Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
प्रथमा रंभी रानटी ऋषिपूर्वज बहुतेक पशूंसारखे उघडे नागडे असत, पशुपक्षी ज्याप्रमाणे रतिकर्म उघड्यात किंवा झाडाझुडपांवर उरकतात त्याप्रमाणे हे पाशवावस्थ ऋषिपूर्वजही रतिकर्म उघड्यात किंवा झाडाझुडपांवर उरकीत. लिंगाला किंवा योनीला हात लावणे, अभद्र शब्द उच्चारणे इत्यादी अर्वाचीन दृष्टीला दिसणारे गलिच्छ प्रकार ह्या पशुतुल्य लोकांत असत. नंतर सुधारणा होऊन लोकांना अग्नी तयार करता येऊ लागला, तेव्हा अग्नीभोवती हे रानटी लोक रतिकर्म संपादित. वाटेल त्या स्त्रीला वाटेल त्या पुरुषाने रत्यर्थ धरून न्यावे हा त्या काली धर्म समजला जात असे. ज्या स्त्रीला कोणी धरून न नेई ती स्त्री हिरमुसली होई व रडे की आपणास कोणी धरून नेत नाही किंवा रतिसुख देत नाही. अशा स्त्रीस पश्वादीशी अभिगमन करण्याची मोकळीक असे. अशी ही स्त्रीपुरुषसमागमाची पद्धती रानटी ऋषिपूर्वजांत असे. ह्या पद्धतीची नक्कल रानटी ऋषींचे सुधारलेले यजुःकालीन वंशज येणेप्रमाणे करीत. अश्वमेध नावाचा एक यज्ञ असे. या यज्ञाची प्रक्रिया, फलश्रुती व दंतकथा यजुःसंहितेत दिल्या आहेत. पैकी सातव्या कांडाच्या चौथ्या प्रपाठकाच्या एकोणिसाव्या अनुवाकात राजपत्न्यांचा विलाप दिला आहे. शुक्लयजुःसंहितेत हाच विलाप तेविसाव्या अध्यायात दिला आहे. ह्या अनुवाकाला भाष्यकार विलाप म्हणतो, परंतु याला विलास हे नाव उत्तम शोभेल. ह्या विलासात्मक प्रकरणाचे कृष्ण व शुक्ल संहितांत कित्येक पाठ इतके भिन्न आहेत की त्यावरून एक निश्चित अनुमान करता येते, ते असे :-दोन्ही संहिता जेव्हा रचिल्या गेल्या तेव्हा खरे मूळ पाठ कोणते ते संहिताकारांनाही निश्चयात्मक माहीत नव्हते. उदाहरणार्थ, कृष्णयजुःसंहिताकार गृह असा पाठ देतो व शुक्लयजुःसंहिताकार गुद असा पाठ देतो. प्राचीन रानटी ऋषिपूर्वजांचा खरा मूळ पाठ काय होता तो दोन्ही संहिताकारांना माहीत नव्हता. निजल्गुलिति व निगल्गलीति, प्रसुलामि व प्रतिलामि इत्यादी पाठांतरांनाही हाच न्याय लागू आहे. तात्पर्य; ह्या प्रकरणात पूर्वपरंपरागत जी वाक्ये दिली आहेत ती अगदी अपभ्रष्ट होऊन गेलेली आहेत. यावरून असे अनुमान बांधता येते की, यजुःसंहितेचे कृष्ण व शुक्ल असे पाठ जेव्हा रचिले गेले तेव्हा ही पूर्वपरंपरागत वाक्ये इतकी जुनाट व भ्रष्ट होऊन गेली होती की संहिताकारांना खरे पाठ कोणते ते ठरविता येईना.