Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

४४. येणें प्रमाणें उत्तरकोंकणांतील हिंदी लोक ऊर्फ कायमची वसती करून राहिलेले नाना वंशांचे, नाना वर्णांचे, नाना देवधर्मांचे, नाना आचारांचे व नाना भाषांचे सर्व लोक जे इतके राजकारणपराङमुख, राष्ट्रपराङमुख, समाजपराङमुख, मुक्तद्वारी, तुटक, संन्यस्त व व्यक्तितंत्र दिसतात त्याचें एक च एक आदिमूळ आर्थिक आहे. अन्नाचें वैपुल्य व सौलभ्य हें ह्या एकसमाजविन्मुखतेचें कारण आहे. अश्या परिस्थतींत मानवांचा कोणता हि वंश अशा च स्वभावाचा बनला असता. पश्चिम यूरोपांतील ख्रिस्ती लोक बद्धद्वार, एकजूट, समाजनिष्ठ व राष्ट्रनिष्ठ जे दिसतात त्याचें हि मूळ व मुख्य कारण आर्थिक च आहे. अन्नाचें दौर्लक्ष्य व दौर्लभ्य हें ह्या एकसमाजसन्मुखतेचें कारण आहे. संघविहीन लोकां वर घाला घालून अन्न मिळविण्या करितां एकसंघ व एकसमाज केल्या विना त्यांना तरुणोपाय नव्हता. ह्या वरून असें विधान करणें शक्य होतें कीं उत्तरर्कोकणांतील व हिंदुस्थानांतील समाजपराङमुख व राष्ट्रपराड्मुख लोकांना एकसमाजनिष्ठ व राष्ट्रनिष्ठ करावयाचें असल्यास, त्यांच्यांत अन्नदौर्भिक्ष्य व अन्नदौर्लभ्य उत्पन्न झालें किंवा केलें पाहिजे. नाना जाती करून रहाणें घातक आहे, नाना भाषा वापरणें ऐक्यसाधक नाहीं, नाना धर्मांना कवटाळून बसणें राष्ट्रनाशक आहे, वगैरे कोरड्या व कच्च्या उपदेशानें हें कार्य साधणार नाही. अनन्नत्वाचा जेव्हां पेंच लागेल तेव्हां हे लोक जगावयाचें असल्यास, एकसमाजनिष्ठ व एकराष्ट्रनिष्ठ झाल्या वाचून रहाणार नाहींत. नाना भाषा, नाना वंश, नाना धर्म व नाना जाती ह्यांच्या मुळें हिंदू लोक दुर्बल झाले आहेत, हें म्हणणें खोटें आहे. हिंदुस्थानांतील, मुसुलमान लोकांत नाना जाती, नाना वंश, नाना धर्म व नाना भाषा नाहींत, एक वंश, एक जात, एक भाषा व एक धर्म आहे. तत्रापि ते हि हिंदू लोकां प्रमाणें च तुटक, उदासीन, समाजविन्मुख व राष्ट्रपराङमुख आहेत. तेव्हां हिंदूमुसुलमानांच्या राष्ट्रपराङमुखतेचे कारण वंश, धर्म, जाती व भाषा ह्या चार राशींत हुडकीत बसणें युक्तिसिद्ध नाहीं. पराङमुखतेचें मुख्य व एक च एक कारण सुलभ व विपुल अन्नसंपत्ति आहे. ही संपत्ति अपुरी भासण्यास हिंदूस्थानांत आहे ती हून लोकसंख्या तिप्पटचौपट वाढली तरी पाहिजे किंवा आहे त्या लोकसंख्येच्या रहाणीची इयत्ता दसपटीनें वाढली तरी पाहिजे किंवा बहि:स्थ राजकर्त्यांनी अन्नशोषण करून तें अत्यन्त दुर्मीळ तरी करून टाकिलें पाहिजे. ह्या आर्थिक, सामाजिक व राजकीय विषयाचा खल इत्थंभूत व सविस्तर होण्यास एखादा स्वतंत्र ग्रंथ रचिला पाहिजे, बखरीच्या पडवींतील तुटपुंज्या जागेंत त्याचा निर्वाह होणार नाहीं.