Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
हाताच्या आंगुळ्या ह्याच कोणी ज्या दहा बहिणी, त्यांना त्यांच्या स्वतःच्या मेहनतीने जेव्हा पुत्र झाला तेव्हा अत्यानंद झाला. दोन शीघ्र ज्वालाग्राही लाकडाच्या काटक्या घेऊन व त्या दोन्ही हातांच्या बोटांनी खालीवर घासून ऋषिपूर्वज इतर आधुनिक रानटी लोकांप्रमाणे अग्नी उत्पन्न करीत, या क्लृप्तीचे वर्णन वरील ऋचेत आलेले आहे. ह्या ज्वालाग्राही लाकडाच्या काटक्यांचे रानटी ऋषिपूर्वज समिध् ओषधि इत्यादी नावे देत. समिध् म्हणजे चांगली जळणारी काटकी व ओषधि म्हणजे उष्णता धारण करणारी काटकी. टणक ज्वालाग्राही काटक्या एकमेकांवर घासून यद्यपि वाटेल तेव्हा अग्नी निर्माण करता येत असे, तथापि अचानक हिंस्त्र पशूंचा किंवा दस्यूंचा घाला आला असता, त्याचा उपयोग व्हावयाला विलंब लागे व इजा व्हावयाची ती होऊन जाई. ही अडचण टाळण्याकरिता कित्येक ऋषिपूर्वजांनी झोपड्यांच्या आत किंवा जवळ लहानमोठ्या खाचा खणून त्यात लाकडाचे ओंडके व झाडांची सबंध खोडे सतत जळत ठेवण्याची युक्ती काढली. या खाचांना ते कुंडे म्हणत, कुंडात धगधगीत निखारे साही ऋतूंत रात्रंदिवस तयार असत. त्यांच्या साह्याने आर्यपूर्वज येईल त्या दस्यूचा किंवा पशूंचा निःपात करीत. येणेप्रमाणे कुंडातील अग्नी हे एक ऋषिपूर्वजांना जवळ अप्रतिहत हत्यार बनून गेले. ह्या हत्याराला ऋषिपूर्वज कधीही व कोठेही विसरत नसत; कारण ह्या हत्यारावर त्यांच्या मालमत्तेच्या व जिवाच्या सुरक्षिततेची सारी मदार अवलंबून असे. भयंकर अशा निबिड महारण्यात जावयाचे असो किंवा विस्तीर्ण नद्या-होड्यातून पार व्हावयाचे असो, ऋषिपूर्वज बरोबर अग्नी घेतल्याशिवाय झोपड्याबाहेर एक पाऊलही टाकीत नसत. अरण्यात एकटे राहण्याचा प्रसंग आल्यास, बरोबरच्या अग्नीने एखादे वाळलेले खोड, किंवा बुंधा पेटवून त्याच्या शेजारी अशन, प्राशन, शयन व आसन ऋषिपूर्वज निर्धास्तपणे करीत आणि सिंह, हत्ती, वाघ किंवा लांडगा हिंस्त्रबुद्धीने जवळ आल्यास आगीतील कोलिते किंवा जळजळीत निखारे त्यांच्या अंगावर टाकून त्यांना पळवून लावीत किंवा ठारही करीत. अद्यापही हा परिपाठ हिंदुस्थानात जिवंत दृष्टीस पडतो. बैरागी नावाचे जे नाना जातीय तपस्वी हिंदुस्थानात ठिकठिकाणी अरण्यातून व ओसाड प्रदेशातून हंगामी वस्ती करून राहतात, ते उतरण्याची जागा पसंत केल्याबरोबर पहिले काम जे करतात ते अग्न्यावाहनाचे. म्हणजे धुनी पेटवून तीत आपले त्रिशूळ उलटे करून ठेवतात आणि कोणत्याही व कसल्याही श्वापदाची क्षिती बाळगीत नाहीत; कारण त्रिशूळाच्या लाल इंगळासारख्या टोकांनी धिटाईने जवळ येणा-या व्याघ्रादींना भाजून काढण्याचे सामर्थ्य आपल्याजवळ जय्यत तयार आहे अशी त्यांना खात्री असते. अर्वाचीन बैराग्यांजवळ जसे लोखंडी त्रिशूळ असतात तसे रानटी आर्य पूर्वजांजवळ नसत, कारण खाणीतून लोखंड काढण्याची कला अद्याप त्या वनचरांना अवगत झाली नव्हती. लोखंड व पोलाद माहीत नसल्यामुळे चकमकीचाही शोध अत्यंत प्राथमिक आर्यपूर्वजांना लागला नव्हता. आर्यांच्या सबंध यज्ञप्रक्रियेत म्हणजे यजुसंहितेत चकमकीपासून अग्नी सिद्ध करण्याचे अवाक्षरही नाही.