Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

१२. साधनांचा संग्रह करतांना, संशोधकाला एक चमत्कार दिसून येईल. तो असा कीं इतिहासाच्या ज्या शाखेची किंवा प्रसंगाची साधनें मिळविण्याच्या इच्छेनें तो विवक्षित स्थलीं जातो, तेथें इष्ट साधनें मिळून किंवा न मिळून, निराळीच एखाद्या कालाचीं साधनें उपलब्ध होतात. पेशवाईच्या इतिहासाचीं साधनें मिळवावयाला जावें आणि शिवाजीच्या इतिहासाची साधनें उपलब्ध होतात. किंवा व्यापाराच्या इतिहासाचीं साधनें हुडकण्याच्या बुद्धीनें जावें आणि चालुक्यांचा किंवा सिरियन यहुदी लोकांचा ताम्रपट सांपडावा, असा चमत्कार होतो. अशा आकस्मिक उपलब्धीकडे संशोधकानें दुर्लक्ष करूं नये. तसेंच ऐतिहासिक कागद पाहतांना, संस्कृत व मराठी पोथ्या असल्यास त्यांचा संग्रह मुद्दाम करावा. बाडें, तर बिलकुल वगळूं नयेत. एखाद्या बाडांत हजार हजार, पांच पांचशें वर्षांच्या जुन्या पोथ्यांचे प्राकृत भाषांचे उतारे असतात, किंवा इतिहासप्रसंगांच्या मित्त्या दिलेल्या असतात, किंवा पुरातन गुरुशिष्यपरंपरा लिहिलेल्या असतात. तेव्हां शोधस्थलीं व्यापकदृष्टीप्रमाणेंच व सूक्ष्मदृष्टिही ठेवणें अवश्य आहे.

१३. येणेंप्रमाणें व्यापक व सूक्ष्मदृष्टीनें शोध करून संग्रह केल्यावर, संशोधकानें उपलब्ध संग्रहाच्या प्रामाण्याप्रामाण्यासंबंधानें चौकशी करावी. ही चवकशी करावयाची म्हटली म्हणजे इतिहासपद्धतीची चांगली ओळख त्याला असली पाहिजे. जशा इतर शास्त्रांना व कलांना पद्धती आहेत, तशीच इतिहासशास्त्राला पद्धति आहे. प्रमाण काय, अव्वल प्रमाण कोणतें, दुय्यम प्रमाण कोणतें, तिय्यम प्रमाण कोणतें, ह्याची त्याला माहिती असली पाहिजे. ही माहिती पद्धतिग्रंथांचे अवलोकन केल्यानें सहजांत होईल. केवळ स्वानुभवानें स्वतःच पद्धति बनविता येणार नाहीं, असें नाही; तत्रापि, आपल्या आधीं ज्या पद्धति विद्वन्मान्य झालेल्या आहेत, त्यांचा उपयोग संशोधकानें प्रथम करून घ्यावा. उपलब्ध पद्धतिग्रंथांत कांहीं वैगुण्यें असण्याचा संभव असतो. त्यांचीं टिपणें करून, आपणास पद्धतिशास्त्रांत ज्या सुधारणा सुचवावयाशा वाटतात, त्या जाहीर कराव्या म्हणजे आपल्या मागून येणा-या संशोधकांना त्याचा उपयोग होईल. इतिहाससाधनांच्या प्रामाण्याप्रामाण्यासंबंधानें पद्धतिग्रंथ इंग्रजी भाषेंत प्रायः नाहींच. इंग्रजांचा संशोधनाचा मार्ग फारसा पद्धतशीर नाहीं. धरमधक्क्यानें परंतु ब-याच जोरानें ते कोणतेही काम करतात; परंतु शास्त्रीय पद्धतीनें बिनचूक काम वठविण्याचा त्यांचा प्रघात जसा असावा तसा नाहीं. सशास्त्र व पद्धतशीर संशोधन करण्याच्या कामीं फ्रेंच, जर्मन, व अमेरिकन लोक इंग्रजांच्या बरेच पुढें गेलेले आहेत; त्यांतल्या त्यांत, जर्मन लोक सूक्ष्मदृष्टि असून व्यापक शोध करणारे आहेत; अमेरिकन लोक शास्त्राचें गूढ अवडंबर न करतां सर्वसामान्य लोकांस कळेल अशा विस्तारानें, कदाचित् अतिविस्तारानें लिहिणारे आहेत; आणि फ्रेंच लोक आटोपशीर व नीटनेटकी मांडणी करणारे आहेत. इतिहाससाधनांच्या प्रामाण्याप्रामाण्याच्या पद्धतीवर महाराष्ट्रांतील सशोधकांना उपयोगी पडेल असा एक ग्रंथ फ्रेंच भाषेंत Seignobos and Langlois यांचा Introduction to the study of History हा आहे. ह्याचें इंग्रजीत शिरस्त्याप्रमाणें भाषांतर झालेले आहे. इतर युरोपियन भाषांत एखादा उपयुक्त किंवा नामांकित ग्रंथ किंवा शोध झाला म्हणजे त्याचें भाषांतर किंवा रूपांतर करून घेण्यास इंग्रज लोक अतिउत्सुक असतात. इंग्रजांचा हा 'स्पंजी' गुण मराठ्यांनीं बिनतक्रार उचलण्याजोगा आहे. तज्ज्ञ माणसें प्रत्येक राष्ट्रांत सदा सारखींच निपजतात असें नाहीं. तेव्हा, एखादा तज्ज्ञ एखाद्या राष्ट्रांत उद्भवला तर त्याच्या ज्ञानाचा इतर राष्ट्रांनी भाषांतरद्वारां उपयोग करून घेण्यांत कोणताही कमीपणा नाहीं.