Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

ह्या तीन ऋचातील (१) उल्का, (२) अश्मव्रजाः व (३) विदंत ज्योतिः ही तीन शब्दस्थाने प्रकृतार्थाला उपयुक्त आहेत. पणि नावाच्या शत्रूंनी अंगिरसाच्या अश्मव्रज गाई चोरून नेऊन डोंगराच्या गहृरात दडवून ठेविल्या. त्या गाईंना अग्नीच्या ज्योतीच्या उजेडाने अंगिरसांनी शोधून काढिले, असा दुस-या व तिस-या ऋचात मजकूर सांगितला आहे. अग्निं अर्चयन्तः ज्योतिः अविदन् म्हणजे अग्नीची सिद्धता करून अंगिरसांनी ज्योत तयार केली, आणि अंधारातील गाई त्या ज्योतीच्या उजेडाने शोधून काढल्या. येथे ज्योत म्हणजे चूड, चुडेचा उजेड असा अर्थ घेणे युक्त दिसते. पहिल्या ऋचेत उल्का म्हणजे चूड, कोलीत हा शब्द तर साक्षात् आलेला आहे. तात्पर्य, चूड पेटवून उजेड पाडण्याची कला ऋषिपूर्वजांना माहीत झालेली होती. तसेच मोठमोठ्या दगडांची आवारे करून त्यांत गाई वगैरे मालमत्ता ठेविण्याचाही प्रघात ऋषिपूर्वजांत असे. वरील ऋचांत अश्मव्रजाः हे उस्त्रांचे म्हणजे गाईचे विशेषण आहे. व्रज म्हणजे गोठा, अश्मव्रज म्हणजे दगडांचा गोठा. मोठमोठे हत्तीसारखे दगड सभोवार रांगेने रचून ऋषिपूर्वज गाईंना निवा-याची जागा तयार करीत. त्या जागांना ऊर्फ गोठ्यांना ते अश्मव्रज म्हणत. अश्मव्रजा म्हणजे इतर देशांत स्टोनहेंज म्हणून ज्यांना म्हणतात ते. येणेप्रमाणे झोपड्या, अश्मव्रज, अग्नी व गाई ह्या चार वस्तू तत्कालीन ऋषिपूर्वंजांच्या संस्कृतीची मुख्य चिन्हे असत. अग्नी चाहेल त्या वेळेस मिळावा म्हणून कुंडातून सतत धुमत ठेविलेला असे. अग्निकुंडाच्या भोवतालील जागा गाईच्या शेणाने सारवून बसण्याउठण्यास सोईस्कर अशा केलेल्या असत. दिवसा उपजीविकेची कामेधामे करून रात्री ह्या अग्निकुंडाच्या भोवती ऋषिपूर्वज उबा-याला बसत आणि शिळोप्याच्या करमणुकी करत किंवा मद्यमासांची सिद्धता करीत. सोमवल्लीची दारू व गाईबैलांचे किंवा इतर श्वापदांचे मांस ह्या अग्निकुंडाच्या सान्निध्याने व साहाय्याने निष्पन्न करीत. नंतर मद्यमांसावर यथेच्छ हात मारून, निरनिराळ्या छंदांतली गाणी म्हणून ते एकमेकांना रिझवीत किंवा आपल्या इष्ट देवतेची करुणा भाकीत. ह्या काली ऋषिपूर्वजांचा मोठा आवडता देव म्हटला म्हणजे महदुपयोगी जो अग्नी तो असे. अग्नीच्या साह्याने उघड्या मैदानात झोपड्या करून सुखाने राहता येऊ लागले, अग्नीच्या साह्याने सुग्रास पाकनिष्पत्ती करिता येऊ लागली.