Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

४३. सामान्यतः सर्वसाधारण लोकांना जबरदस्त व भपकेबाज किंवा सालस व शिष्ट अश्या कोणत्या हि सरकाराची, राज्ययंत्राची व राष्ट्रत्वाची जरूरी यत्किंचित् हि भासत नव्हती हें जरी खरें आहे; तत्रापि भारतवर्षांत सदा असा एक अल्पसंख्याक वर्ग वेळोवेळीं विद्यमान असे कीं त्याला राष्ट्रत्वाची व राज्ययंत्राची मालकी आपल्या हातांत राखण्याची आवश्यकता उत्कटत्वानें भासे. हा अल्पसंख्याक वर्ग म्हणजे ज्यांच्या हातचें राज्ययंत्र नवीन आलेल्या राज्यकर्त्यांनीं काढून घेतलें त्यांचा व नवीन आलेल्या राज्यकर्त्यांच्या हातचें राज्ययंत्र स्वहस्तगत करूं इच्छिणा-या देशी किंवा विदेशी बुभुक्षितांचा. नामोहरम झालेले पूर्वीच्या राशियतींतील असंतुष्ट लोक व ताज्या दमानें राज्ययंत्र बळकविण्याची इच्छा करणारे नवीन बुभुक्षित लोक हिंदुस्थानांतील राजकारणाचा धागा गेल्या तीन हजार वर्षे बिनतूट चालवीत आलेले आहेत. तत्रापि हे हि बुभुक्षित लोक अन्नसंतृप्त होऊन अल्पावधीनें मुक्तद्वारी, तुटक, संन्यस्त व उदासीन नत. हे भारतबाह्य व भारतांतर्गत बुभुक्षित व असंतुष्ट लोक जर नसते तर राजकारण हा पदार्थ हिंदुस्थानांत औषधाला हि न मिळता. ज्यांनीं ज्यांनी म्हणून राज्ययंत्राचें ओझें अन्ना करितां आपल्या शिरा वर घेतलें ते ते एकोनएक लोक अन्नसंतृप्त होऊन शिरा वरील ओझें खालीं ठेवण्याला उत्सुक झालेले दिसले आहेत. तारुण्यांत राज्यभार वाहणारा जनकराजा वार्धक्यांत वेदान्ताचीं प्रवचनें करतांना दृष्टीस पडतो. तारुण्याच्या पहिल्या तडफेंत रक्तपात व लांडीलबाडी करून राज्य आक्रमणाच्या चंद्रगुप्ताचा मुलगा जो अशोकराजा तो भर तारुण्यांत अहिंसेची शपथ घेतो. खुनांचा सडा पाडणारा अवरंगझेब कुराणाच्या नकला करून व रमजानचे उपास करून पापनिर्मुक्त होण्याची खटपट करतो. सर्व हिंदुस्थान भर हुतूतू घालणा-या पहिल्या बाजीरावाचा नातू जो दुसरा बाजीराव तो राज्यभाराची दगदग विसरण्या करितां स्नानसंध्येत विश्रांति घेण्याचा रस्ता धरतो, आणि पूर्ववयांत राजकारणी दंग झालेला महादजी शिंद्या उत्तरवयांत रडके अभंग रचीत बसतो. ह्या सर्व दाखल्यांचा अर्थ इतका च कीं हिंदुस्थानांत राजकारण, तदंगभूत मारामा-या व राज्ययंत्र ह्यांची वास्तविक जरूरी नव्हती. कृत्रिमपणें राज्ययंत्र निर्माण करतांना व मारामा-यांत दंग होतांना कांहीं अर्धपोटी अल्पसंख्याक लोक हिंदुस्थानांत दिसत. परंतु बाकीच्या सर्व अन्नसंतृप्त लोकांस त्यांच्या ह्या धांगडधिंग्याचा व रानटीपणाचा पूर्ण तिटकारा वाटे. एका च वाक्यांत सांगावयाचें म्हणजे हिंदुस्थानांत इतकें मुबलक अन्न असे कीं येथें तल्लब्ध्यर्थ राज्ययंत्र, राष्ट्र, मारामा-या व मुत्सद्देगिरी पैदा करण्याची जरूरी नसे. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनें येईल त्याला येथें मुक्तद्वार असे, मज्जाव नसे. मज्जाव, अडथळा व प्रतिबंध जो होई तो अल्पसंख्याक भुकेबंगाल राज्यकर्त्या कडून होई.