Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

हात बांधून भेटावयाला या म्हटल्या बरोबर शिवाजी बंदा गुलाम म्हणून जयसिंगाच्या तंबूंत गेला. भिकार पंचहजारी व्हा म्हटल्या बरोबर सगळ्या जगाला पालाण घालणारा तो महावीर क्षुद्र पातशाही सरदार बनला. आणि आग-यास चला म्हटल्या बरोबर पातशाहाला आदबीनें कुरनीस करण्या करतां, शिवाजी आग-यास निघाला. जयशिंगानें हा शेवटला हुकूम करावा व तो आपण क्षणाचा हि विलंब न लावतां ताबडतोब अमलांत आणावा ह्या च पर्वणीची वाट शिवाजी चातका प्रमाणें पहात होता. अवरंगझेबाची प्रत्यक्ष व समक्षासमक्ष भेट होण्याचा व भेटीच्या प्रसंगी पातशाहत व पातशाहा गारत करण्याचा हा कधीं न येणारा कपिलाषष्टीचा योग शिवाजीनें लग्नमुहूर्ता प्रमाणें उत्सुकतेनें साधिला. अवरंगझेबाच्या खुद्द मामाचीं बोटें छाटणारा व मामाच्या पोराचा जीव घेणारा शिवाजी पातशाहाला कुर्निसा करावयाला निघालेला पाहून संन्यास घेतलेल्या लांडग्याची आठवण जयसिंगाला व्हावयाला हवी होती. परंतु, तसा कांहींएक प्रकार न होतां खुळ्या जयसिंगाला आपण बडी पातशाही कामगिरी बजावीत आहों अशी फुशारकी वाटली. हें च शिवाजीला हवें होतें. शिवाजीनें लीनतेचें सोंग इतकें कांहीं बेमालूम आणिलें कीं शिवाजीला आपण नरम केला अश्या वल्गना जयसिंग बडबडूं लागला. दिल्लीन्द्राचें पद पटकविण्याची ईर्ष्या शिवाजी आजन्म बाळगीत होता,हें हिंदुस्थानांतील मुत्सद्दी जाणत होते व जयसिंगाच्या हि काना वर गेलें नव्हतें असें नव्हतें. शिवप्रभृतिभूपालाः दिल्लीन्द्रपदलिप्सव: असें शिवाजीचें वर्णन जयसिंगाचा प्रशस्तिकार करण्या इतकी जगजाहीर ही आकांक्षा झाली होती. तत्रापि शिवाजीची हड्डी आपण मोकळी केली अशी फुशारकी जयसिंग मारित च होता व स्वतःच्या मामाचा हात तोडणा-या व मामाच्या मुलाचा वध करणा-या आततायाची भेट घेण्यास अवरंगझेब सिद्ध झाला होता. जखमे वर फुंकर घालणा-या शिवाजीनें अवरंगझेबाला ही जी भुरळ पाडली ती पाहून तत्कालीन शहाण्यांनीं तोंडांत बोटें घातलीं असतील ह्यांत संशय नाहीं. शिवाजी अवरंगझेबाला स्नेहालिंगन देण्यास कडेकोट बंदोबस्त करून निघाला. बरोबर हजार पांचशें करोल व जातिवंत सरदार जीवाचे जीवलग व छातीचे निधडे असे त्यानें घेतले आणि मजल दर मजल दहा दहा पांच पांच माणसें ठेवीत ठेवीत आग-यांतील व्याघ्राच्या गुहेंत सरज्यानें प्रवेश केला. प्रथम भेटीच्या प्रसंगीं कुरनीस करण्याच्या वेळीं पातशाहाची व आपली जी लगट होईल त्या लगटींत सिंहासना वर उडी मारून पातशाहाचा निकाल लावावा आणि दरबारांत जमा झालेल्या उमरावांची कत्तल करून तेथल्या तेथें हिंदुपदपातशाहीची स्थापना करावी आणि सरहद्दी वर जय्यत ठेविलेल्या सैन्याच्या जोरा वर व धाका वर ती पातशाही स्थिर करावी असा शिवाजीचा बूट होता. चंद्रराव, अफजलखान, शाहिस्तेखान, इत्यादींचा फडशा शिवाजीनें असा च पाडला होता. तें च दूरदृष्टिमिश्रित अघटित साहस ह्या प्रसंगीं फलद्रूपतेस आणण्याचा शिवाजीचा आशय होता. परंतु, शिवाजीच्या बारश्यास जेवलेल्या अवरंगझेबाला त्याचें दैव थोर म्हणून दरबारांत शिवाजीला आपल्या पासून शंभर हात दूर उभें करण्याची बुद्धि आयत्या वेळीं झाली म्हणून निभावलें; नाही पक्षीं, चकत्यांच्या पातशाहींचा रामबोलो त्या च समयीं होण्याचा प्रसंग बहुतेक ठेपल्या सारखा च होता. खुद्द पातशाहा व त्याचे हजार पाच शें सरदार उडविल्या वर, मुक्तद्वारीं, तुटक व सुखाची भाकर खाण्यास चटकलेले हिंदुमुसुलमान प्रजाजन शिवाजीची पातशाहात निमूटपणें बिनतक्रार चालू देते, ही खूणगांठ शिवाजीनें पक्की बांधून ठेविलेली होती. तात्पर्य, राज्ययंत्राच्या व राज्यकर्त्यांच्या ब-या वाईटा कडे विपुल व सुलभ अन्न मिळणा-या हिंदवासीयांचे बिलकुल लक्ष्य नसे. उघड च झाले कीं ह्या देशांत ज्याला राज्य आक्रमण करावयाचें असे त्याला तें मिळविण्या साठीं सामान्य लोकांची मनधरणी करण्याची जरूर पडत नसे, राज्ययंत्रचालकांच्या लहान कंपूची वासलात लाविल्यानें त्याचें काम बेश साधे.