Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
४०. सामान्य लोक राज्ययंत्रा कडे बिलकुल लक्ष्य कां देत नसत ह्या बाबीची ही अशी मीमांसा आहे. अन्नवैपुल्य व अन्नसौलभ्य हें ह्या उदासीन वृत्तीचें कारण असे. ही उदासीन वृत्ति व हा तुटकपणा जसा राजकारणक्षेत्रांत भासमान होई, तसाच तो समाज, वेदान्त, धर्म, भक्ति, संसार, सारस्वत, व्यापार व देव इत्यादि क्षेत्रांत हि वावरतांना आढळे. जातिसंस्था व वर्णसंस्था ह्या देशांत मूळ उत्पन्न होण्याचीं जीं अनेक कारणें आहेत, त्यांत अन्नवैपुल्याचें व अन्नसौलभ्याचें कारण बरेंच प्रमुख आहे. प्रत्येक जातीनें आपापलें अन्न आपापला धंदा करून तुटकपणें सुखानें खावें. प्रत्येक माणसानें आपापला पृथक् देव करून खुशाल तदेकभक्त व्हावें. प्रत्येक माणसानें समाजा पासून विलग होऊन सन्यस्त होण्यांत परमपुरुषार्थ मानावा. इत्यादि सर्व स्थानीं उदासीन वृत्तीचा पाया भक्कम रोविलेला दिसे. उदासीन, सन्यस्त, तुटक, मुक्तद्धारी अश्या व्यक्तींनीं जर हा देश व्यापलेला असे, तर ह्या सर्व व्यक्ती मिळून समाज म्हणून ज्या संस्थेस नांव आहे ती संस्था कितपत बने ? समाज हें नांव हिंदुस्थानांतील व उत्तर कोंकणांतील तत्कालीन लोकांना कितपत लागू पडे ? तत्कालीन हिंदी लोक एक भरींव समाज होते काय ? ह्या प्रश्नाला उत्तर द्यावयाचें म्हणजे समाज ह्या अर्थाची व्याख्या सांगितली पाहिजे. कांहीं एका अर्थाच्या सिद्धयर्थं अन्योन्योपकारक व्यक्तींचा जो सहकारी समवाय तो समाज, अशी व्याख्या केल्यास, उत्तर कोंकणांतील तत्कालीन मनुष्यसमूहाची समाजत्वा संबंधानें परीक्षा करण्यास सोपें जाईल. तत्कालीन म्हणजे शालिवाहनशकाच्या सोळाव्या शतका पर्यंतचा जो काल त्या काळांतील, असा अर्थ विवेचनसुखार्थ घेऊ. त्या कालीं उत्तरं कोंकणांत वन्य, यहुदी, मुसुलमान, ख्रिस्ती, पारशी, अंत्यज, शूद्र, वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण असे दहा प्रकारचे लोक कायमची वस्ती करून असत. देवधर्मदृष्ट्या पाहिलें तर वन्य, यहुदी, मुस्लीम, ख्रिस्ती, पारशी व हिंदू असे सहा गट असत. ह्या सहा गटांत हिंदूंची संख्या अधिकतम असे. हे सहा हि गट अन्योन्योपकारक म्हणण्या पेक्षां अन्योन्यापकारक जरी नव्हत तरी अनेक बाबतींत अन्योन्योदासीन असत. एका बाबींत, मात्र, हे सहा हि गट अन्योन्योपकारक होते असें म्हणतां येण्या सारखें आहे. ती बाब म्हणजे दोनप्रहरच्या अन्नाची. सहा ही गट परस्परांत कोणत्या नाहीं कोणत्या तरी रूपानें अन्नविनिमय करीत. कातकरी करवंदें, तोरणें व फाटीं विकी; यहुदी तेल पुरवी; मुसुलमान आफ्रिका, मलबार व अरबस्थान ह्या देशांत भाताची वगैरे नेआण करी; ख्रिस्ती बाट्या शेती पिकवी; आणि पारशी आधेंमधें कोठें तरी लुडबुड करून दैन्यवाणें पोट भरी. अहिंदूं पैकीं बाकी राहिला यूरोपीयन ख्रिस्ती जो पोर्तुगीज तो. त्याचें एक च एक काम राज्ययंत्र हाकून अन्नशोषण करण्याचें. हिंदूंना किंवा अहिंदूंना पोर्तुगीजाच्या राज्ययंत्राची बिलकुल जरूर नसे. त्याच्या यंत्राखेरीज ते आपला बचाव व संरक्षण महार व कुत्रा ह्यांच्या द्वारा चोरांचिलटां पासून व पशूंपाखरां पासून करण्यास पूर्ण समर्थ होते. पोर्तुगीजांच्या धाडी पासून मात्र बचाव करण्याचें मानस त्यांच्या ठाईं नव्हतें. कारण हिंदू व अहिंदू असे सर्व लोक मुक्तद्वारीं, तुटक व उदासीन असत. करतां, स्वत:च्या धाडी पासून हिंदूचा व अहिंदूंचा बचाव करण्याकरितां पोर्तुगीज लोक जबरदस्तीनें राज्ययंत्र चालवीत, म्हणजे दुसरें तिसरें कांहींएक करीत नसत, करांच्या रूपानें लोकां पासून अन्न व पैसा उकळीत, अथवा स्पष्ट सांगावयाचें म्हणजे हिंदू व अहिंदू ह्यांच्या कष्टा वर चरत. परोपजीवी अश्या ह्या पोर्तुगीजांचा वर्ग सोडला, म्हणजे बाकी राहिलेले सर्व लोक अन्नोत्पादनाच्या बाबतीत एकमेकांचें साहाय्य करीत. तात्पर्य, फक्त अन्नोत्पादनाच्या दृष्टीनें कोंकणांतील ह्या दहा हि सहकारी जातींना एक समाज म्हटलें असतां चालण्या जोगें आहे. इतर सर्व दृष्टीनीं प्रजोत्पादन, विद्योत्पादन, कलोत्पादन, मोक्षोत्पादन, राष्ट्रोत्पादन, वगैरे इतर व्यवसायांत हे गट स्वयंस्फूर्तीनें अन्योन्यसाहाय्य करीत नसत, अथवा खरें म्हटलें असतां करण्याच्या स्थितींत नसत.