Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

१९. साधनें प्रकाशण्यासंबंधानें एक चमत्कार आज कित्येक वर्ष मी निमूटपणें पहात आहें. तो असा कीं, शिंदे, होळकर, गायकवाड, आंग्रे, पटवर्धन, विंचूरकर, पवार, राजेबहाद्दर, कोल्हापूरकर, तंजावरकर, फडणीस, प्रतिनिधि, फलटणकर, भारेकर, जतकर, हैदराबादकर, जयपूरकर, जोधपूरकर, सागरकर व इतर लहानमोठे संस्थानिक, जहागीरदार, इनामदार, देवस्थानवाले व पूर्वीचे मुत्सद्दी हे अद्यापपर्यंत काय करीत आहेत? त्यांची दप्तरें किंवा त्यांच्यासंबंधाचे कागदपत्र आमच्यासारख्या भिकारड्यांनीं शोधण्याचा व छापण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांच्यासारख्या श्रीमंतांनीं अगदींच उदासीन व निद्रिस्थ असावें. हा कोठला न्याय! काय, त्यांचे पूर्वज त्यांचे कोणी नव्हत? पूर्वजांनीं संपादिलेल्या जहागिरी व राज्यें भोगण्यास राजी आणि त्यांचे पराक्रम व इतिहास जाणण्यास गैरराजी, हा न्याय पृथ्वीवर इतर कोठेंहि पहावयास मिळावयाचा नाहीं. वासुदेवशास्री ख-यांनी आपलें घरदार विकून पटवर्धनी दप्तर छापावें आणि मिरजकर, सांगलीकर, जमखिंडीकर ह्यांनी खुशाल झोंपा काढाव्या. शिवाजीमहाराज, दमाजी गायकवाड, परशुरामभाऊ पटवर्धन हे आह्मां संशोधकांचे आजे पणजे आहेत आणि संस्थानिकांचे कोणी नाहीत, असेंच म्हणण्याची पाळी आली. संस्थानिकांची व इनामदारांची आपल्या प्रत्यक्ष पूर्वजांसंबंधानें केवढी ही विस्मृति! केवढा हा अपराध!! ही भरतभूमि पितृपूजेविषयी प्रख्यात आहे. तीत प्रस्तुत काळीं पितरांची अशी बोळवण व्हावीना?

२०. असो. राजे निजले आहेत, जहागीरदार डुलक्या घेत आहेत, आणि इनामदार झोंपा काढीत आहेत. ते जागे होई तावत्कालपर्यंत, जागे झालेले मध्यम स्थितीतील जे आपण, त्यांनीं राष्ट्राच्या या पितरांचें स्मरण कायम ठेविलें पाहिजे. आपलें सामर्थ्य यद्यपि जुजबी आहे, तत्रापि ह्या पुण्यकर्माच्या प्रीत्यर्थ ते खर्चिलें पाहिजे.