Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

(३) ऋषींच्या अंगिरस नावाच्या प्राचीन पूर्वजाने गुहेतून अग्नी मैदानातील झोपड्यात आणिला इत्यादी वर्णन मागील कलमात केले आहे. झोपड्यात अग्नी आल्यापासून ते जीवनयात्रेची साधने वृद्धिंगत होऊन सहजच पूर्वी जितकी होणे मुष्कील होते, तीहून जास्त प्रजावृद्धी होऊ लागली, यामुळे अंगिरसाला प्रजापति हे अभिधान सार्थ मिळाले. अग्निसिद्धीचा शोध व प्रजापतिसंस्था स्थापन ही दोन्ही समकालीन झाली. झोपड्यांत अग्नी सिद्ध करता येऊ लागल्यानंतर थोड्या अवधीने प्रजापतिसंस्था स्थापन झाली, अनेक स्त्रिया व एक प्रजापती असा तत्कालीन समाज असे. स्त्रियांच्या पोटी झालेल्या सर्वं प्रजेचा मालक यूथाचा वृषभ म्हणजे रेतःसिंचन करणारा जो प्रजापती तो असे. अनेक प्रजापती ऋषिपूर्वजांच्या समाजात निर्माण झाले. प्रजापती यूथातील स्त्रियांशी समागम अग्निकुंडाच्या समीप करी. त्या काली गाद्यागिर्द्या वगैरे संपन्न साधने आंथरापांघरावयास नसत. रानटी आर्यपूर्वज बर्हि नावाचे तृण अग्निकुंडाभोवती पसरून त्याच्यावर शयन व अभिमेथन करीत. तैत्तिरीयसंहितेच्या प्रथम कांडाच्या सातव्या प्रपाठकाच्या चौथ्या अनुवादात खालील वाक्य आले आहे : " बर्हिषा वै प्रजापतिः प्रजा असृजत ।” या वाक्याचा खरा वाच्यार्थ असा आहे की, बर्हिस नामक गवत आंथरून त्याजवर प्रजापतीने प्रजा उत्पन्न केल्या. रानटी ऋषिपूर्वज बर्हीचा बिछाना करीत, सबब प्राचीन रूढी म्हणून ती पूज्य होऊन बसली व तिचे वर्णन यजुर्वेदकालीन यज्ञकर्ते ऋषी पूज्यभावाने करू लागले. बर्हीच्या देवयज्येने प्रजापती प्रजावान् झाला, या विधानाचा अर्थ यजुर्वेदकालीन ऋषींना समजेनासा झालेला होता. काही अतर्क्य दैवी रीतीने बर्हि घेऊन प्रजापती प्रजा उत्पादन करीत, असा अर्थ यजुर्वेदकालीन ऋषी समजत, परंतु खरा अर्थ आम्ही वर जो सांगितला तो आहे. बर्हि आंथरून रानटी ऋषीपूर्वज त्यांचा बिछान्यावजा उपयोग करीत. उत्तानार्थ हाच आहे. याला याच अनुवाकात एक प्रमाण आहे. या अनुवाकात पुढे खालील वाक्य आले आहे.