Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

३८. मुबलक अन्न व यथेच्छ जागा असल्या मुळें, कोंकणांत जीवनार्थ कलह युरोपांतील किंवा मध्यआशियांतील भुकेबंगाल देशांतल्या प्रमाणें जाज्वल्य नाहीं. संपन्नतेनें आपला वरद हस्त एकट्या कोंकणां वर च ठेविला असें समजूं नये. भरतखंड म्हणून ज्या खंडाला म्हणतात त्या बहुतेक सर्व खंडा वर अन्नपूर्णेची अशी च पूर्ण कृपादृष्टि आहे. ह्या कृपादृष्टीचा परिणाम येथें रहावयास आलेल्या कायमच्या सर्व लोकांच्या स्वभावांत दृष्टीस पडतो. वाटेल त्यानें येथें यावें व थोडीशी खडबड व गडबड करून आपल्याला हवी तशी व मिळेल तशी जागा करून घ्यावी. काळजी एवढी च घ्यावी कीं, दुस-याला आपल्या पासून तोशिस पोहोचूं नये. एखादा रानटी मोगल किंवा हापापलेला युरोपीयन प्रथम प्रथम बेवकूबपणें मारामा-या व रक्तपात करतो. परंतु वस्तुस्थिति ध्यानांत व अनुभवांत आल्या वर तो हि आस्तेआस्ते निवळत जातो व इतरांच्या प्रमाणें च सालस, निरुपद्रवी व पाहुणचारी बनतो. तात्पर्य, हिंदुस्थानांत माणसाचा स्वभाव अन्नसंपत्तीच्या मुबलक व सहजलभ्य पुरवठ्या मुळें मुक्तद्वारी बनतो पहिली भीड चेपे तों पर्यंत काय घासाघीस होईल तेवढी च. तदनंतर दोन्ही समाज शेजारधर्मानें परंतु तुटकपणें रहातात. तुटकपणाचा हा कल समाजा पुरता च न थांबून समाजांतील कुटुंबांना व व्यक्तींना हि पछाडतो. कारण समाजाला जसें अन्न अल्पश्रमानें मिळूं शकतें तसेंच कुटुंबांना व व्यक्तींना हि तें तितक्याच किंवा त्याहून हि अल्पतर श्रमानें मिळतें. अन्नाच्या सहजलभ्यते मुळें अन्योन्यावलंबित्व बहुतेक नसल्या सारखें होऊन, सर्व देश पृथक् पृथक् व अन्योन्यस्वतंत्र अश्या व्यक्तींचा बनून जातो. व्यक्तिस्वातंत्राचा अत्यन्त अतिरेक झालेला जर कोठें पहावयाचा असेल, तर तो हिंदुस्थानांत पहावा. हिंदुस्थानांत शेकडो खेडेगांवें अशीं आहेत कीं त्यांतील बहुतेक सर्व गरजा गांवांतल्या गांवांत भागल्या जातात. तेल, मीठ, बोंबील, गूळ व कपडा ह्यांची बेगमी जवळच्या जत्रेंत करून ठेविलीं, म्हणजे खेड्यांतल्या कुटुंबाला सगळें जग वर्षभर धाब्या वर बसवितां येतें. येणें प्रमाणें अन्नाच्या वैपुल्यानें हिंदुस्थानांतील माणसांचा स्वभाव जसा मुक्तद्वारी बनतो तसाच अन्नाच्या सौलभ्यानें तो तुटक निपजतो. दुस-याची विशेष पर्वा बाळगण्याची अपेक्षा रहात नाहीं. मुक्तद्वार पडल्या मुळें देशांत चाहेल त्यानें शिरावें आणि स्वभावांत तुटकपणा असल्या मुळें जुटीच्या अभावीं आगंतुक परकीयाला कमींत कमी अडथळा व्हावा, असा ह्या देशांतला मनुष्यस्वभाव आहे. पुढें वाढून ठेविलेलें सुग्रास अन्न टाका आणि परकीय बाह्याला शत्रू समजून त्याशीं लढण्यांत कदाचित् प्राण वेचा, हा खुळसट धंदा हिंदुस्थानांतला शहाणा माणूस सहज च करीत नसे. अशा स्थितींत पृथ्वी वरील कोणी हि माणूस असें च आचरण करता. भारतबाह्य परकीयांना प्राण वेंचून अन्न मिळवावयाचें असे. भारतीयांना प्राण वेंचून हातचें अन्न गमवावयाचें असे. विपुल अन्न आणि सुलभ अन्न हाताशीं तयार असल्या मुळें, हिंदुस्थानांतील माणसांला पोलिसाची म्हणजे सरकार म्हणून ज्या संस्थेला संज्ञा आहे त्या संस्थेची अडगळ फारच थोडी खपे. श्वापदां पासून व चोरचिलटांपासून अन्नाचें संरक्षण करण्याला महार व कुत्रा असला म्हणजे हिंदू गांवाचें काम भागे. पंचायत, महार व कुत्रा ह्या हून जास्त भानगडीचें, भव्य किंवा भयंकर सरकार हिंदू ग्रामसंस्थेला नको असे. गेल्या तीन हजार वर्षांत हिंदुस्थानांत जी देशी व परदेशी सरकारें होऊन गेलीं तीं सर्व एका प्रकारच्या पोटबाबू चोरांची झालीं व सरकार म्हणजे एक उपटसुंभ चोरांची टोळी आहे. अशी हिंदू गांवक-याची अंतस्थ प्रामाणिक समजूत असे. त्या मुळें सरकाराच्या ब-या वाईटा कडे हिंदू गांवकरी स्वतः होऊन बिलकुल लक्ष्य देत नसे. जुनें सरकार मोडो किंवा नवीन सरकार जुडो, त्याचें सुखदुःख गांवक-याला तितपत च असे. अपरिहार्य आपत्ति म्हणून सरकार नांवाच्या चोराचें देणें एकदा कसें तरी देऊन टाकलें म्हणजे वर्ष भर पीडा चुकली, इतपत प्रेम सरकार नांवाच्या संस्थे वर गांवक-याचें असे. ह्या भावनेचा असा परिणाम झाला कीं, शातवाहन, जुने मराठे, मुसुलमान व पोर्तुगीज इत्यादि सरकारांचें जन्म व मृत्यू हिंदू गांवक-यांनीं हेातील तसे होऊन दिले. त्यांच्या भानगडींत आपण होऊन ते कधीं पडले नाहींत. जुन्या सरकाराच्या मृत्यू बद्दल गांवकरी कितपत रडले व नव्या सरकाराच्या जन्मा बद्दल गांवकरी कितपत हसले, ह्या प्रश्नाची ऐतिहासिक व मानसिक विवेचना ही असल्या मासल्याची आहे. हिंदू गांवक-याची सष्टिसिद्ध, परिस्थितिसिद्ध व अन्नसिद्ध मनोरचना इतकी मुक्तद्वारी, तुटक व स्वयंपूर्ण बनलेली असे कीं देशी किंवा परदेशी कोणतें च सरकार त्याला मनापासून नको असे.