लेखांक ११८.
श्री.
१६८२ भाद्रपद शु।। ११. ४५ पो छ २ रजब.
राजश्री मोराजी शिंदे नामजाद त।। रत्नागिरी गोसावी यांसी-

अखंडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य राजश्री स्नेहांकित बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद. सु।। इहिदे सितैन मया व अलफ. वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळूपाध्ये मोघे धर्माधिकारी यांणी हुजूर विदीत केले कीः मौजे वेरळ तो लांजे प्रां मजकूर येथे...... चा घरठाणा आहे. त्यावरी आपले वडिलांवडिली नांदत आले. त्यास पेशजी सांवतांचे धामधुमींत गांव जळला. आपले घरही जळले, ते समई एक वर्ष गांव उज्याड होता. त्यामुळे दहा पांच वर्षे आपण दुसरे गांवी जाऊन राहिलो. हाली मजकुरी येऊन आपले पुरातन घरठाण्यावरी घर बांधावयास प्रारंभ केला असतां, ता मजकुरचे देशकुळकर्णी यांणी अडथळा केला आहे. घर बांधू देत नाही. येविशी ताकीद जाहली पाहिजे म्हणोन, त्याजवरून, हे पत्र तुम्हांस सादर केले असे. तरी तुम्ही येविशीचे वर्तमान मनास आणून, भटजी मौजे मजकूरी आपले पुरातन वृत्तीच्या घरठाणियावरी घर बांधीत असतां देशकुळकर्णी अडथळा करीत असले तरी त्यांस बरे वजेने ताकीद करून अडथळा होऊं न देणे. फिरोन बोभाट येऊं न देणे. जाणिजे. छ ११ सफर. बहुत काय लिहिणे? हे विनंति. लेखन सीमा.