचा उपद्रव होऊ देणार नाहीं. असे बोलणें झालें तें बहुतकरून सैदांनी मान्य केलें. हा तह झाल्यावर सालमजकुरी दिल्लीस पातशाहास कळला. त्यास ठीक वाटलें नाहीं. त्यावरून सय्यदास वाटलें की हा आपला द्वेष करतो यास्तव यास पदच्युत करावा. ह्मणून शाहूजवळ त्यानी मदत मागितली. ती देणें आपले हिताचेंच आहे असे समजून शाहू महाराज यांनी बाळाजी११ विश्वनाथ पेशवे याजबरोबर खंडेराव दाभाडे व उदाजी पवार व कान्होजी भोसले यांस बलाविलें. ते न येतां आपले सख्खे चुलत बंधु संताजी व राणूजी भोसले यांस पाठविलें. ते व आणखी सरदार फौजसुध्दा बाळाजी विश्वनाथ यांनीं बराबर आपला पुत्र बाजीराव व बाळाजी महादेव भानू फडणीस घेऊन दिल्लीस निघाले. निजामुन्मुलूख याचीहि भेट घेऊन त्याजकडील फौजहि दर राऊतास एक रुपया करून १२००० लोक बराबर घेतले. निजामांनी पेशवे यांस भाईचारा ह्मणजे मेजवानी केली. दिल्लीस निघते वेळी आणखीहि शाहू महाराज यांनी पेशवे यांस सुचविलें की दौलताबाद व चांदा किल्ला कसेंहि करून घ्यावा, व गुजराथ व माळवा यांचीहि सनद करून घ्यावी. दिल्लीस सय्यदांसुध्दा फौज पोहोंचल्यावर उभयता सय्यदांनी फेरोकेसर बादशहास डोळ्यांत सळई घालून डोळे फोडून ठार मारून टाकिले. फेरोकेसर बादशहा वारल्यावर त्याचे जागी दुसरा बादशहा पुढील साली बसला, ती हकीकत पुढील सालांत दाखल केली आहे. फत्तेसिंग भोसले यास मोकासे वगैरे अंमल सरंजाम या सालीं निराळा करून दिल्हा.