Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

सोमस्याहं देवयज्यया सुरेता रेतो धिषीय इत्याह सोमो वै रेतोधाः तेनैव रेत आत्मन्धत्ते । सोमाच्या देवयज्येने प्रभूतरेतस् होऊन रेत धारण करीन असे यजमान म्हणतो, कां की सोम रेत उत्पन्न करणारा आहे. त्या सोमरसाने यजमानाच्या ठायी रेत साठते. येथे उत्तानार्थ असा आहे की सोमनामक मादक रस प्राशन केला असता माद येऊन रतिक्रिया मनसोक्त होत असे. सबब प्राचीन ऋषिपूर्वज तो सोमरस यथेच्छ पीत व त्याच्या अमलात मनमुराद निर्भयपणे स्त्रीसमागम करीत. सोमरसाचा हा जो माद आणून यथेच्छ रतिकर्म संपादण्यास समर्थ करण्याचा गुण सोम या देवतेचा आहे असा यजुर्वेदकालीन ऋषींचा समज होता. असाच समज बर्हीसंबंधाने त्या ऋषींचा होता. रानटी ऋषिपूर्वज आगटी व धुमी पेटविताना पेटविल्यावर काटक्या, समिधा, डावल्या, गवत, मद्य इत्यादी ज्या ज्या साधनांचा उपयोग करीत, ती ती सर्व साधने त्या रानटी ऋषीचे वंशज जे ऋक्कालीन व यजुकालीन ऋषी त्यांना देवतारूप वाटत. रानटी साधनांच्या साहाय्याने रानटी पूर्वजांनी घरे, दारे, संपत्ती, गाई, गुरे व विशेषतः प्रजा संपादन केल्या. त्या रानटी साधनांचा रानटी पूर्वज जो सहज उपयोग करीत त्या उपयोगाची नक्कल यज्ञ करणारे यजुःकालीन ऋषी हुबेहूब उठवून देत, आणि ती नक्कल बिनचूक केली म्हणजे फलप्राप्ती हटकून होईल अशी आशा बाळगीत. रानटी पूर्वज लाकडांवर लाकडे घासून अग्नी उत्पादन करीत म्हणून त्या रानटी पूर्वजांचे सुधारलेले वंशजही लाकडावर लाकडे घासून यज्ञार्थ अग्नी संपादन करण्याची नक्कल उठवून देत. सुधारलेल्या वेदरचनाकालीन ऋषींना गोव-या, चकमकी इत्यादी साधने उपलब्ध असत, परंतु त्या नव्या साधनांनी अग्नी भरदिशी न निष्पादिता, ते भोळ्या श्रद्धेने पूर्वजांनी ज्याप्रमाणे लाकडे घासून अग्नी सिद्ध केला त्याप्रमाणे अग्नी सिद्ध करीत. हेतु असा की, पूर्वजांना जी फलप्राप्ती ज्या प्रक्रियेने झाली ती फलप्राप्ती त्या प्रक्रियेवाचून होणार नाही. येथून तेथून सर्व यजुःसंहिता रानटी पूर्वजांच्या कृतीची नक्कल कशी करावी या एका बाबीने भरली आहे. अमुक कार्य करताना किंवा अमुक सामग्री मिळविताना पूर्वजांनी जागती किंवा शक्करी छंद म्हटला, सबब ते कार्य किंवा ती सामग्री मिळविण्याची कामना असल्यास जागती किंवा शक्वरी छंदच म्हटला पाहिजे, नाहीतर कार्य बिघडेल, असे इशारे यजुःसंहितेत जागजागी दिलेले आहेत. तात्पर्य, रानटी पूर्वजांची नक्कल अणुरेणूचीही चूक न होता उठली तरच इष्टकामना परिपूर्ण होईल अशी यजुःकालीन याजकाची समजूत असे. प्रस्तुत कलमातील विवेचन रानटी पूर्वजांच्या प्रजोत्पादनासंबंधाचे आहे, करिता रानटी पूर्वजांच्या प्रजोत्पादनक्रियेची नक्कल यजुःकालीन ऋषी कशी हुबेहूब करीत त्याचा एक मासला देतो.