Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
प्रकरण ३ रे
आतिथ्याची एक आर्ष चाल
३. आतिथ्याची एक आर्ष चाल
(१) अथेन्स शहरातील तत्त्वज्ञ साक्रेटिस (सुक्रतुस) याने आपली स्त्री झांटिप हिला आपला स्नेही अल्कि बियाडिस याला संभोगार्थ दिली, तसेच रोम शहरातील प्रसिद्ध मुत्सद्दी केटो याने आपली स्त्री मर्शिया हिला आपला स्नेही होर्टेन्शियस याला त्याच कार्याकरिता दिली, असे प्लूटार्क लिहितो (प्लूटार्ककृत केटो). मित्राला स्वस्त्री उपभोगार्थ देण्यात कोणत्याही नीतीचा भंग झाला असे तत्कालीन ग्रीक व रोमन समाजाला वाटत नव्हते, हा ह्या उदाहरणाचा अर्थ. आपल्या इकडे भारतवर्षात प्राचीन काळी या मुद्दयासंबंधाने काय स्थिती होती ती भारतादी ग्रंथावरून निश्चित करू. उद्योगपर्वाच्या ४५ व्या अध्यायात खरे मित्रत्व कशाला म्हणतात ते सनत्सुजात सांगतात, आणि ख-या मित्रत्वाचे जे सहा गुण त्यांपैकी खालील गुणांचा निर्देश करतात--
"संकटसमयी मित्राला आपली स्त्रीदेखील निर्मळ अंतःकरणाने अर्पण करावी." (इष्टान् पुत्रान् विभवान् स्वाश्च दारान्)
सनत्सुजात म्हणजे कोणी अलबत्ये गलबत्ये वाचाट माणूस नव्हते. महान् तपस्वी व तत्त्ववेते म्हणून ते भारतात प्रसिद्ध होते. ते ही मित्रनीती सांगत आहेत. तेव्हा एकेकाळी भारतीयांमध्ये मित्राला स्वस्त्रीसंभोगार्थ देण्यात नीतिभंग होतो असे मानीत नव्हते, असे विधान सप्रमाण करता येते. या विधानाचे पोषण पाणिनीच्या एका सूत्राच्या आधाराने करता येते. द्विगोर्लुगनपत्ये (४-१-८८) या सूत्राच्या अनुषंगाने द्वैमित्रिः हा तद्धित पाणिनि सांगतो. द्व्योर्मित्रयोरपत्यं द्वैमित्रिः । दोन मित्रांच्या अपत्याला द्वैमित्रि म्हणतात. एका मित्राने आपली बायको काही काल ग्राम्यधर्मार्थ आपल्या मित्राला दिली आणि मित्रापाशी राहून त्या बायकोला अपत्य झाले, तर बायको शास्त्रतः एकाची व मूल झाले दुस-या मित्राच्या समागमापासून, अशा स्थितीत पितृत्व सामान्य जनप्रवादाने दोघाही मित्रांकडे येई. शास्त्रतः नव-याकडे, समागमतः दुस-या मित्रांकडे सबब मुलाला द्वैमित्रि म्हणत. पाणिनिकाली मित्राला ग्राम्यधर्मार्थ स्वस्त्री देण्याची चाल होती, हे सिद्ध. ग्रीस व रोम या देशांत जी चाल होती तीच चाल पाणिनिकाली भारतवर्षात होती.