Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
सबब जसे लोकांच्या तोंडून त्यांनी पाठ ऐकिले तसेच्या तसेच भ्रष्ट व अर्थहीन पाठ देणे त्यांना भाग पडले. उवट व सायण यांना तर ह्या प्रकरणातील बरेच शब्द व वाक्ये कळली नाहीत. इतकेच नव्हे तर प्राचीन समाजाच्या चालीरीतींचे ज्ञान नसल्यामुळे वाक्याचे भलतेच अर्थ त्यांनी लिहून ठेविले आहेत. उदाहरणार्थ, माता च ते पिता च ते अग्रं वृक्षस्य रोहतः या वाक्यातील वृक्ष या शब्दाचा अर्थ उवट मंचक असा करतो व सायण तल्प असा करतो. उवटकाळी व सायणकाळी स्त्रीपुरुषसमागम मंचकावर किंवा तल्पावर होत असे, सबब वृक्ष म्हणजे मंचक किंवा तल्प असा अर्थ त्यांनी केला ते रास्तच आहे. पाशवावस्थेतील वनचर मनुष्य वानरादी इतर पशुपक्ष्यांप्रमाणे प्रशस्त वृक्षांच्या शास्त्रावर समागम करीत ही कल्पना जर त्यांना अवगत असती, तर त्यांनी वृक्ष या शब्दाचा वाच्यार्थच घेतला असता, यात संशय नाही. असो. प्रकृत स्थल शब्दविषयक किंवा वाक्यविषयक विवेचन करण्याचे नव्हे. शब्द वाक्यविषयक जी थोडीशी टीका येथे केली ती एवढ्याच करिता की, शुक्ल व कृष्ण यजुःसंहितांच्या या प्रकारणांतील चालीरीती अत्यंत प्राचीनतम आहेत हे उत्कटत्वाने भासमान व्हावे. या प्राचीनतम चालीरीतींची नक्कल अश्वमेध यज्ञात यजुःसंहितारचनाकालीन व तदुत्तरकालीन याजक व यजमान संभावितपणे करीत असत व त्या अश्लील नकलेला कोणी नावे ठेवीत नसत. नक्कल जशीची तशी वठली पाहिजे नाही तर इष्टफलप्राप्ती चुकेल, असा सर्व समाजाचा समज असे. आता नकलेचा तपशील दोन्ही संहितात जसा दिला आहे तसाचा तसाच इथे मराठीत पूर्वापरसंबंध दाखविणारी वाक्ये घालून नमूद करतो. प्रथम कृष्णयजुःसंहितेतील पाठ घेतो.