Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
४२. उत्तरकोंकणांतील हे लोक देव, वंश व जाति ह्या तीन कादंब-यांचें बेसुमार पान करून झिंगल्या कारणानें, त्यांच्यांत एकसमाजत्वाचा प्रादुर्भाव होणें जितकें अशक्य होतें तितकें च एकराज्यत्वाचा उदय होणें असंभाव्य होतें. कातवड्याला प्राचीन कालीं राजा, राज्य व राष्ट्र हे शब्द देखील अपरिचित होते. आर्यांच्या संसर्गानें तो पुढें आपल्याला वनचा राजा म्हणूं लागला इतकें च. राजा हा शब्द कातवड्याच्या मुळे भाषेंतील अनार्य नाहीं. यहुदी व पारशी हे इतके पराकाष्टेचे दुर्बल, पंगू व भुकेबंगाल होते की राजा हा अर्थ यद्यपि त्यांना अवगत होता तत्रापि त्या अर्थाचा साक्षात्कार करून दाखविण्याची धमक उत्तरकोंकणांत ते कधीं दाखवितील अशी कल्पना हि संभाव्य कोटींतील नव्हती. बाकी राहिले मराठे, मुसुलमान व पोर्तुगीज. हे तिघे हि बाहेरून उत्तरकोंकणांत प्रवेश करून, मुक्तद्वारी व तुटक अश्या विपुलान्न व सुलभान्न लोकांत येऊन त्यांना जिची यत्किंचित् जरूर नव्हती त्या राज्यसंस्थेची ऊर्फ सरकारची स्थापना जबरदस्तीनें स्वार्था साठीं म्हणजे स्वत:चें पोट जाळण्या साठीं करिते झाले, आणि राज्यस्थापने नंतर देशांतील इतर लेाकां प्रमाणें अन्नवैपुल्या मुळें व अन्नसौलभ्या मुळें मुक्तद्वारी, तुटक, उदासीन व राजकारणविमुख बनले. हिंदूंतील क्षत्रिय व ब्राह्मण ह्यांचा तर राजा, राज्य व राष्ट्र ह्या तीन शब्दांचा घोष वेदकाला पासून चालू आहे. जेथें जातील तेथें राष्ट्र उत्पन्न करण्याचा ब्राह्मणक्षत्रियांचा मोठा हव्यास, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व त्यांचीं ब्राह्मणें ह्यांच्यांत राजा,राज्य, राष्ट्र, साम्राज्य, बृहद्राज्य, एकराट्, विराट्, गणराट्, अधिराट्, इत्यादि राजकीय शब्दांची रेलचेल पाहिली व राज्यविषयक प्रार्थना पाहिल्या म्हणजे राजा व राष्ट्र हे अर्थ ब्राह्मणक्षत्रियांच्या हाडींमाशीं किती खिळले होते त्याची कल्पना होते. असे हे ब्राह्मणक्षत्रिय सुद्धां उत्तरकोंकणांतील विपुलान्न हवेंत इतर लोकांच्या प्रमाणें च राजसंस्थोदासीन होऊन बसले. ते इतके कीं आफ्रिकेंतील अर्ध रानटी शामळ व मध्यआशियांतील उनाड मोंगल ह्यांनीं अधाशीपणें राज्ययंत्र पटकाविलें असतां तुडुंब पोट भरलेल्या ब्राह्मणक्षत्रियांनीं तिकडे कानाडोळा केला. मुसुलमानांनीं हि पोर्तुगीजां पुढें तो च कित्ता गिरविला. पुढें पोर्तुगीजांची व त्यांच्या बाट्यांची पाळी आली तेव्हां चित्पावनां पुढें बाट्ये तर पहिले छूट वठणीस आले. परंतु पोट न भरलेल्या अस्सल पोर्तुगीजांनीं मात्र प्रिय अन्नाला चिकटून रहाण्याचा हट्ट प्राण जाई तों पर्यंत मुंग्या प्रमाणें धरिला. अन्नसंपन्न उत्तरकोंकणांत राजा, राज्य, राष्ट्र व राज्ययंत्र एतत्संबंधानें माणूस उदासीन कां व कसें होतें त्याचा हा असा इतिहास व हिशेब आहे. राज्ययंत्राची येथें फारशी जरूर च नाहीं. उत्तरकोंकणचा हा दाखला सबंद भारतवर्षाला खुशाल लावावा. राष्ट्र, राष्ट्र, राष्ट्र म्हणून वेदघोष करणारे अन्नतृप्त ब्राह्मणक्षत्रिय जेथें राष्ट्रविन्मुख व समाजसन्यस्त होण्यांत भूषण मानूं लागले, तेथें मुदलांत च नको असलेलें राज्ययंत्र चालविण्याचे काबाडकष्ट भुकेबंगाल पोर्तुगीजादि यूरोपीयन लोक व आरब, अफगान, मोंगल वगैरे आशियाटिक लोक च फक्त करूं इछीत. तदितरांना हा खटाटोप निरर्थक भासे. राष्ट्र व एकराष्ट्र हा अर्थ ह्या अन्नसंपन्न देशांत रुजण्या सारखा व आवश्यक भासण्या सारखा नसे. राष्ट्र होण्याची ज्यांना जरूर नव्हती त्यांना एकसमाज हि होण्याची आवश्यकता नव्हती हें सांगावयाला नको च.