Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
३९. सरकार नांवाच्या कृत्रिम, उपटसुंभ, चोरट्या व जुलमी संस्थे संबंधानें गांवकरी जर इतका पराकाष्ठेचा उदासीन असे, तर असा प्रश्न उत्पन्न होतो की, येणारें नवें सरकार व जाणारें जुनें सरकार ह्यांच्या मधील युद्धें, तंटे, मारामा-या व झटापटी कोण खेळे ? हिंदुस्थानचा राजकीय इतिहास ऊर्फ सरकारांचा इतिहास तर अथ पासून इतिपर्यंत मारामा-यांनीं तुडुंब भरलेला आहे. या मारामा-या कोण करी ? मृत सरकारा बद्दल कोण रडे ? आणि नव्या सरकाराची जयंती कोण करी ? ह्या प्रश्नाचें उत्तर असें आहे कीं, ज्या मूठभर उपटसुंभांनीं सरकार स्थापिलें ते मूठभर लोक जुन्या सरकाराच्या वतीनें नव्या सरकाराशीं झुंजत,तंडत व पराभूत झाले असतां रडत आणि विजयी झाले असतां खिदळत. हिंदुस्थानांत सरकार ही संस्था सदा कांहीं अत्यल्पसंख्याकांची असे, सार्वलौकिक कधीं हि नसे. एवढें मोठें मोंगलांचें साम्राज्य; परंतु त्यांतील मुख्य घटकावयांची संख्या राजघराण्यांतील पुरुषांच्या संख्ये हून म्हणजे पांच पंचवीस राजपुरुषां हून जास्त नसे, कमाल ओढाताण केली तर साम्राज्यांतील मुलकी व लष्करी सुभे व नायबसुभे मिळून दीड दोन हजारां हून जास्त नसे. हे दीड दोन हजार लोक मोगल साम्राज्या करितां लढत, तंडत, मरत व रडत. बाकीच्या कोट्यवधि हिंदवासीयांना मोंगल, मराठा, पोर्तुगीज इत्यादि सर्व एका च दर्जाचे चोर भासते. तात्पर्य, हिंदुस्थानांत होऊन गेलेली सर्व सरकारें मूठभर अल्पसंख्याकांची आहेत व ह्या मूठभर अल्पसंख्याकांचें सरकार त्यांच्या च सारख्या इतर मूठभर परंतु समबल किंवा वरचढबल अल्पसंख्याक सरकाराच्या ऊर्फ टोळीच्या हातून नाश पावतें. त्यांत गांवक-याचा हात शपथेला सुद्धां नसतो. एतत्संबंधानें अनेक ऐतिहासिक उदाहरणांतून एक अत्यन्त ठळक असें उदाहरण येथें नमूद करतों व तें मराठ्यांच्या इतिहासांतले घेतों. शिवकालीं मराठे व मुसुलमान ह्यांच्या मध्यें घनघोर झगडा सुरू होता, अशी भाषा वापरलेली सामान्य इतिहासांतून आढळते. त्या भाषेंत कितपत तथ्य आहे तें पाहूं. शिवाजीच्या बाजूला एकोन एक सर्व मराठे होते असें म्हणतां येत नाहीं. महाराष्ट्रांतील सर्व मराठ्यां पैकीं शेंकडा नव्वद मराठे अवरंगझेबाचें प्रजाजन होते व त्यां पैकीं कांहीं त्याचे सैनिक होते. मुसुलमानां पैकीं शेंकडों लोक शिवाजीचे प्रजाजन होते व कांही त्याच्या सैन्यांत होते. तेव्हां शिवाजी व अवरंगझेब यांच्यांत जीं युद्धें झालीं त्यांना मराठे व मुसुलमान ह्या दोन लोकां मधील युद्धें म्हणणें इतिहासाला धरून नाहीं. हीं लोकां लोकां मधील युद्धें नव्हतीं. हीं दोन्हीं बाजूच्या अल्पसंख्याक राज्यकर्त्यांचीं म्हणजे सरकारांची युद्धें होतीं. सामान्य गांवकरी ह्या दोघां हि कडे ढुंकून सुद्धां पहात नसे. तो केवळ उदासीन असल्या मुळें, त्याची संमती घेण्याच्या किंवा त्याचें औदासीन्य घालविण्याचा किंवा त्याला शिक्षण देण्याचा किंवा त्याला राजकीय उपदेश पाजण्याचा खटाटोप करण्याची जरूर नव्हती. त्याला सरकारें बनविण्याची गरज भासत नसल्या मुळें, कोणत्या हि पक्षाच्या वतीनें युद्धाच्या नाटकांत तो सोंग घेईल ही आशा च करावयाला नको होती. ही बाब शिवाजी व अवरंगझेब दोघे हि जाणून होते. भाषा मात्र दोघे हि अघळपघळ वापरीत. धर्मा करितां, देशा करितां, लोककल्याणा करितां लढावयाचें व शत्रूचा निःपात करावयाचा अशी भाषा दोघे हि योजीत. त्या भाषेंतील तथ्य एवढें च असे कीं शिवाजी ह्या व्यक्तीला ठार करण्यास अवरंगझेब प्रयत्न करी व अवरंगझेब ह्या व्यक्तीचा प्राण घेण्या करितां शिवाजी टपून बसे. पुढा-याची उत्सवमूर्ति व तिचे हजार पांजशें प्रमुख सरदार उडविले म्हणजे दौलत गारत झाली, ही बाब दोघे हि जाणून होते. एकमेकांचा प्राण घेण्याचे दोघांचे असे डांवपेंच चालले असतां, शिवाजीच्या मनांत अवरंगझेबाला उडविण्याची व पातशाही काबीज करण्याची एक अचाट, परंतु सर्वथा व्यवहार्य कल्पना आली. अवरंगझेब स्वत: जातीनें दक्षिणेस फार वर्षे आला नव्हता व पुढें हि कित्येक वर्षे येण्याचा संभव नव्हता. अवरंगझेबाला उचलावयाचें म्हणजे तो स्वत: दक्षिणेंत आला पाहिजे किंवा शिवाजीनें तरी उत्तरेस आग्-याला गेलें पाहिजे. पहिला मार्ग नाहीं; तर शिवाजीनें दुसरा मार्ग पतकरिला. कसें तरी करून खुद्द आग्-यास जावयाचें व तेथें अवरंगझेबाचा म्हणजे त्याच्या पातशाहीचा कबजा घ्यावयाचा असा बेत शिवाजीनें केला आणि तो बेत अत्यन्त शिताफीनें अमलांत येण्याच्या मार्गास लाविला. शाहिस्तेखानादि अनेक मुसुलमान सरदारांना खडे चारणारा शिवाजी जयसिंगा पुढें दातीं तृण धरून केवळ गाय झाला. इतका गाय आला कीं जयसिंग सांगेल तें करण्यास तो राजी झाला. जयसिंग तोंडांतून शब्द काढण्याचा अवकाश कीं शिवाजीनें त्या प्रमाणें केलें च म्हणून समजावें. किल्ले द्या म्हटल्या बरोबर जयसिंगाच्या स्वाधीन शिवाजीनें किल्ले केले.