Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
३७. शकपूर्वं देन हजार वर्षां पूर्वी किती हजार वर्षे कातवडी उत्तरकोंकणांत आहेत त्याचा अंदाज हेात नाहीं. हे लोक कधी हि मछीमार नाहींत व नव्हते व समुद्रकिना-याच्या वा-यास हि हे कधीं उभे राहिले नाहींत. ह्यांची वसती सह्याद्रीच्या रानांत ह्यांच्या समकालीं समुद्रा वर कोण लोक होते तें कळण्यास मार्ग नाहीं. मिसरी व असुर लोकांशीं भरतखंडाचा व्यापार त्या वेळीं म्हणजे शकपूर्व दोन हजार वर्षां पूर्वी जर कोंकणच्या किना-या वरील बंदरांच्या द्वारा होत असेल, तर एवढें मात्र निश्चित कीं दमण पासून मुंबईचेऊल पर्यंतच्या वर्तमान बंदरां पैकीं एक हि बंदर व्यापारी पेठेच्या पदवीस त्या कालीं पोहोचल्याचा संशय सुद्धां घेण्यास जागा नाहीं. दमण, सोपारें, वसई, घोडबंदर, ठाणें, कल्याण, हीं बंदरें त्या प्राचीन काला नंतर दोन हजार वर्षांनीं इतिहासप्रांतांत डोकावूं लागलीं. सह्याद्रीच्या माच्यांवर कातवडी वसती करून असतांना, समान्तर समुद्रकिना-या वर व सह्याद्रीच्या तळरानांत मनुष्याची हालचाल प्रायः नसावी असा अंदाज आहे. परंतु सह्याद्रीच्या शिखरां खालील कपा-यांत व गुहांत प्राचीन गुहाशय माणसांची तुरळक वसती कातवड्यांच्या माच्यांच्या वरल्या भागास असावी. माच्यां वर कातवडी व डोंगरकपारींत व गुहांत गुहाशय, असा प्रकार कित्येक हजार वर्षे चालला असावा. गुहाशयां हून कातवडी जास्त सुधारलेला. कातवडी कातडीं तरी पांघरी. गुहाशयांना ती हि कला अवगत नव्हती. सध्यां जीं बुद्धांचीं लेणीं सह्याद्रीच्या शिखरां खालीं खेादलेलीं दिसतात तीं गुहाशयांच्या मूळच्या ओबडधोबड स्वभाव सिद्ध कपा-यांच्या व गुहांच्या सुधारलेल्या आवृत्या आहेत. नागड्या गुहाशयांचा व कातडीं पांघरणा-या कातवड्यांचा कित्येक शतकें शेजार होऊन शेवटीं कातवडी शिल्लक राहिला. सह्याद्रींत दोघांना हि विपुल अन्न होतें. एकानें दुस-यास ठार केलें च पाहिजे असा प्रकार नव्हता. गुहाशय निर्वश झाल्या वर, कातवड्याच्या शेजाराला नाग, वारली, कोळी व ठाकर लोक आले. त्यांना हि रानांत व किना-या वर मुबलक अन्न मिळण्या सारखें होतें. तेव्हां कातवड्यांच्या व नागादींच्या लढाया वगैरे न होतां नागांदींना हि ह्या प्रदेशांत बिगरअडथळा रहातां येऊं लागलें. नंतर आंध्र, मांगेले व माहाराष्ट्रिक आले. त्यांना हि येथें विपुल अन्न सांपडलें व ते हि ह्या प्रांतांत गुण्या गोविंदानें नांदूं लागलें. पुढें चालुक्यादि जुने मराठे आले. ते हि ह्या देशांत समावले. कालान्तरानें मुसुलमान व पोर्तुगीज कोंकणांत शिरले व ते हि सुखानें पोट भरून येथें आहेत. जो जो म्हणून येथें येतो तो तो सुखासमाधानानें देशांत कायमचा बिनबोभाट समावला जातो. ह्याचा अर्थ इतका च कीं, ह्या देशांत उद्भिज्ज व प्राणिज संपत्ति ऊर्फ अन्न इतकें मुबलक आहे कीं येईल त्याला येथें रहाण्यास यथेच्छ वाव आहे.