Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
४१. कातवडी, यहुदी, मुसुलमान, पारशी, ख्रिस्ती व हिंदू हे सर्व गट आचारानें, व्यवहारानें, प्रायश्चितानें, विद्येनें, देवधर्मानें, अथवा संकलित भाषेनें बोलावयाचें म्हणजे संस्कृतीनें इतके कांहीं विसदृश होतें कीं ह्या सर्वांचा थोड्या काळांत म्हणजे हजार दोन हजार वर्षांत एकजीव होणें अशक्यांतलें होतें. कातवडी जेव्हां सह्याद्रीच्या माच्यां वर एकटा च रहिवासी होता तेव्हां तो त्या वनींचा एकमेव अद्वितीय राजा होता. पुढें कोळी, वारली, ठोकर, मांगेले वगैरे जास्त सुधारलेले लोक आले. ते आचारादींनीं भिन्न पडल्या मुळें कातवड्यांत शरीरसंबंधानें मिसळून गेले नाहींत, अगदीं पृथक् राहिले. म्हणजे महाराष्टिकादि चातुर्वर्णी लोक उत्तरकोंकणांत येण्या पूर्वी व येथें अन्योन्यशरीरसंबंधव्यावृत्त अश्या जाती निर्माण होऊन गेल्या. नाग लोक आले त्यांत क्षत्रिय नाग व महार नाग अश्या दोन जाती होत्या. नंतर महाराष्ट्रिक आले. त्यांच्यांत चातुर्वर्ण्य असून, शिवाय सुतार लोहार इत्यादि जाती होत्या. यहुदी व पारशी आले. त्यांच्या हि ह्या जातिबद्ध समाजांत शरीरसंबंधव्यावृत्त जाती बनून गेल्या. शेवटीं मुसुलमान व ख्रिस्ती आले. ते हि ह्या जातिबद्ध समाजांत जातिरूपस्थ होऊन बसले. जातिरूपस्थ होऊन बसल्या मुळें, अन्योन्य बेटीव्यवहार म्हणजे प्रजोत्पादनाच्या कामीं सहकार ह्या निरनिराळ्या गटांत होणें अशक्य झालें. आणि कधींकाळीं हे सर्व गट मिळून एक भरींव सजातीय समाज होणें प्रायः असंभाव्य होऊन बसलें. एकटा देवधर्म घेतला आणि त्या दृष्टीनें ह्या गटां कडे पाहूं गेलें तर, कातकरी पिशाचपूजक होता, यहूदी मुसुलमान व ख्रिस्ती मनुष्याकार एक देवपूजक होते, पारशी अग्निपूजक ऊर्फ पंचभूतां पैकीं एका भूताचा पूजक होता, आणि हिंदू पशुपक्षिमनुष्याकार अनेकदेवपूजक असून शिवाय अग्न्यादिपंचभूतें, पिशाच्चें, एकदेव, झाडें व दगड, ह्यांचा भक्त होता, इतकें च नव्हें तर स्वत:च देव, ईश्वर व ब्रह्म हि होता, देव एक आहे हें जितकें खरें तितकें च ते कोट्यवधि आहेत हें हि खरें असल्या मुळें, म्हणजे दोन्ही कल्पना केवळ बागुलबोवा प्रमाणें असत्य असल्या मुळें, कातकरी, यहुदी, मुसुलमान, पारशी, ख्रिस्ती व हिंदू हे सारे च अनेक निराधार व अवास्तव कल्पनांच्या पाठी मागें धांवत होते व आपापल्या कल्पनांचा अनिवार उपभोग घेण्यांत सौख्य मानीत होते. अश्या ह्या नाना प्रकारच्या देवकल्पनांनीं पछाडलेल्या गटांचा एक भरींव समरस समाज बनवावयाला एकच तोडगा होता. तो हा कीं, ह्या सर्वांच्या डोक्यांतील निराधार व अशास्त्र अशी जी देवकल्पना ती च मुदलांत उपटून काढली पाहिजे होती, निदान एकसमाजत्वा प्रीत्यर्थ ह्या देवकल्पनेला व देवधर्माला गबाळांत गणून इतर राजकीय, वैय्यापारिक व शास्त्रीय व्यवहारांत तिला नितांत गौणत्व दिलें पाहिजे होतें. तें जो पर्यंत झालें नव्हतें, तों पर्यंत हे सहा हि गट एकसमाजत्वाला उपकारक होण्याची आशा नव्हती. देवकल्पनेचें असत्य युग पांच चार हजार वर्षे चालून समाप्तीस येण्याच्या रंगांत आहे हें ह्या देवभोळ्या लोकांच्या अद्याप लक्ष्यांत आलें नव्हतें. एकट्या अद्वैतवेदान्त्यानें तेवढें. देवकल्पनेला लाथाडलें होतें, परंतु अद्वैतवेदान्त्यांची चिमकुली संख्या देवभोळ्यांच्या प्रचंड संख्येच्या पासंगाला हि पुरेशी नव्हती.